ज्यांच्या भल्यासाठी आपण काम करीत आहोत असा मेटे यांचा दावा आहे, त्याच समाजाचे प्राबल्य असलेल्या पक्षाने त्यांना धूप घातली नाही. आणि तरीही भाजप मात्र  त्यांना आनंदात दत्तक घेताना दिसतो.. मोदी ज्या प्रमाणे आततायी कृत्ये करीत आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्रिपदासाठी कासावीस झालेले गोपीनाथ मुंडे हेही वाटेल ते करताना दिसतात.
अन्य पक्षांतून निकम्मे ठरलेल्यांना जवळ करणे हे सत्ताभिलाषी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय धोरण दिसते. बिहारात साबिर अली, महाराष्ट्रात विनायक मेटे यांच्यासारख्या फुटकळांना पक्षात घेऊन भाजपने हेच सिद्ध केले आहे. कर्नाटकात o्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्या रूपाने हाच प्रयोग होत होता. परंतु तेथील भाजप धुरिणांना शहाणपणाने पूर्ण दगा न दिल्यामुळे मुतालिक यांचे सव्य आगमन पक्षाने अपसव्य करून रोखले. साबिर अली यांच्याबाबतही हेच झाले. या अली यांना काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातून काढले. तेव्हापासून ते आसऱ्याच्या शोधात होते. तो भाजपने दिला. हे अली हे केवळ अली आहेत म्हणून भाजपला त्यांचा पुळका आलेला दिसतो. अशी केवळ आडनावे जोडल्यामुळे त्या त्या समाजाची मते आपल्याला मिळतील असे भाजपला वाटत असेल तर ती विचारांची पातळी अगदीच शालेय म्हणावयास हवी. हे अली त्यांच्या आडनाव आणि धर्मामुळे इतके महत्त्वाचे असते तर मुळात त्यांना नितीश कुमार पक्षातून काढतेच ना, हे समजण्याचे चातुर्यही भाजपत राहिलेले दिसत नाही. हे अली अत्यंत उद्योगी म्हणून विख्यात आहेत. भाजपचे निवासी मुसलमान नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनुसार अली यांचा अनेक वादग्रस्त कारवायांशी संबंध होता. विविध दहशतवादी घटनांत हवे असलेल्या काहींशी या अली यांचे संबंध होते असेही बोलले जाते. अशा परिस्थितीत त्यांना पक्षात घेऊन भाजपने काय साधले? त्यामुळे उलट भाजपची शोभाच झाली. कारण हा अनिवासी मुसलमान नेता पक्षात आल्यास आपले महत्त्व कमी होईल अशी भीती निवासी मुसलमान मुख्तार अब्बास नक्वी यांना वाटली आणि त्यांनी ती जाहीरपणे व्यक्त करून पक्षाचे निधर्मी होऊ पाहणारे नाक कापले. नक्वी यांच्या या उद्रेकानंतर मग भाजप नेतृत्वाला जाग आली. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व टांगणीवर ठेवण्याचे ठरले. कर्नाटकात अत्यंत कर्कश्श मुतालिक यांच्याबाबत जे झाले तेच अली यांच्याबाबतही भाजपस करावे लागले. वास्तविक किमान विचारक्षमता असणाऱ्या कोणालाही या मुतालिक आणि अली यांची निरुपयोगिता ध्यानी येणे अवघड नाही. मुतालिक  यांचे दर्शनदेखील विवेकी मनांत धडकी भरवण्यास पुरेसे आहे. तरीही भाजपने त्यांना पक्षात घेतले आणि नंतर अगदीच टीका झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना बाजूला ठेवले. यातून प्रदर्शन झाले ते भाजपच्या उतावीळ आणि अविवेकी निर्णयक्षमतेचे.
महाराष्ट्रात ही बाब विनायक मेटे यांना जवळ करून भाजपने दाखवून दिली आहे. या मेटे यांना सेना-भाजप युतीत आणले म्हणजे आपण काही शौर्यकृत्य केले आणि शत्रूचा खजिनाच लुटला असाच आविर्भाव गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांचा दिसतो. हा पोरकटपणा झाला. तो एकवेळ उद्धव ठाकरे यांना शोभून दिसला असता, वयाने मोठे असलेल्या मुंडे यांना नाही. या मेटे यांची राजकीय ताकद शून्य आहे. मुंडे आणि ठाकरे यांना वाटते तशी ती असती तर या हिऱ्यास मुळात शरद पवार यांनी अडगळीत टाकले नसते. मेटे यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर एकमेव मुद्दा आहे. तो म्हणजे मराठा आरक्षण. आपण म्हणजे कोणी मराठय़ांचे तारणहार आहोत आणि त्यांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे, अशा थाटात ते वावरत असतात. परंतु मराठवाडय़ाचा एखाद दुसरा जिल्हा सोडला तर अन्य प्रांतातले मराठे त्यांना हिंग लावून विचारत नाहीत. महाराष्ट्राची समग्र आर्थिक ताकद ही सहकार चळवळीत आहे आणि ही चळवळ प्राधान्याने मराठय़ांच्या हाती आहे. परंतु तेथे या मेटे यांना काहीही स्थान नाही. बरे, त्यांची ताकद किती याचा अंदाज मुंडे यांना नाही असे म्हणावे तर तेही नाही. कारण १९९५ साली सेना-भाजपची सत्ता आली त्या काळात हे मेटे युतीच्या वळचणीखाली होते. तेथे फारसे काही हाती न लागल्यावर आणि पुढे सेना-भाजपचीच सत्ता गेल्यावर त्यांना युतीत रस राहिला नाही आणि मग ते पवार काका-पुतण्यांच्या आo्रयाला गेले. तेथे पवार द्वयीने त्यांना जवळ केले, पुढे उपाध्यक्षपदही दिले, परंतु हाती काही लागू दिले नाही. कारण मुळात ते स्वत: आणि राष्ट्रवादी पक्ष हा एकप्रकारे मराठा महासंघच झालेला असल्याने तेथे मेटे यांची काहीही डाळ शिजली नाही. वास्तविक ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या पक्षात मराठा समाजाचे प्राबल्य आहे त्याच पक्षाने मेटे यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा खुंटीवर टांगला आणि मेटे यांनाही लोंबकळत ठेवले. म्हणजे ज्यांच्या भल्यासाठी आपण काम करीत आहोत असा मेटे यांचा दावा आहे, त्याच समाजाचे प्राबल्य असलेल्या पक्षाने मेटे यांना धूप घातली नाही. आणि तरीही भाजप मात्र उतावीळ होऊन त्यांना आनंदात दत्तक घेताना दिसतो, यास काय म्हणावे? मराठा आरक्षण हा भाजपचा कार्यक्रम आहे काय? आणि तसा तो असेल तर मग अन्य मागास जमातींच्या प्रश्नावर भाजपची भूमिका काय? मुंडे यांना ज्या समाजाचे नेतृत्व करावयास आवडते त्या ओबीसींच्या तोंडचा राखीव जागांचा घास काढून राजकीयदृष्टय़ा तगडय़ा असलेल्या मराठय़ांच्या तोंडी घालावा असे भाजपचे मत आहे काय? आणि या प्रश्नावर मग शिवसेनेचे काय? ओबीसींचे राजकारण करू पाहणाऱ्या शिवसेनेस मेटे यांची मराठा मक्तेदारी मान्य आहे असे मानायचे काय? याही पलीकडे प्रश्न असा की हे माननीय मेटे एकेकाळी आपल्यात असताना सेना-भाजपचे काय भले झाले आणि ते गेल्यानंतर काय नुकसान झाले याची उत्तरे युतीच्या नेत्यांकडे आहेत काय? तेव्हा जितं मया थाटात             या असल्यांचे आगमन साजरा करण्याइतका वावदूकपणा भाजप-सेना युतीने करायचे काही कारण नाही. पक्षात घेऊन बाहेर काढले गेलेले मुतालिक हे मंगलोरात महिलांवरील हल्ल्याच्या शौर्यकृत्यासाठी ओळखले जातात. मेटे यांच्या नावावर पत्रकारांवरील हल्ल्याचे पुण्यकर्म नोंदले आहे, असे म्हणतात. तेव्हा त्यांना जवळ करून भाजपने आपलीही मानसिकता सिद्ध केली, असे मानावयास हरकत नाही. या आधी मराठा मतांच्या मिषाने मुंडे यांनी अनेकांना आपल्या कळपात ओढले आहे. रजनी पाटील यांना त्याच उद्देशाने बीडहून उमेदवारीही देऊन झाली. त्यातले सर्व पुन्हा आपापल्या सोयीच्या कळपात निघून गेले. या असल्याच समाजाच्या मतांवर डोळा ठेवून बबनराव ढाकणे, प्रकाश शेंडगे आदींनाही भाजपने आपल्यात घेतले होते. परंतु त्यानेही काही झाले नाही आणि ते पुन्हा काँग्रेसी कळपात निघून गेले. तेव्हा मुंडे यांनी अधिक राजकीय पोक्तपणा दाखवावयास हवा. त्यांचे हे बेरजेचे राजकारण आगामी विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून सुरू आहे.
तिकडे दिल्लीत पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्यास व्याकूळ झालेले नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे आततायी कृत्ये करीत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी कासावीस     झालेले गोपीनाथ मुंडे हेही वाटेल ते करताना दिसतात. सत्तेसाठी जीव तोडून प्रयत्न करणे वेगळे. पण इतके मेटेकुटीस येण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp outcast vinayak mete joins hands with gopinath munde
First published on: 31-03-2014 at 01:09 IST