‘आऊटलुक’ या इंग्रजीतील चर्चित साप्ताहिकाचे माजी मुख्य संपादक विनोद मेहता हे त्यांच्या काहीशा चमत्कारिक दृष्टिकोनामुळे भारतीय पत्रकारितेत बहुतेकांना परिचित आहेत. एका जागी स्थिर न राहता सतत नव्या ठिकाणी जाऊन ते वर्तमानपत्र चर्चेत आणायचे आणि मग तिथून पोबारा करायचा, असा लौकिक असलेल्या मेहता यांनी तब्बल १७ वर्षे ‘आऊटलुक’चे संपादकपद भूषवले. केवळ एवढेच नव्हे तर या साप्ताहिकाला भारतातील आघाडीचे साप्ताहिक बनवले. आणि तरीही त्यातून बाहेर न पडता ते अजून याच ठिकाणी एडिटोरिअल चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मेहता एका जागी स्थिर होऊनही पुष्कळ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्याची चर्चा करण्यात काहीच हशील नाही. ..तर सध्या चर्चा आहे त्यांच्या नव्या पुस्तकाची. ‘एडिटर अनप्लग्ड : मीडिया, मॅग्नेट्स, नेताज अँड मी’ची. २०११ साली त्यांच्या आत्मकथनाचा पहिला भाग ‘लखनौ बॉय’ या नावाने प्रकाशित झाला होता. त्याचाच हा पुढचा भाग आहे. ‘लखनौ बॉय’मुळे मेहतांचे काही नवे शत्रू निर्माण झाले होते. ‘एडिटर अनप्लग्ड’मुळे त्यात आणखी काही नावांची भर पडेल. या पुस्तकात मेहतांनी ख्वाजा अहमद अब्बास, जॉनी वॉकर, सचिन तेंडुलकर, रस्किन बॉण्ड, खुशवंतसिंग आणि अरुंधती रॉय या त्यांना कौतुकास्पद वाटलेल्या सहा व्यक्तींची प्रत्येकी १२०० शब्दांची व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. नेहरू-गांधी घराण्याविषयीही खास त्यांच्या पद्धतीने लिहिले आहे. नुकत्याच ‘आऊटलुक’मधील डायरी या सदरात मेहतांनी ‘इंदिरा आणि प्रियांका या दोघींनीही संकटात लोटणाऱ्या नवऱ्यांची निवड केली’ असे विधान केले होते. आणि अर्थातच नरेंद्र मोदींविषयीही लिहिले आहेच. त्यांना कसे सोशल लाइफ नाही, ते कसे एकाधिकारवादी आहेत इत्यादी इत्यादी. टाइम्स नाऊ वाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्याबद्दलही तिरकसपणे लिहिले आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयीही. मध्यमवर्ग आणि दिल्लीतील राजकारण यांच्याविषयीची मते आणि निरीक्षणेसुद्धा नोंदवली आहेत. तिरकस, उपहासपूर्ण मते, काही प्रमाणात टवाळकी आणि सेलेब्रिटी गॉसिप्स असलेला मेहतांच्या  आत्मकथेचा हा दुसरा भागही काही प्रमाणात वादग्रस्त होण्याची शक्यता आहेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New autobiography
First published on: 13-12-2014 at 01:01 IST