|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

‘एआय’च्या उपयोजनांनंतरचा टप्पा कुठला, याविषयीचे प्रश्न लेखमालेचा एक टप्पा पूर्ण होत असताना पडताहेत..

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

या लेखमालेत गेल्या २३ आठवडय़ांत आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा एक अविभाज्य घटक असलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जाणून घेतले. आजचे सदर ‘एआय’विषयीचे शेवटचे; अर्थातच त्याची व्याप्ती इतकी वाढते आहे की, लेखमालेच्या पुढील टप्प्यांतही इतर डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल चर्चा करताना ‘एआय’चा संदर्भ येतच राहील.

पहिल्या लेखात आपण चार औद्योगिक क्रांत्या व डिजिटल-विश्वाची निर्मिती पाहिली. दुसऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय हे जाणून घेतले. पुढे एआयचे विविध टप्पे पाहिले (वीक व नॅरो/जनरल; स्ट्राँग/सुपर इंटेलिजन्स). चौथ्या लेखात सुपर इंटेलिजन्सबद्दल चर्चा केली. त्यापुढे गूगल मॅप्सबद्दल, सहाव्यात एआयच्या विविध शाखा म्हणजे मशीन लìनग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, स्पीच, कॉम्प्युटर व्हिजन इत्यादींबद्दल जाणून घेतले. पुढे लìनगचे विविध प्रकार बघितले – सुपरवाइज्ड, अन-सुपरवाइज्ड आणि रीइन्फोर्स्ड लर्निग. त्यानंतर एआयच्या संक्षिप्त इतिहासबद्दल जाणून घेताना, अ‍ॅलन टुिरग (कॉम्प्युटिंगचे जनक), जॉन मॅकर्थी (‘एआय’चे जनक) आणि १९९० मधील एआय-टेक-ऑफ असे टप्पे पाहिले. मग एआयच्या उपयोजनांबद्दल चर्चा केली, ज्यात आपण भविष्यातील स्वयंचलित मोटार, वित्तीय उद्योग व अँटी-मनी-लाँडिरग, वैद्यकीय व्यवसाय व रोबोटिक्स, गूगल सर्च व डिजिटल मार्केटिंग, मानवी संवाद व चॅट/व्हॉइस बॉट, ई-सुरक्षा असे निवडक विषय पाहिले. एआय, जागतिक घडामोडी व भारतातील संधींबद्दल चर्चा केली. पुढील चार लेखांत सविस्तरपणे एआयमुळे भविष्यातील रोजगार, व्यवसायांवरील परिणाम व धोके/संधी उपाययोजना व सल्ले अशा क्रमाने ‘एआय’च्या रेटय़ापुढे कोण तगतील आणि कसे, हेही जाणून घेतले.

लेखमालेतील आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या संकल्पना संक्षिप्त रूपात-

(१) वाफेवरील इंजिन (अठरावे शतक), विजेचा शोध (एकोणिसावे  शतक), इलेक्ट्रॉनिक्स, अणुऊर्जा व संगणक (विसावे शतक) आणि एकविसाव्या शतकात सुरू असलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच डिजिटल विश्वाची सुरुवात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय.

(२) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे थोडक्यात मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व ती चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे.

(३) ‘वीक/नॅरो एआय’ म्हणजे एआय सिस्टीममध्ये एका ठरावीक क्षेत्रातील, मर्यादित मानवी बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता आणणे व अशा सिस्टीमने एक छोटेसे मानवी कार्य, पण अत्यंत कुशलतेने आत्मसात करणे (सध्याची स्थिती).

(४) ‘जनरल, स्ट्राँग एआय’ म्हणजे एआय सिस्टीममध्ये पूर्ण मानवी बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता आणणे व अशा मशीन्सने सर्व मानवी कार्ये अत्यंत कुशलतेने आत्मसात करणे व त्याबरोबरच त्यामध्ये मानवासारखी जाणीव, संवेदना, भावना, आत्म-जागरूकता येणे (२०४०-५० च्या आसपास शक्य असे म्हणतात).

(५) ‘सुपर इंटेलिजन्स किंवा सिंग्युलॅरिटी’ म्हणजे एआयमध्ये अमर्याद, अफाट बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता येणे, जी सर्व मानवी बौद्धिक कक्षेच्या कैक पटींनी अधिक प्रगत असेल. अशी यंत्रे अनेक काय्रे, ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही, ती अत्यंत कुशलतेने आत्मसात करतील व त्याबरोबरच त्यामध्ये मानवापेक्षाही पुढची अशी जाणीव, विश्वभान असे गुणदेखील येऊ शकतील. (हे ध्येय की कविकल्पना?)

(६) साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत सृष्टी आणि मानवी बुद्धी ही जैविकदृष्टय़ा उत्क्रांत होत आली आहे आणि म्हणूनच मानव कधी ना कधी या उत्क्रांतीचे रहस्य शोधून, त्याची नक्कल करून सुपर इंटेलिजन्सपर्यंत पोहोचू शकतो असे समजले जाते.

(७) मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संशोधनामध्ये असे आढळून आले की, जगातील ९० टक्के डेटा हा फक्त गेल्या दोन वर्षांतील नवनिर्मिती आहे व त्यातील ८० टक्के डेटा हा अन-स्ट्रक्चर्ड (लेख, कविता, टेक्स्ट, चॅट, व्हॉइस संभाषण, ईमेल, व्हिडीयो, प्रतिमा, फोटो इत्यादी) ज्याचे विश्लेषण पारंपरिक सॉफ्टवेअर करूच शकत नाहीत, म्हणूनच एआय सॉफ्टवेअर्सना प्रचंड महत्त्व प्राप्त होते आहे.

(८) ‘डीप लर्निग’ हे मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित आहे व एआयची सर्वात नवीन, प्रगत व महत्त्वपूर्ण शाखा आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्‍सवर आधारित सॉफ्टवेअर्समध्ये अनेक पातळ्या वा थर असतात.

(९) लाखो मितींचे आलेख क्षणार्धात मांडू शकणे हे एआयचे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे. दुसरे म्हणजे अब्जावधी उदाहरणांचे सहजासहजी विश्लेषण.

(१०) एआय टेक-ऑफची (१९९० पासून) प्रमुख कारणे देता येतील – प्रगत कॉम्प्युटिंग पॉवर, टेलिकॉम नेटवर्क व डेटा स्टोरेज.

(११) गूगल एआयचा बुद्धय़ांक (आयक्यू) फक्त एखाद्या सहा वर्षांच्या मुलाइतकाच आहे असे सिद्ध झाले. एक म्हणजे पुढील अवघ्या २०-२५ वर्षांत प्रगती अत्यंत झपाटय़ाने होईल आणि दोन- जागतिक पातळीवर योग्य कायदे, नियम न बनल्यास प्रचंड गरवापर सुरू होईल.

(१२) जसजशी कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीस लागते आहे, तसतशी मानवी बुद्धिमत्तेची आपल्याच अस्तित्वासाठी कसोटी लागते आहे. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’.

(१३) ज्यांच्यात फारच कमी प्रमाणात बुद्धिमत्ता/ ज्ञान/ कौशल्य किंवा भावना/ कला/ सर्जनशीलतेची गरज पडते, अशी सर्व कामे नवप्रज्ञेवर आधारित तंत्र-उपयोजनांमुळे भविष्यात कधी तरी रोबोट्स पूर्णपणे पार पाडू शकतील. त्यामुळे अशा रोजगारांच्या संख्येत भविष्यात बरीच घट होईल, प्रभाव पडलेली जनसंख्या अशा कामांकडे वळेल जिथे मानवी भावना/ संवाद/ स्पर्श किंवा कला/ सर्जनशीलता वापरण्याची गरज असते आणि भविष्यात रोबोट्स सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा बनतील, आजच्या मोबाइलप्रमाणे. डिजिटल तंत्रज्ञान वापरून तोच व्यवसाय, रोजगार पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात आणून कसा वृिद्धगत करता येईल याला ‘डिजिटल री-इमॅजिनेशन’ म्हटले जाते.

(१४) भारतात हे सारे शक्य आहे का? आणखी २५ वर्षांनंतर भारत कसा असेल? नासकॉमच्या अहवालाप्रमाणे भविष्यातले ४६ टक्के रोजगार आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे, नवीन कौशल्याचे असतील.

(१५) उच्चपदस्थ अधिकारी वर्ग, उद्योजक, संशोधक व शास्त्रज्ञ, विचारवंत, पुढारी इत्यादींचे यांत्रिकीकरण अशक्यच. समजा झालेच तर ‘टर्मिनेटर’ सिनेमासारखे मानवजातीवरच विनाशकारी संकट येईल आणि खरे तर, या शक्तिशाली व बुद्धिमान गटाने पुढाकार घेऊन एआयसंदर्भात जागतिक पातळीवर लवकरात लवकर कायदे, धोरण व नियम बनविणे अत्यंत गरजेचे आहे.

(१६) एक तर, ‘एआय’ तंत्रज्ञ क्षेत्र फक्त इंजिनीअरनाच खुले आहे असे मुळीच नाही. दुसरे- आयटी अनुभव + एखाद्या उद्योगाचे व्यावसायिक ज्ञान महत्त्वाचे. तिसरे आपल्या देशाचे ‘जागतिक एआय हब’ बनण्याचे ध्येय.

इतके जाणून झाल्यानंतर..

आता काही मनोरंजक प्रश्न, ज्याबद्दल सध्या तरी कोणाकडेच कुठलेही ठोस उत्तर नाही.. तेव्हा तुम्हीपण स्वत:ची कल्पनाशक्ती अजमावून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा.

(१) पाचवी औद्योगिक क्रांती कुठली असू शकेल? (साधारण २०५० नंतरचा, २०१० च्या आसपासचा काळ)

(२) कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘स्व-जाणीव’ प्राप्त होऊन जनरल इंटेलिजन्स स्थिती शक्य होईल का? झाल्यास मनुष्याला ‘रोबॉटचे भावनाविश्व’ कसे उमजेल?

(३) सुपर इंटेलिजन्स खरेच शक्य झाल्यास सर्व रोबॉट्स एकत्र येऊन मानवजातीला अजून प्रगत करतील, नसíगक संकटांवर मात करायला मदत करतील, की आपल्याविरुद्ध उभे ठाकतील? आणि का?

(४) स्व-जाणीव प्राप्त झालेल्या मानवी-यांत्रिक विश्वात ‘राष्ट्र/देश’ संकल्पना व लोकशाही टिकून राहील का?

(५) मनुष्य तंत्रज्ञानाच्या जोरावर शरीरावर, मृत्यूवर विजय मिळवू शकेल का? झाल्यास काय होईल?

एक मात्र नक्की, मानवाने फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आतापर्यंत अनेक अवजारे, उपकरणे आणि अस्त्रे-शस्त्रे बनविली, ज्याला आपण मशीन्स म्हणतो; पण आजपर्यंत कुठल्याच मशीन्सना आपण बुद्धिमत्ता प्रदान केली नव्हती जी एआय करतेय. पुढे जाऊन तर अनुभवातून शिकण्याव्यतिरिक्त स्व-जाणीवदेखील त्यांना मिळाल्यास नक्की काय होईल त्याबद्दल आत्ताच अंदाज बांधणे कोणालाच शक्य नाहीये. कारण मानवाने आजपर्यंत निसर्ग, प्राणी किंवा इतर मानवांबरोबर दोस्ती वा दुश्मनी केली. त्यात भर पडतेय मशीन्सची, जे आपल्यापेक्षा अनेक पटीने कार्यक्षम व प्रभावी आहेत!

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com