भगवंताचा दास असा सद्गुरू आणि त्यांचा अनन्य दास असा सत्शिष्य, ही परंपरा सद्गुरू अखंड राखतात. आपण जेवढे म्हणून सत्पुरुष जाणतो त्या सर्वानीच सद्गुरूंची महती वर्णिली आहे. सद्गुरूंची भक्ती कशी करावी, हे त्यांच्या जीवनातून शिकता येतं. समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी, भाऊसाहेब उमदीकर महाराज आणि अंबुराव महाराज, श्रीगोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंदबुवा.. अशा गुरू-शिष्यांच्या अनेक जोडय़ांची परंपरा विराट आहे. ही सर्व चरित्रं अमरच असतात. अनंत काळ ती साधकाच्या भावाचं पोषण करतात. म्हणूनच समर्थ सांगतात की, सृष्टी आहे तोवर हे दोन्ही दास चिरंजीव राहातील. अर्थात सृष्टीच्या अंतापर्यंत आपल्या दासाच्या भावपोषणाची उपेक्षा सद्गुरू कदापि करणार नाहीत!

सद्गुरूंच्या कार्याचं व्यापकत्व २८ ते ३३ या श्लोकांत आपण पाहिलं. आता अशा सद्गुरूंच्या भक्तीच्या आड काय येतं, ते समर्थ ३४ ते ३७ या चार श्लोकांत सांगतात, त्याकडे वळू. ३४वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा :

उपेक्षा कदा रामरूपीं असेना।

जिवां मानवां निश्चयो तो वसेना।

शिरीं भार वाहेन बोले पुराणीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३४।।

प्रचलित अर्थ : राम कधीच भक्ताची उपेक्षा करीत नाही, पण मनुष्यचाच याबद्दल निश्चय होत नाही. मी भक्तांचा योग-क्षेम वाहातो, असं वचन रामरायानं अनेकदा दिल्याचे दाखले पुराणंही देतात. तो हा राघव भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

आता मननार्थाकडे वळू. श्रीसद्गुरूंचं विराट कार्य आणि आपल्या हितासाठीची त्यांची तळमळ पाहून साधकानं खरं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायला सुरुवात करायला हवी ना? पण ३३वा श्लोक सांगतो की, इतकं असूनही –  सद्गुरूंच्या स्वरूपातच लेशमात्र उपेक्षाभाव नसताना साधक मात्र त्यांची उपेक्षाच करतो! का? तर, ‘‘जिवां मानवां निश्चयो तो वसेना!’’ या  चरणातला प्रत्येक शब्द हा अचूक नेम धरून आहे. ‘‘उपेक्षा कदा रामरूपीं असेना। तरी मानवां निश्चयो तो वसेना।’’ असंही समर्थाना सांगता आलं असतं! पण इथं ‘तरी’च्या ऐवजी ‘जिवां’ हा शब्द आला आहे आणि तो मनुष्याच्या संकुचित मर्यादांच्या त्याच्यावरील व्यापक प्रभावाचंच सूचन करतो. त्याच्या जीवबुद्धीचा जीव फार लहान आहे, तरी ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीचं तिचं कार्य आणि तिचा प्रभाव मोठा आहे. जीव आहे म्हणून जीवन आहे.. ‘मी’ आहे म्हणून माझ्याभोवतालच्या जगाला अर्थ आहे.. त्यामुळे या जगाचा, या जीवनाचा केंद्रबिंदू ‘मी’च आहे! जीवन जसं आहे तसं त्याला सामोरं जाणं साधतच नाही. ‘मी’ला जसं हवं तशाच जीवनाच्या प्राप्तीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत धडपड सुरू असते. त्यामुळे जोवर या ‘मी’कडे खऱ्या अर्थानं लक्ष जात नाही, या ‘मी’ची खऱ्या अर्थानं छाननी होत नाही, तोवर जगाचं, जीवनाचं आणि त्यातल्या आपल्या असण्याचं खरं स्वरूप उकलत नाही.. खरं भान येत नाही. त्यामुळे माणसाच्या ‘मी’चा जीव कितीही लहान असला, तरी त्या जिवाच्याच आधारावर या ‘मी’चा संपूर्ण पसारा तगून आहे.. त्यामुळे या जीवबुद्धीच्या सांगण्याबाहेर जीव कधीच जात नाही. ही जीवबुद्धीच रामरूपावर.. काय शब्दयोजना आहे पहा! रामावर नव्हे, रामरूपावर! अर्थात सद्गुरूंवर संपूर्ण विसंबण्याच्या आड ही जीवबुद्धीच येते! ही जीवबुद्धीच सद्गुरू स्वरूपाची उपेक्षा करते.. ही जीवबुद्धीच सद्गुरूंना संपूर्ण समर्पित होऊन जगण्याच्या निश्चयाच्या आड येते.. ही जीवबुद्धीच या समर्पणाविषयी माणसाच्या मनात भीती निर्माण करते.. कारण खरं समर्पण म्हणजे ‘मी’चंच मावळणं.. ते तिला कसं सहन होणार?

-चैतन्य प्रेम