अर्थव्यवस्था हा कोणत्याही व्यवस्थेचा पाया आहे. तो मजबूत ठेवायचा असेल तर प्रत्येकाने काळानुरूप बदलण्यास पर्याय नाही. डेट्रॉइट शहराला हे साधले नाही अन् त्यावर दिवाळखोरीची नामुष्की ओढवली आहे. अर्थव्यवस्थेचे महत्त्व जाणून डेट्रॉइट कदाचित सावरेलही मात्र, असेच भागधेय असलेली मुंबई यातून काही धडा शिकेल?
व्यक्तीप्रमाणेच शहर, प्रांत वा देशासदेखील कधी ना कधी अस्तित्व मिटवू पाहणाऱ्या क्षणास सामोरे जावे लागते. एके काळी पश्चिमेचे पॅरिस अशी ओळख असलेल्या अमेरिकेतील डेट्रॉइट या मोटारनगरीबाबत असा क्षण आला आहे. अमेरिकेतील सर्वात मोठे, जगातील एक नव्हे तर तीन तीन बलाढय़ मोटार कंपन्यांची मुख्यालये मिरवणारे आणि जगभरातील उच्चभ्रूंच्या स्वप्नांना चार चाकांवर आकार देणारे मिशिगन राज्यातील हे शहर आता दिवाळखोरीत निघाले असून त्याच स्वप्नांच्या राखेत नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एके काळी फ्रेंच आणि कॅनडाच्या अभियंत्यांनी या शहराची निर्मिती केली. फ्रेंच नावांप्रमाणेच या शहराचेही नाव भले मोठे होते. परंतु इंग्रजांनी ताब्यात घेतल्यावर त्याचे शेपूट कापले आणि सुटसुटीत डेट्रॉइट असे त्याचे नामकरण केले. १९००वे साल सुरू होताना अटलांटिकच्या पलीकडे जर्मनीत रुडॉल्फ डिझेल या अभियंत्याने खनिज तेलावर चालणारे इंजिन विकसित केल्यावर आधुनिक मोटारींचा जन्म झाला. त्याच जर्मनीत बेंझ आणि मर्सिडीज या जोडगोळीने मोटार विकसित केली, तर अमेरिकेत हे काम केले हेन्री फोर्ड यांनी. डेट्रॉइटमधील व्यापार विकासाचा वेग त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी याच शहरात आपला मोटारनिर्मितीचा कारखाना स्थापन केला. डेट्रॉइट या शहरास वसवणाऱ्यांपैकी एका फ्रेंच अधिकाऱ्याचे नाव अंतोन द ला मॉथ कॅडिलॅक. पुढे त्यालाच आदरांजली म्हणून फोर्ड यांनी या शहरात मोटारनिर्मिती सुरू केल्यावर आपल्या अत्यंत श्रीमंती मोटारीस कॅडिलॅक हे नाव दिले. मर्सिडीजचा प्रसार होईपर्यंत जगभरातील श्रीमंतांसाठी लांबलचक कॅ डिलॅक बाळगणे हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जात होते. फोर्ड यांच्याप्रमाणेच अन्य मंडळीही वाहननिर्मिती आणि संबंधित क्षेत्रात उतरली. त्यातील तीन नावे सर्वपरिचित. ती म्हणजे डॉज, पॅकार्ड आणि ख्राईस्लर. या तिघांचीही नावे मोटारींची विशेषनामे बनली. हे सारे घडले ते डेट्रॉइट याच शहरात. पुढे याच शहरात धाकटय़ा मार्टिन ल्युथर किंग यांचे.. माझे एक स्वप्न आहे.. हे उद्गार निघाले. त्यामागे कारण होते ते या शहरातील मोटारनिर्मिती कारखानेच. १९४० च्या दशकात दुसऱ्या महायुद्धाने जग झाकोळले गेले असताना पॅकार्ड यांच्या डेट्रॉइटमधील मोटार कारखान्यात संप झाला. त्याला कारण होते तीन कृष्णवर्णीयांना मिळालेली पदोन्नती. या बढतीमुळे हे अफ्रिकी कृष्णवर्णीय आणि अमेरिकी गोरे यांना एकाच पंक्तीत आणले गेले. त्यामुळे गोऱ्यांचा संताप झाला आणि त्यांनी काम बंद सुरू केले. त्याचीच परिणती काळे आणि गोरे यांच्यातील दंगलीत झाली. नंतर याच शहरात भरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात रोनाल्ड रेगन या अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याची अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली. या शहराची मोहिनी इतकी की फोर्डप्रमाणेच जनरल मोटर्स आणि ख्राईस्लर या तीन बलाढय़ मोटार कंपन्यांची मुख्यालयेही डेट्रॉइटमध्ये होती. यंत्रोत्पादन क्षेत्रात डेट्रॉइट या शहराने नोंदलेली अचाट कामगिरी अमेरिकेस महासत्तापदाजवळ जाण्यास लक्षणीयरीत्या कारणीभूत ठरली. या शहराचे मोठेपण इतके की अमेरिकी नौदलाच्या अत्यंत सामथ्र्यशाली विनाशिकेस डेट्रॉइट असेच नाव देण्यात आले.
परंतु पुढे काळ बदलला आणि अर्थव्यवस्थेच्या नव्या दिशेने डेट्रॉइट कालबाहय़ ठरत गेले. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष निर्मिती करण्याऐवजी ती मागास वा विकसनशील देशांकडून करून घ्यायची आणि फक्त जुळणीचे काम आपण करायचे असे धोरण अनेक अमेरिकी मोटार कंपन्यांनी अवलंबिले. अर्थशास्त्रीयदृष्टय़ा ते योग्यच होते. त्यामुळे अमेरिकी भांडवल मोठय़ा प्रमाणावर अधिक निर्मितीक्षम अशा अन्य क्षेत्रांकडे वळवले गेले आणि कमी मानवी गुंतवणुकीत अधिक उत्पादन शक्य झाले. याचा परिणाम असा झाला की अमेरिकी कंपन्या o्रीमंत होत गेल्या आणि डेट्रॉइट उत्तरोत्तर गरीब होत गेले. ज्या शहरात एके काळी ८५ हजारांहून अधिक कामगार मोटार कंपनीत काम करीत त्या कामगारांची संख्या एकदशांशदेखील राहिली नाही आणि नंतर तर हळूहळू डेट्रॉइट ओसाडच होत गेले. पन्नाशीच्या दशकात या शहरात साठ टक्क्यांहून अधिक गोरे राहत. आज त्याच शहरात ८२ टक्के अफ्रिकी अमेरिकन्स राहतात आणि त्यातील जवळपास सर्व बेरोजगार आहेत. परिणामी गुंडगिरी आणि लुटालूट यांना ऊत आला असून अमेरिकेतील सर्वात अकार्यक्षम पोलीस यंत्रणा या शहरात आहे.
हे असे झाले याचे कारण उत्पादक आणि कर भरण्याची क्षमता असलेल्यांनी डेट्रॉइटचा निरोप घ्यायला सुरुवात केली. अर्थव्यवस्थेचे केंद्रच स्थलांतरित झाल्याने जनतेला त्या शहरात राहण्यात स्वारस्य न उरणे नैसर्गिकच होते. परिणामी नगरपालिकेचे उत्पन्न घटू लागले आणि किमान सोयीसुविधा पुरवण्याची ताकददेखील या शहराची नगरपालिका हरवून बसली. अमेरिकी व्यवस्थेत शहरांना आणि राज्यांनाही आपापल्या खर्चाची तोंडमिळवणी स्वत:लाच करावी लागते. त्यामुळे ही शहरे स्वयंपूर्ण होतात आणि केंद्रीय व्यवस्थेवर अवलंबून राहत नाहीत. याचीच दुसरी बाजू ही की या शहरांना आर्थिक आपत्तीस स्वत:च्याच हिमतीवर तोंड द्यावे लागते. डेट्रॉइटच्या बाबत हेच होत असून आवश्यक ती किमान आर्थिक क्षमता न उरल्याने या शहरावर एखाद्या उद्योगाप्रमाणे दिवाळखोरी जाहीर करायची वेळ आली. एकदा अशी दिवाळखोरी अधिकृतपणे जाहीर झाली की वित्तसंस्था त्या व्यवस्थेचा ताबा घेतात आणि अत्यंत कठोरपणे आर्थिक शिस्त राबवून गाडा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. ते जमले नाही तर मग सरकार हस्तक्षेप करते आणि सर्व उपाय खुंटल्यावरच कर्जमाफी आदी मार्ग अवलंबिले जातात.
तेव्हा या डेट्रॉइटने जगातील अनेक शहरांसाठी धडा घालून दिला आहे. त्यातील महत्त्वाचा हा की अर्थव्यवस्था हा कोणत्याही व्यवस्थेचा पाया आहे. तो मजबूत ठेवायचा असेल तर प्रत्येकाने काळानुरूप बदलण्यास पर्याय नाही. हे असे काळानुरूप कसे राहायचे हे अनेक शहरांनी दाखवून दिले आहे. आज जी डेट्रॉइटची अवस्था झाली आहे तीच चारपाच दशकांपूर्वी न्यूयॉर्कची होती. गुंडपुंडांच्या मोकाट टोळय़ा आणि शहरभर माजलेले गर्दुल्ले हा न्यूयॉर्कचा चेहरा होता. अशाच दिवाळखोरीनंतर न्यूयॉर्कने कात टाकली आणि आज जगातील ऐश्वर्याचे प्रतीक अशी आपल्या शहराची प्रतिमा बनवली. क्लेव्हलँड, ओहायो या शहरांनाही याच अवस्थेतून जावे लागले. पॅरिसनेही असाच काळा कालखंड अनुभवला. दुसऱ्या महायुद्धानंतर लंडनची आणि सोव्हिएत रशियातील स्टालिनग्राडची अवस्था काही वेगळी होती असे नाही. परंतु त्यातूनही ही शहरे उभी राहिली आणि पुढे ती सुसंस्कृत मानवी संस्कृतीची प्रतीके बनली. हे परिवर्तन होऊ शकले ते एकाच कारणाने. अर्थव्यवस्थेचे महत्त्व त्या त्या नगरपित्यांना समजले म्हणून.
आज मुंबई हे आपले खऱ्या अर्थाने एकमेव महानगर डेट्रॉइटच्या मार्गानेच निघालेले आहे. अर्थव्यवस्थेची दिशा बदलल्याने स्थलांतर करणारे नागरिक आणि उद्योग हे डेट्रॉइटप्रमाणेच मुंबई शहराचे भागधेय बनले आहे. डेट्रॉइट शहरात आज ७६ हजार घरे रिकामी आहेत तर मुंबईत दीड लाख. डेट्रॉइटचा ताबा गुंडांच्या हाती आहे तर मुंबईचा पुंड कंत्राटदारांच्या. डेट्रॉइट नगरपालिका खंक झाली  आहे, तिच्याकडे शहरासाठी पैसे नाहीत तर २७ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका  ६५ टक्के रक्कम फक्त वेतनावर खर्च करीत असल्याने तिच्याकडेही शहराच्या विकासासाठी निधी नाही.
फरक इतकाच की डेट्रॉइट अमेरिकेत आहे आणि मुंबई ही अर्थव्यवस्थेला कवडीमोल लेखणाऱ्या भारतात. त्याचमुळे आज जरी डेट्रॉइटची अवस्था ..भिंत खचली, कलथून खांब गेला.. अशा उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी झाली असली तरी भविष्य आश्वासक आहे ते डेट्रॉइटचेच. त्याचमुळे आपला काही थेट संबंध नसला तरी त्या शहराच्या मृत्यूचे सुतक हे आपण अधिक गांभीर्याने पाळायला हवे.