ओसामा बिन लादेनने अल्-शबाबच्या नेत्यांना ७ ऑगस्ट २०१० रोजी एक पत्र पाठविले होते. त्यात त्याने म्हटले होते, की अल्-कायदाच्या इराकमधील मित्रसंघटनेप्रमाणे तुम्ही, आपण अल्-कायदाचा एक भाग आहोत असे जाहीर सांगू नका. कारण मग त्याने शत्रूचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि श्रीमंत अरब राष्ट्रांतून निधी गोळा करणे अधिक कठीण होऊन बसेल. अल्-कायदा आता एक संघटना म्हणून संपल्यात जमा आहे. अयमान अल्-जवाहिरीकडे ओसामाचा करिश्मा नाही. पण अल्-कायदाचा आता जणू एक सलसर ‘महासंघ’ तयार झाला आहे. इराकमधील अल्-कायदा (एक्यूआय), नायजेरियातील बोको हराम, सोमालियातील अल्-शबाब, पाकिस्तानी तालिबान अशा संघटनांचा त्यात समावेश आहे आणि अल्-कायदाशी निगडित असल्याचा त्यांना लाभच होत आहे. इराक आणि अफगाणिस्तानात संपूर्ण अव्यवस्था निर्माण केल्यानंतर अमेरिकेने तेथून काढता पाय घेतलेला आहे. अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांशी अमेरिका चर्चा करीत आहे आणि पाकिस्तान एकामागोमाग एक तालिबानी नेत्याला तुरुंगातून मुक्त करीत आहे. अल्-कायदाचे संपूर्ण नाव अल्-कायदा अल्-जिहाद असे आहे. याचा अर्थ जिहादचा तळ. अफगाणिस्तानला पुन्हा एकदा जिहादचा तळ बनण्याच्या मार्गावर नेण्याचेच हे प्रयत्न आहेत की काय अशी शंका यावी, अशी सध्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे सीरियात बशर अल्-असाद या शियापंथीय नेत्याविरोधात बंडखोरांनी युद्ध छेडलेले आहे. त्यात इराकी अल्-कायदा या सुन्नींच्या संघटनेचा सक्रिय सहभाग आहे आणि या बंडखोरांना अमेरिकेचा पाठिंबा आहे, असे चित्र आहे. मध्य-पूर्वेतील ही परिस्थिती, तर तिकडे आफ्रिकेतील सोमालिया या प्रामुख्याने कुपोषणाबद्दल कुख्यात असलेल्या देशात अल्-शबाबने धुमाकूळ घातलेला आहे. काल-परवापर्यंत निम्मा सोमालिया या संघटनेच्या आधिपत्याखाली होता. आज परिस्थिती बदललेली आहे. इथिओपिया, केनिया, तसेच आफ्रिकन युनियन फोर्सच्या लष्कराने अल्-शबाबचे कंबरडे मोडले आहे. या लष्कराला पाश्चात्त्य राष्ट्रांचा – त्यात अमेरिकाही आलीच – पाठिंबा आहे. सोमालियात बंडखोरांना विरोध, लिबिया, सीरिया येथे पाठिंबा आणि अफगाणिस्तानात हातमिळवणी असे अमेरिकेच्या ‘दहशतवादविरोधी युद्धा’चे सध्याचे स्वरूप आहे. या पाश्र्वभूमीवर नरोबीतील दहशतवादी हल्ल्याकडे पाहिले, की त्यांची  ‘अपरिहार्यता’ लक्षात येते आणि पूर्वीप्रमाणेच यापुढील हल्लेही अमेरिकेला साथ देणाऱ्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांनाच प्रामुख्याने    सहन करावे लागणार हेही स्पष्ट होते. अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशांत हल्ले करणे कठीण असल्याने दहशतवाद्यांचे लक्ष्य अमेरिकेची देशबाह्य ठिकाणे वा मित्रराष्ट्रे हेच असणार आहे. नरोबीतील हल्ल्याने मुंबई हल्ल्याच्या स्मृती ताज्या केल्या. असे हल्ले आणि बॉम्बस्फोट यांनी होणारी जीवितहानी सारखीच असली, तरी अशा हल्ल्यांचे घाव   अधिक खोल असतात. ते राष्ट्राच्या आत्मसन्मानास जखमी करणारे असतात. पण अशा आधीच्या घटनांतून तिसरे जग कोणताही धडा घेत नाही, हेच या हल्ल्यातून दिसले आहे. नरोबीत जे झाले, ते दिल्ली वा मुंबईतही होऊ शकते. ही अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु बॉम्बस्फोटातील आरोपी पोलिसांच्या हातावर सहज तुरी देतात, लष्करी गुप्तहेर विभाग सरकार पाडण्याची कारस्थाने करतात, आयबीचे अधिकारी बनावट चकमकींचे नेतृत्व करतात आणि रॉचे गुप्तहेर ‘चांगल्या’ देशातील ‘पोस्टिंग’साठी राजकारणे करण्यात मग्न असतात, हे ज्या देशात घडते तेथे असे हल्ले कोण आणि कसे टाळणार?