सहाही विकारांमध्ये अडकल्याने भल्याभल्यांचा ‘परत्रमार्ग’ही रोधला जातो. अर्थात त्यांना मोक्षप्राप्ती होत नाही. हा जो ‘मोक्ष’ आहे, तो मागेच सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष जगतानाही अनुभवता आलाच पाहिजे. कोणत्याही अशाश्वत गोष्टीच्या आसक्ती-बंधनात नसणं, हाच मोक्ष आहे. जेव्हा या विकारांमध्ये खरा साधकही गुरफटत जातो तेव्हा असा ‘मोक्ष’ कसा शक्य आहे? त्यामुळे या सहाही विकारांचा संक्षेपानं मागोवा घेऊ. यातला पहिला विकार आहे काम. काम म्हणजे शारीरिक कामवासनाच फक्त नव्हे, तर काम म्हणजे कामना, इच्छा, हवेपणा, वासना. या षट्विकारांचा उल्लेख करताना समर्थानी श्रीमद्भगवद्गीतेचा हवालाही दिला आहेच. गीतेच्य दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे..
ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते।।
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्पणश्यति।।
विषयांच्या चिंतनात सदोदित गढून गेलो तर विषयांबाबत आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून त्यांच्या पूर्तीची इच्छा उत्पन्न होते आणि ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, तर क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाने संमोह, म्हणजे मोहाचा पूर्ण पगडाच उत्पन्न होतो आणि त्यामुळे खऱ्या ‘स्व’ची विस्मृती होते. उलट मी म्हणजे देहच, हा भ्रम निर्माण होतो आणि देहबुद्धीच्या विभ्रमातून सद्बुद्धीचा नाश होतो. सद्बुद्धीचा नाश झाला की माणसाचं पतन व्हायला वेळ लागत नाही! तेव्हा विकारांच्या खाईत मनुष्यजन्माचा मूळ परमहेतूच कसा विफल होतो, हे जाणवावं. या विकार वणव्याची ठिणगी फार सूक्ष्म असते आणि ही ठिणगी म्हणजे विषयांचं चिंतन! विषयांचं चिंतन सुरू होतं तेव्हा मग त्यांच्या पूर्तीची कामना निर्माण होते. विषयांच्या या पूर्तीसाठी एकमेव आधार असतो तो म्हणजे देह! त्यामुळे देहासक्तीतच माणूस अधिकाधिक गुंतत जातो. या देहासक्तीतून देहतादात्म्य निर्माण होतं. हे देहतादात्म्य आणि देहासक्त वासनाच साधकाच्या वाटचालीवर किती विपरीत परिणाम करतात, हे अनेकानेक संतांनी नमूद केलंच आहे. िनबरगी संप्रदायातील बोधाच्या आधारे य. श्री. ताम्हनकर यांनी ‘आचरण योग’ हा विस्तृत ग्रंथ लिहिला आहे. त्यात श्री. काकासाहेब तुळपुळे यांच्या ‘श्रीज्ञानेश्वरी : आत्मानंदाचे तत्त्वज्ञान’ या ग्रंथातील मजकूर उद्धृत केला आहे. हा मजकूरही त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. काकासाहेब म्हणतात, ‘‘देहतादात्म्य आणि वासना हेच त्रिगुणांचे आणि कर्माचे बंधन. हेच मूलभूत दुर्गुण आहेत. सर्व दुर्गुणांचा जन्म या दोन मूलभूत दोषांतून झाला आहे. जीवाला बद्ध करणारी, त्याला सुखदु:खांच्या आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पाडणारी माया म्हणजे हे दोन दोषच. त्यांचा त्याग करून मूळ आनंद स्वरूपाला पोहोचणे, हे जीवाचे ध्येय आहे. हाच मोक्ष.. मनुष्य अधिकाधिक विषयासक्त होत जाऊन त्याचे देहतादात्म्य दृढ होते. आत्मस्वरूपाचे विस्मरण, अज्ञान अधिकाधिक गाढ होत जाते. असा अज्ञान, देहतादात्म्य व विषयासक्ती किंवा दुर्गुण यांचा परस्परपोषक संबंध आहे.’’ म्हणजेच हे जे षट्विकार आहेत ते आणि त्यांची पूर्ती ज्या देहाच्या आधारे होते, असे वाटते तो देह यांच्याशी माणूस तादात्म्य पावतो तेव्हाच त्रिगुणांच्या कचाटय़ात आणि कर्मबंधनात तो वेगानं सापडतो. या दोन गोष्टींमुळेच जीव समस्त द्वैताच्या बंधनात पडला आहे. त्यामुळेच जन्म-मृत्यूपासून सुख-दु:खापर्यंत अनेक द्वैतमय अनुभवात तो भरडला जात आहे. त्यामुळे देहातीत, त्रिगुणातीत, द्वैतातीत अशा स्वतंत्र मुक्त स्थितीपासून तो वंचितच आहे. ‘मी’ खरा कोण आहे, याचं भान लोपून ‘देहच मी’ या संकुचित भावात तो बद्ध असल्यानं सदैव अज्ञानाचंच पोषण होत आहे.
– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas swami philosophy
First published on: 03-03-2016 at 03:52 IST