मुख्यमंत्री मोदींनी पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला राज ठाकरे यांच्याकडून का यावा हे स्पष्ट आहे.  मोदींच्या मुंबईतील सभेत राज ठाकरेंची मनसे काय किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना काय, या दोन्ही पक्षांचा उल्लेख मोदी यांनी करण्याचे टाळले. कदाचित याचा सल राज ठाकरे यांना असावा. ब्लू पिंट्रसारखे आकर्षक शब्द श्रोत्यांपुढे फेकून नंतर त्याबद्दल काहीही करून न दाखवता विसरून जायचे, हे मनसेचे नित्याचे झाले आहे. मनसेमध्ये जरा कुठे संथपणा येण्यास सुरुवात होते, असे वाटले की टोलवसुलीसारख्या विषयावर आंदोलन करून अस्तित्वाची लोकांना आठवण करून द्यायची. रिक्षा, रेल्वे भरती इ. प्रश्नावर कसलाही विचार न करता आंदोलन करून समस्या वाऱ्यावर सोडून देऊन दुसरेच प्रश्न उपस्थित करायचे, हा राज ठाकरे यांचा खाक्या आहे. राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने येणाऱ्या पाच वर्षांत अंतर्मुख होऊन लोकोपयोगी राजकारणाचा अभ्यास करावा, असे त्यांना सांगण्याची पाळी आली आहे.
मुरली पाठक, विलेपार्ले पूर्व

आत्मा आणि मानवी मेंदू
‘मनमोराचा पिसारा’ या सदरातील  ‘ही प्रेरणा कोणाची?’ या लेखात, (७ जाने.) ‘केनेषिता वाचमिमां वदन्ति? चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति?’ ( लोक ज्या वाणीने बोलतात त्या वाणीला बोलण्यासाठी कोण प्रवृत्त करतो? डोळ्याला आणि कानाला – त्या त्या कामासाठी- कोण नियुक्त करतो?) या केनोपनिषदातील श्लोकासंदर्भात डॉ. राजेंद्र बर्वे लिहितात, ‘कर्मेद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांचा समूह म्हणजे शरीर, बुद्धी आणि मन. यांना चेतना देणारी कोणी तरी चतन्यशक्ती असावी.. ही आत्मशक्ती तर नव्हे?’ त्यांची ही शंका रास्त आहे.
प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्य कोणते (जसे कानांचे ऐकणे) हे सहज समजते. तसेच मन, बुद्धी या अमूर्त गोष्टींविषयी काही कल्पना करता येते. मात्र या सर्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूविषयीचे ज्ञान हे अगदी अलीकडचे, म्हणजे गेल्या २०० वर्षांतील आहे. उपनिषद काळी मेंदूविषयी काही ठाऊक असणे शक्यच नव्हते. आपले वेद, उपनिषदे, गीता यांत ‘मेंदू’ अथवा त्या अर्थाचा कोणताही शब्द आढळत नाही. अन्य प्राण्यांच्या डोक्याच्या कवटीत मगज असतो तसा माणसाच्या कवटीतही असणार हे कळत होते. पण शरीरातील सर्व क्रिया, सर्व इंद्रियांच्या हालचाली, ज्ञानेंद्रियांचे कार्य नियंत्रित करण्याची यंत्रणा या मगजात असेल याची त्या काळी, आणि नंतर तीन सहस्र वष्रे, कुणालाच कल्पना नव्हती.
ज्यात शंभर अब्ज मज्जापेशी आहेत असा मानवी मेंदू हे जगातील सर्वात आश्चर्यकारक, गूढ-गहन असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. डोक्याच्या कवटीत सुरक्षित असलेल्या मेंदूचे कार्य, कुणाला थांगपत्ता लागू न देता, अविरत चालू असते. पण मन, बुद्धी, स्मृती, चेतना यांचे अधिष्ठान शरीरात कुठे तरी आहे, असे ऋषी-मुनींना वाटत होते. म्हणून त्यांनी हृदयस्थ आत्म्याची कल्पना केली. गीतेत श्रीकृष्णाच्या मुखी आहे, ‘सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो। मत: स्मृतिज्र्ञानमपोहनं च। ’ (सर्वाच्या हृदयात आत्मारूपाने मी आहे. माणसाच्या स्मृती आणि चिकित्सक बुद्धी (अपोहन) यांचा उद्गम माझ्यातून होतो.) यावरून उपनिषदांतील आत्मा म्हणजे विज्ञानाला आता ज्ञात झालेला मेंदू हे स्पष्ट होते. यावरून ‘सोऽहम्। अहं स:।’ ही वैज्ञानिक सत्ये ठरतात. कारण मी म्हणजे माझा मेंदू हे नि:संशय!  डॉ. बर्वे यांना वाटणारी चतन्यशक्ती ती हीच.
प्रा. य. ना. वालावलकर

कलुषेगिरीत कमी-जास्त!
‘कलुषा कुलगुरू’ हा अग्रलेख वाचला. त्यात अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत, ते आजच्या महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांनाही लागू पडतात. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांनी प्रा. नीरज हातेकर यांची कोणतीही बाजू न ऐकता निलंबन केले आहे. ते अयोग्य असून गुणवत्ताविरोधी कुलगुरूंवर कारवाई झाली पाहिजे. मुंबई विद्यापीठात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वेळुकर हे प्रा. हातेकर यांच्यासारखे संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करीत आहेत. हातेकरांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे काम शासनकर्त्यांनी केले पाहिजे.
गणेश ल. पिटेकर, औरंगाबाद</strong>

भरती होईल, पण कोणत्या आकडेवारीवर?
‘पात्र शिक्षकांची भरती होईपर्यंत महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया थांबवा’ (८ जानेवारी) ही बातमी वाचली.  मुळात महाविद्यालयांना पात्र शिक्षक भरण्याचा आदेश व परवानगी देण्याचे काम सरकारचे आहे. आज अनेक महाविद्यालये सरकारकडे जागा भरण्यासाठी परवानगी मागत आहेत. पण, सरकार परवानगी देत नाही. सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार १९९७-९८ साली महाविद्यालयांमध्ये जितके विद्यार्थी होते त्या संख्येनुसार शिक्षक भरायला परवानगी देण्यात येते. त्यातही अनेकदा अडवणूक केली जाते. २०१४ साल उजाडले तरी १९९८ च्या विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षक भरणे हे कोणते शैक्षणिक धोरण? आज राज्यात शिक्षणाची क्रूर चेष्टा चालू आहे. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
विद्यार्थिसंख्या प्रचंड वाढली आहे व त्यानुसार शिक्षकांचीही गरज आहे. पात्र उमेदवारही उपलब्ध आहेत. त्यांची अपेक्षा नियमानुसार पगार मिळावा अशी असते व ती रास्तही आहे. महाविद्यालये त्यांच्या स्तरावर नियमानुसार पगार देऊ शकत नाहीत. कमी पगारावर पात्र उमेदवार काम करण्यास राजी नसतात.  सरकारचे विनाअनुदान धोरण या सर्व गोष्टींना जबाबदार आहे.  त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये सध्याच्या स्थितीला अपात्र उमेदवारांचा भरणा दिसेल.
न्यायालयाने सरकारला महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा आणि आजच्या विद्यार्थिसंख्येनुसार पात्र शिक्षकांची भरती करण्याचा आदेश देणे गरजेचे आहे.
संदेश दशरथ कासार, अकोले

कायरेत्तर मंजुऱ्यांचा (अ)विचार
‘अविचारी विचार’  या अग्रलेखात (१० जानेवारी) शासनाच्या निर्णय प्रक्रियेत वेग हवा असा (उपरोधिक) सल्ला आहे. वेगवान निर्णय प्रक्रिया कशी असू शकते याचे एक प्रकरण माहिती अधिकारात उपलब्ध कागदपत्रांवरून अवगत झाले आहे. ते उदाहरण म्हणून नमूद करीत आहे-
 २९ मे १९९८ च्या शासन निर्णयाद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वष्रे करण्यात आले. हा निर्णय जारी झाल्यानंतर मंत्रिमंडळाने यास २ जून १९९८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बठकीत कार्योत्तर मंजुरी दिली. कार्योत्तर मंजुरी देण्याबाबतची तरतूद नियमांमध्ये नाही, असेही माहिती अधिकारात प्राप्त उत्तरामध्ये नमूद केले आहे.
यावरून एक बाब स्पष्ट होते की सरकारला जर एखादा ‘लोकहितास्तव’ निर्णय घ्यायचा असेल तर नियमांची आडकाठी नसते.
रवींद्र भागवत, सानपाडा (नवी मुंबई)
loksatta@expressindia.com