‘सम्यक’ – निसर्ग : एक शुद्ध भंकस

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला ‘घाट’ असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला ‘घाट’ असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ मानवीच भावना आहेत.  निसर्गनियमांत त्यांना तसूभरसुद्धा स्थान नाही. मनुष्याचा मुख्य स्वभावधर्म, अंतर्बाहय़ कृत्रिमता निर्मिणे हाच आहे. कृत्रिमतेला हीनार्थ चिकटविणे, म्हणजे संस्कृती (आंतरिक) व समृद्धी (बाहय़) या दोन्हींना नाकारणे होय. त्यातूनच माणूसघाणे निसर्गप्रेम उद्भवते.
टू-स्ट्रोक इंजिन फोर-स्ट्रोकपेक्षा स्वस्तात बनते. यात उत्पादक आणि ग्राहक म्हणून फायदा असतो, पण या इंजिनची कार्यपद्धती सदोष असते. अर्धवट जळके पेट्रोल बाहेर फेकले जाते व कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू हवेत सोडला जातो. हा तोटा मात्र अनामिक अशा अनेकांना झेलावा लागतो.  
उद्योगांत कोणतेही तंत्र अवलंबिताना, त्याचे जे लाभ व ज्या हानी ध्यानात घेतलेल्या असतात, त्याहून अनपेक्षित परिणाम आढळून येतात. त्यातून शिकून सतत दुरुस्ती करावी लागते. विशेषत: जेव्हा लाभ, उद्योजकाच्या/ग्राहकांच्या वाटय़ाला आणि अप्रत्यक्ष ‘हानी’(कॉस्ट) तिसऱ्याच कोणा अनामिक नागरिकांच्या वाटय़ाला येते, तेव्हा तंत्राची निवड ही गोष्ट, नुसत्या परस्परसंमतीने होऊ देऊन भागत नाही. अनामिक हानिग्रस्तांवर होणारा, तसेच अद्याप जन्मालाच न आलेल्या पुढील पिढय़ांवर (संसाधन-उधळपट्टीद्वारे) होणारा, अन्याय रोखण्यासाठी, तंत्राची निवड करण्याबाबत, राजकीय हस्तक्षेप आवश्यक ठरतो. या संदर्भात जागरूक राहणे, एवढाच अर्थ जर पर्यावरणवादाला असेल, तर त्याविषयी तत्त्वत: कोणतीच तक्रार असण्याचे कारण नाही. अशा सुयोग्य पर्यावरणवादाला आपण ‘मानवकेंद्री व प्रबुद्ध-आíथक पर्यावरणवाद’ असे म्हणू. परंतु काही पर्यावरणवादी प्रवाह, ही सीमा ओलांडून व गूढवादाचा आश्रय घेऊन, ‘स्वत:ला ‘सम्यक’ (नॉर्मल) राखण्यासाठी धडपडणारा निसर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे व त्याची हाक फक्त ‘आम्हालाच’ ऐकू येते,’ अशा थाटात प्रचार करतात. नॉर्मल म्हणजे अ‍ॅव्हरेज नव्हे, तर ‘जसे असायला हवे तसे’! सम्यक आहार, सम्यक विहार इत्यादी सांगताना बुद्धाने जसा वापरला होता, तसा आपण ‘सम्यक’ हा शब्द ‘नॉर्मल’साठी वापरत आहोत.    
मुख्य मुद्दा असा की, ‘खुद्द निसर्गाला एक सम्यक अवस्था असते व ती मानवामुळे ढळते,’ ही चक्क एक अंधश्रद्धा आहे. खोल (डीप) व जहाल (रॅडिकल) पर्यावरणवादी, कोणत्या मखलाशा करून ही अंधश्रद्धा पसरवतात, हे आपण आज पाहणार आहोत. प्रथम निसर्ग म्हणजे जणू आदर्शच ही समजूत तपासून पाहू या.
निसर्गातील क्रौर्य, विध्वंस व अनागोंदी
‘जीवो जीवस्य जीवनं’चा स्पष्ट अर्थ, एका जीवाला मारून दुसरा जीव जगतो असाच आहे. भक्ष्य विरुद्ध भक्षक, सामायिक भक्ष्य असणारे दोन भक्षक, नर विरुद्ध नर, नर विरुद्ध मादी, मादी विरुद्ध मादी, भावंडे विरुद्ध भावंडे, जनकजननी विरुद्ध अपत्ये, जीवाला आतून खाणारे परोपजीवी विरुद्ध तो (होस्ट) जीव, अशा बहुविध आघाडय़ांवर चाललेले तुंबळ युद्ध, असे जीवसृष्टीचे वर्णन करता येईल. त्यात माणसाला क्रौर्य व किळस वाटेल असे बरेच काही असते. भक्ष्याला फक्त पॅरालाइझ करून जिवंतपणी पोखरले जाते. स्वत:चे दुबळे पिल्लू खाऊन त्या अन्नातून सशक्त पिलांसाठी दूध बनविले जाते, तर कुठली मादी अ‍ॅडव्हान्स डोहाळजेवण म्हणून नरालाच खाऊन टाकते. पहिले अंडे फोडून बाहेर आलेले पिल्लू, इतर अंडी घरटय़ातून ढकलून फोडून टाकते. जर भूक भागवण्याचाच प्रश्न असेल तर, मांजर हे उंदराला खेळवून छळून का मारते? खरे तर मूल्यदृष्टय़ा, आपण निसर्गापासून ‘काय शिकावे’ यापेक्षा काय ‘शिकू नये’, हेच भरपूर आहे.
आजच्या मानवामुळे जीववैविध्य कमी होत असल्याची ओरड आहे. खरे तर मनुष्याची एन्ट्रीच झालेली नसताना, भयानक नसíगक आपत्ती, जसे की पृथ्वीतील लाव्हय़ाची उलथापालथ, हिमयुग, उल्कावर्षांव इत्यादींमुळे, जीववैविध्याचे प्रचंड विनाश होऊन गेलेले आहेत. अशा घटना यापुढे होणार नाहीत याचीही शाश्वती नाही. मोठय़ा पीछेहाटी झेलूनही उत्क्रांती, पुन:पुन्हा तिच्या मंद वेगाने चालू राहून, येथवर पोहोचली आहे. मोहेंजोदरो, हडप्पा येथे गाळाखाली बुडालेली शहरे सापडली. त्या काळी दर माणशी दर वर्षी २४ टन कार्बन-डाय-ऑक्साइड सोडणारी अमेरिका, अस्तित्वातच नव्हती. कृष्णाची द्वारका बुडाली तेव्हा ‘पापे’ वाढली असतीलही, पण ज्वलन वाढल्याचा उल्लेख भागवत पुराणात नाही. मुळात, उत्क्रांतीतील संघर्षांनेच बाद ठरून नष्ट पावणारे जीववैविध्य, हे निर्माण होणाऱ्या वैविध्याच्या ९९ टक्के असते. यात तर माणसाचे योगदान नाहीच. त्यातून टिकून राहिलेली जीवजाती म्हणजे ‘सुखात जगणारी जीवजाती’ असे काहीही नसते.
टिकून राहणे हे बऱ्याच योगायोगांवर अवलंबून असते. मुळात जनुकांत कायाकल्प (म्युटेशन्स) होणे हेच ‘चुकून’ घडणारे सर्वस्वी यादृच्छिक (रॅण्डम) घटित असते. एखादी जीवजाती ज्या वसती-कोनाडय़ात (एनव्हायर्नमेंटल निश) असेल तेथील तुंबळ जीवनसंघर्षांत टिकण्याबाबत ‘पुरेसे अपयश’ देणारा कायाकल्प नशिबी आला तर ती जीवजाती नष्ट होते. कदाचित तोच कायाकल्प, वेगळ्या कोनाडय़ात टिकाऊही ठरला असता. महत्त्वाचा मुद्दा हा की अनुकूलनामुळे (अडॅप्टेशन) म्युटेशन्स होत नाहीत, तर योगायोगाने काही म्युटेशन्स, अनुकूलक (अडॅप्टिव्ह) निघतात! अगदी आजसुद्धा, आपण अ‍ॅण्टिबायोटिक्स घेतो म्हणून, जंतू ‘शिकून शहाणे’ होत नाहीत, तर योगायोगाने जंतूंमध्ये होणारी म्युटेशन्स, ही आतापर्यंतच्या अ‍ॅण्टिबायोटिक्सना दाद न देणारी निघतात इतकेच. म्हणजे उत्क्रांतिकथेचे अध्रे कारण हे यादृच्छिक आहे आणि उरलेले अध्रे हे निर्दयपणे विध्वंसक आहे. एकूण जग हे सुव्यवस्था (कॉसमॉस) आणि अनागोंदी (केऑस) या दोन्हींनी युक्त आहे, हे मान्य केले पाहिजे. मुळात, शुद्ध कॉसमॉसच असते, पण मानवी स्वार्थाद्वारेच ‘कली’ शिरावा तसा केऑस शिरतो, हे खरे नाही. उलट कॉसमॉस बांधण्याची ओढ ही मानवी ‘ऋतेषणा’ (रॅशनॅलिटी-हंगर) होय.
‘नैसíगक’च्या चार अर्थामधील चलाखी     
‘नैसíगक’ हा शब्द चार भिन्न अर्थानी वापरला जातो. त्यापकी कोणता आत्ता अभिप्रेत आहे, हे वक्ता सहसा सांगत नाही. तो या चारही अर्थामध्ये नकळत गल्लती करतो किंवा जाणूनबुजून फिरवाफिरवी करतो. ही चलाखी ओळखता यावी, यासाठी आपण हे चार अर्थ कोणते ते पाहू.
१) नसíगकचा पहिला अर्थ भौतिकदृष्टय़ा संतुलित (इन फिजिकल इक्विलिब्रियम) असा आहे. वस्तुमान, ऊर्जा, बल, प्रवाह इत्यादी भौतिकपातळीवरचे जे जे चलघटक असतील त्यांच्यात स्थितिशील वा गतिशील संतुलन असतेच. हे ‘समीकरणाच्या दोन बाजू समान असतात’ यासारखे स्वयंसिद्ध सत्य आहे. मानवच काय, पण जीवसृष्टी जरी नष्ट झाली तरी भौतिक संतुलन असणारच आहे. तेव्हा पहिल्या अर्थाने अनसíगक असे काही नसतेच.  
 २) नसíगक या शब्दाचा दुसरा अर्थ स्वभावदत्त असा आहे. गुरुत्वाकर्षण का आहे? याचे उत्तर तो वस्तूंचा स्वभाव आहे, त्याला वेगळे कारण नाही, असे असते. जे स्वभावदत्त असते ते नियमबद्धही असते. मानवी-निर्मिती केल्या जातात त्या निसर्गनियमांना एकमेकांत गुंफून, निसर्गनियम मोडून नव्हे! होडी ही गुरुत्वाकर्षणाने बुडू शकणारी, पण उद्धरणशक्तीमुळे तरणारी असते. जीवांबद्दल बोलताना ‘स्वभावदत्त’ला ‘सहजोर्मी’ (इन्सिटिंक्ट) हा अर्थ येतो, पण ‘सहजोर्मी’ हानिकारकही ठरू शकते. उंदीर आमिषाला बळी पडतो तो सहजोर्मीमुळेच!
 ३) ‘नैसíगक’चा तिसरा अर्थ ‘कृत्रिम’ म्हणजे जे ‘मानवनिर्मित नाही ते,’ असा आहे. युरिया हे रसायन मूत्रात बनते तेव्हा ते नसíगक, पण तेच रसायन जर कारखान्यात बनले, तर या तिसऱ्या अर्थाने अनसíगक ठरते! नसíगकच घटकांपासून व निसर्गनियमांना धरूनच, पण मनुष्याने केलेल्या जुळण्या, म्हणजेच उत्पादने होत. काही उत्पादने मानव-मारक असतीलही, पण ती ‘निसर्गविरोधी असतील’ म्हणजे काय? वैद्य हा आपल्याला ‘अनसíगक आरोग्य’ मिळवून देतो, असे आपण म्हणणार काय? किंवा कवळी, चष्मा अशी उपांगे तर सोडाच, पण मुद्दाम प्राणायाम करणे हेसुद्धा अनसíगक नाही काय?
 ४) नसíगकचा चौथा अर्थ मात्र ‘अ-विकृत’ असा मूल्यवाचक आहे. जेव्हा ‘अनसíगक मृत्यू’ म्हणतात, तेव्हा खरे तर संशयास्पद मृत्यूच म्हणायचे असते. दुसऱ्या माणसाला दास्यात टाकण्यातले आसुरी सुख, आपण विकृतच मानतो. म्हणूनच, पुरुषावर  केलेला बलात्कार हा जरी अनसíगक (अ-स्वभावदत्त) गणला गेला तरी, त्या न्यायाने, स्त्रीवर केलेल्या बलात्काराला कोणी ‘नैसíगक बलात्कार’ म्हणत नाही! विकृत गोष्ट ही मानवी दृष्टीने निषेधार्ह असली तरी, निसर्गबाहय़ वा एकुणात निसर्गाला धोकादायक नसते.  
पर्यावरणवाद्यांतील, ‘माणूसघाणे निसर्गप्रेमी’, वरील अर्थाची फिरवाफिरवी करून, असा ‘सिद्धान्त’ पसरवतात की, ‘जे कृत्रिम (३) असते ते विकृत (४) असते आणि त्यामुळे स्वाभाविकतेचा (२) भंग होऊन भौतिक-संतुलन ढळून (१) विनाश अटळ आहे.’ हा ‘सिद्धान्त’ पसरतोसुद्धा, कारण बऱ्याच जणांची निसर्गविषयक कल्पना ‘शहरात सहसा न आढळणारे प्रेक्षणीय स्थळ’ अशी असते.
तेव्हा तंत्राच्या मानवघातक परिणामांविषयी सावधता एवढाच पर्यावरणवादाला अर्थ आहे. सम्यक-निसर्ग नावाची, नसलेलीच गोष्ट राखण्याकरिता, माणसांना विकासापासून वंचित ठेवण्याचा, कोणालाही अधिकार नाही.  ६ लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nature exactly a pure nonsense

ताज्या बातम्या