नवी दिल्लीत परवा झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण झाले. तसे वरचेवर ते अशी भाषणे देतात. पण बोलतात मात्र कमीच! या वेळी मात्र ते बोलले आणि काय बोलले! त्यांच्या भाषणातील वाक्यांमधील मोकळ्या जागांचा अर्थ नीट समजून घेतला, तर कोणाच्याही लक्षात येईल, की मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. मनमोहन सिंग यांचे सोनिया गांधी यांच्यावरील राजकीय अवलंबित्व पाहता, नव्वदच्या दशकात खुली अर्थव्यवस्था आणणे, देशाचे दरवाजे परकी थेट गुंतवणुकीस खुले करणे, हे करताना त्यांनी ज्या प्रकारचे धाडस दाखविले, तसेच किंबहुना त्याहून अधिक धाडस त्यांनी सोनिया यांच्यावर बाण सोडताना दाखविले आहे, असेच म्हणावे लागेल. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आहेत. पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या जाणत्या पंतप्रधानांनी देशाची दिशा आíथक उदारीकरणाकडे वळविली ती मनमोहन सिंग यांच्या साह्य़ानेच. असे असताना आता मात्र त्यांच्यावर धोरणलकव्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. अनर्थशास्त्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जात आहे. राजकारणात हे चालणारच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे, तर भारतीय रिझव्र्ह बँकेने परवाच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज आधीच्या ५.७ वरून साडेपाच टक्क्यांवर उतरविला आहे. या पाश्र्वभूमीवर मनमोहन सिंग यांना बोलणे भागच होते. सध्या अनेक देशांची, अगदी अमेरिकेचीही अर्थव्यवस्था दुखणाईत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर अमेरिकेतील काँग्रेस सदस्यांपुढे चक्क भारत आणि चीनचा बागुलबुवा उभा केला आहे. सुधारणांना मान्यता न देता असेच बसून राहाल, तर भारत आणि चीनची अर्थव्यवस्था कधीच आपल्यापुढे निघून जाईल, अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेतील राजकीय नेत्यांना सुनावले. गंमत म्हणजे मनमोहन सिंग यांच्या भाषणाचे सूत्रही काहीसे तसेच होते. त्यांनीही आíथक सुधारणांसाठी राजकीय सहमतीची गरज व्यक्त केली. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या निबंधातील उतारे उद्धृत करत ते म्हणाले, लोकशाही देशात सुधारणा -मग त्या आíथक असोत की संस्थात्मक- ही प्रामुख्याने एक राजकीय प्रक्रिया असते. आपण ज्या सुधारणा करू इच्छितो, त्यांच्यासाठी पुरेशा राजकीय सहमतीची आवश्यकता असते. पण सत्ताधारी राजकीय पक्षाचे संसदेत बहुमत असणे त्यासाठी पुरेसे ठरत नाही. कारण पक्षात त्याबाबत वेगळी मते असू शकतात. मनमोहन सिंग यांचे या पुढचे वाक्य महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, जेव्हा तत्कालीन राजकीय नेतृत्व या प्रस्तावांच्या पाठीशी उभे राहते तेव्हाच सुधारणा घडून येतात. सिंग यांच्या म्हणण्यात शत प्रतिशत तथ्य आहे. १९९१मध्ये देशात आíथक सुधारणा करता येतात, कारण तेव्हा त्यापाठीमागे नरसिंह राव भक्कमपणे उभे असतात. याचाच पुढचा तर्कशुद्ध भाग असा, की सध्या आíथक सुधारणा करता येत नाहीत, कारण त्यापाठीमागे सोनिया गांधी ठामपणे उभ्या नसतात. यावर मनमोहन सिंग यांनी ही केवळ अभ्यासकी स्वरूपाची मांडणी केली आहे, असा प्रतिवाद कोणी करू शकेल. परंतु त्यांनी राव यांचे जे उदाहरण दिले, त्यातून त्यांना काय अपेक्षित आहे आणि आपल्या राजकीय व्यवस्थेचे दुखणे नेमके काय आहे, हे समजते. आता ते स्पष्ट बोलले नसतील, पण त्याने काही बिघडत काही. मुळातच ते बोलले आणि असे बोलले हेच केवढे झाले!
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित
मनमोहन यांचा सोनिया-वेध
नवी दिल्लीत परवा झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण झाले. तसे वरचेवर ते अशी भाषणे देतात. पण बोलतात मात्र कमीच! या वेळी मात्र ते बोलले आणि काय बोलले!
First published on: 02-08-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh close observation of sonia gandhi