सध्याचे सर्वोच्च कॅथलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना जगाच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीची उत्तम जाण आहे आणि दक्षिण अमेरिकेत तर त्यांनी ख्रिस्ती धर्मोपदेशातून लोकांना राजकीय संघर्षांसाठी मानसिकदृष्टय़ा तयार केले आहे. ‘लिबरेशन थिऑलॉजी’ या विचाराचे पाईक असल्याने प्रभुसेवेइतकेच माणसांना सक्षम बनवणे आणि समन्यायी जगासाठी प्रयत्न करणे हेही महत्त्वाचे असते, हे या पोपना माहीत आहे. त्यामुळेच पॅलेस्टाइनला व्हॅटिकनने अलीकडेच ‘राष्ट्र’ अशी मान्यता दिली आणि त्या भूमीवर एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या दोघा धर्मसेविकांना ‘संतपद’ बहाल करण्याचा मोठा सोहळादेखील सोमवारी घडवून आणला, तोही पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या उपस्थितीत. पॅलेस्टाइन अस्थिर आणि हिंसाग्रस्त (आणि हिंसाखोरही) असू नये, यासाठी व्हॅटिकनही प्रयत्नशील असल्याचे यातून दिसले. अब्बास यांना पोप ‘शांतीचे दूत’ म्हणाले, पण प्रत्यक्षात या धर्मकारणाचा परिणाम किती होईल हे अब्बासदेखील सांगू शकणार नाहीत आणि पोपही. या निमित्ताने पोप फ्रान्सिस यांनी लक्ष वेधले ते या संतांच्या सामाजिक सेवेकडे. मारी अल्फोन्साइन घटास आणि मरियम बवार्दी या दोघी समाजातील दीनदुबळय़ांची सेवा हीच प्रभुसेवा मानत, त्यातही घटास या तर ख्रिस्ती आणि इस्लामी लोकांमधील आदानप्रदान आणि ताणेबाणे यांचे प्रतीक ठरल्या आहेत, मानवसेवेलाच महत्त्व दिल्यामुळे दोघीही धर्माचा खरा अर्थ जाणू शकल्या, हे पोप यांनी अधोरेखित केले. त्यात तथ्यही आहे, परंतु या दोघींना संतपद देण्यासाठी व्हॅटिकनमध्ये झालेल्या कार्यक्रमात पोप जाहीरपणे जे बोलले ते अर्धसत्यच म्हणावे लागेल. कॅथलिक संतपद चमत्कारांविना मिळत नसते. या दोघींनीही चमत्कार केल्याचे सिद्ध करून दाखवले गेल्यानंतरच त्यांना संतपद मिळाले आहे. मरियम बवार्दी यांच्या हातांतून रक्त येत असे, ‘त्या जणू येशूच्या जखमा होत’ असा अर्थ लावून तो चमत्कार मानला गेला, तर मारी अल्फोन्साइन घटास यांचा जीवनकाळ १८४३ ते १९२७ असा असला तरी सन २००९ मधील एक ‘चमत्कार’ त्यांच्या नावे गुंफला गेला. सहा वर्षांपूर्वी एका पॅलेस्टिनी तरुणाच्या मेंदूला अपघातात जबर मार लागल्यावर तो आता बेशुद्धावस्थेतच जगेल, असे डॉक्टर म्हणत असताना ‘त्याच्या बहिणीने मारी अल्फोन्साइन यांचा धावा केल्यामुळे’ हा तरुण खडखडीत बरा झाला, असा चमत्कार पोप यांच्या आधिपत्याखालील व्हॅटिकनमध्ये आता मान्य झाला आहे. केवळ चमत्कार नाहीत म्हणून नोबेल पारितोषिक विजेत्या ख्रिस्ती धर्मप्रचारक मदर तेरेसा यांना ‘संतपद’ (कॅननायझेशन) ऐवजी ‘आदरणीय पद’ (बीटिफिकेशन) देण्यात आले होते. जनसेवा म्हणजे स्वधर्मीयांची सेवा, हा समज मोडून काढत मध्ययुगीन संत फ्रान्सिस असिसीने सेवेमधून धर्मप्रसाराचा संदेश दिला, तेच मदर तेरेसा यांचे प्रेरणास्थान आणि पोप यांनी तर ‘फ्रान्सिस’ हे नावदेखील संत असिसींच्या स्मरणार्थ घेतलेले आहे. मात्र असिसीच्या गोष्टींमध्येही त्यांच्या हिंसेतून अहिंसेकडे झालेल्या प्रवासाला कमी महत्त्व मिळते. चमत्कार महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच ‘मदर तेरेसांना २०१६च्या सप्टेंबरात नक्की संतपद मिळणार’ या बातमीमुळे भारतीयांना होणारा आनंददेखील अर्धामुर्धाच उरतो. चमत्कार कशाला म्हणावे, याचे नियम पोप फ्रान्सिस यांच्या काळात काहीसे शिथिल झाल्यास नवल नाही. परंतु हे धर्मनियम पूर्णत ओलांडणे कुणालाच जमणारे नसल्याने ती धर्मकारणाची मर्यादा ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother teresa to be declared saint in september
First published on: 19-05-2015 at 01:01 IST