हा सद्गुरू कसा असतो? त्याचं वाणीरूप आणि चिंतनरूप कसं असतं? मनोबोधाच्या ५२व्या श्लोकात त्याचं मनोज्ञ दर्शन समर्थ घडवितात. ते म्हणतात, ‘‘क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें। न लिंपे कदा दंभवादें विवादें। करी सूखसंवाद जो ऊगमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।’’ हा जो सद्गुरू आहे त्याचा वेळ तत्त्वचिंतनात आणि त्या तत्त्वालाच धरून बोलण्यात जात असतो. आता हे तत्त्व म्हणजे ‘तत्त्वमसि’, असा अर्थ समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी ‘मनोबोध’ या ग्रंथात नमूद केला आहे. या चराचराचं जे परमतत्त्व आहे ते मीच, या महासिद्धांताचं चिंतन, असा याचा अर्थ. आता सद्गुरूतत्त्वाचं व्यापकत्व आपण गेल्या काही भागांत जाणून घेत आहोतच. त्यानुसार विचार केला तर ‘ते तत्त्व मीच आहे,’ याचं चिंतन ‘करण्याची’ त्यांना काय जरूर? पण लोकांना भक्ती शिकवण्यासाठी, अशाश्वताच्या ओढीत गुंतलेल्या आणि गुरफटलेल्या लोकांना शाश्वताकडे वळविण्यासाठी सद्गुरू महासिद्धांत उघड करतात आणि त्याचं चिंतन कसं करावं, हे शिकवतात. बरं नुसतं उच्च चिंतन साधून तरी काय उपयोग? ते चिंतन आपल्या व्यवहारातूनही प्रकट झालं पाहिजे ना? उत्तम विचार साधला, उत्तम चिंतन साधलं, पण बोलणं कोतं असलं, हिणकस असलं, संकुचित असलं, तर काय उपयोग? म्हणूनच जे चिंतन करतो, जो विचार करतो तो प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यातही प्रतिबिंबित होतो का, याबाबत सद्गुरू आपल्याला जागरूक करीत असतात. बरं, जे उच्च तत्त्व उमगलं ते आचरणात तर आलं नाही, पण दुसऱ्याशी वाद घालायला त्याचा आपण ढालीसारखा उपयोग करीत राहातो. किंवा त्या तत्त्वाच्या आधारे आपलंच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची धडपड करीत असतो. असा दांभिकपणा पोसणाऱ्या वाद किंवा वितंडवादाची सद्गुरूंना घृणा आहे! अशा वादापासून शिष्यानं अलिप्त व्हावं, असंच त्यांना वाटतं. उलट माणसानं आपल्या जीवनाकडं अधिक सजगतेनं पाहावं, असं त्यांना वाटतं. माणसानं आपल्या जीवनाचंही जर अलिप्त निरीक्षण सुरू केलं तरी तो अंतर्मुख झाल्याशिवाय राहाणार नाही! या जीवनाचं मूळ काय आहे, या सृष्टीचं मूळ काय आहे, आपण कोण आहोत, कुठून आलो, का आलो, आपल्या जन्माचं, जगण्याचं कारण काय.. या प्रश्नांचा खोल विचार सुरू केला तरी माणूस उगमाकडेच वळू लागतो! इथं सद्गुरू तर, ‘‘करी सूखसंवाद जो ऊगमाचा।’’ उगमाचा म्हणजे या सृष्टीचं जे मूळ तत्त्व आहे त्या परमतत्त्वाशी संवादी कसं व्हावं, हे स्वत:च्या आचरणातून दाखवतात! श्रीसद्गुरूंशी सुखसंवाद हा जणू उगमाशी, मूळ तत्त्वाशीच संवाद असतो! माणूस ज्या वातावरणात घडला असतो आणि आंतरिक पातळीवर ज्या वातावरणात वावरत असतो त्या वातावरणाचेच संस्कार त्याच्या सहवासातून घडतात. सद्गुरू हा परमतत्त्वाशीच अभिन्न जोडला असल्यानं त्याच्या सहवासातून त्या परमतत्त्वाचेच संस्कार शिष्यांच्या अंत:करणावर होतात. हा सहवास जितका दृढ असेल आणि साधक जितक्या सजगपणे त्या सहवासाचा लाभ घेत असेल तितके ते संस्कारही दृढ होतात. जगाच्या संस्कारांनुसार घडलेल्या साधकाच्या चित्तावर व्यापकत्वाचे संस्कार होऊ लागतात. ही खरी जडणघडण असते, पण जगाला मात्र हा बिघाड वाटतो! तुकाराम महाराज म्हणतात ना? ‘‘आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना!’’ आमी बी घडलो तसं तुमी बी घडाना! जगाला मात्र ही घडण मान्य नसते! ही खरी घडण या सहवासात सुरू होते. मूळ शाश्वत स्थितीत सदोदित निमग्न असलेल्या सद्गुरूंना शिष्याच्या आंतरिक प्रगतीबाबत किती कळकळ असते आणि त्यासाठी प्रसंगी ते कसे कर्तव्यकठोर होतात, याचं दर्शन पुढील चार श्लोकांतून होतं.
–चैतन्य प्रेम