उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने आपले काका यांग साँग थेक यांच्यावर १२० कुत्रे सोडले. त्या भुकेल्या कुत्र्यांनी लचके तोडून त्यांना ठार मारले. सुमारे तासभर हा क्रूर खेळ चालला. उत्तर कोरियाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी त्याची मौज लुटली. हाँगकाँगमधील ‘वेन वेई पो’ नामक वृत्तपत्राने दिलेल्या या वृत्ताची शहानिशा अद्याप झालेली नाही. उत्तर कोरिया हा धाकटय़ा जॉर्ज बुश यांच्या ‘अॅक्सिस ऑफ इव्हिल’मधला देश आहे. अशा देशांबाबत एकूणच माध्यमांतून ज्या प्रकारचा प्रचार चालतो, तो पाहता हे वृत्त अतिशयोक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ‘वेन वेई पो’ या वृत्तपत्राचे नाव हाँगकाँगमध्येही कोणी विश्वासार्हता आणि दर्जा यांसाठी घेत नाही. तेव्हा हा अधिककरून उत्तर कोरियाविरोधी प्रोपागंडाचाच भाग असू शकतो. परंतु त्याने थेक यांना ठार मारण्यात आले, ही गोष्ट खोटी ठरत नाही. किम जाँग उन याने आपल्या या काकाला मृत्युदंड ठोठावला. त्याची आणि त्याच्या काही सहकाऱ्यांची कत्तल केली. ती प्राचीन रोमन पद्धतीनुसार कुत्र्यांच्या तोंडी देऊन केली की काही बातम्या सांगतात त्यानुसार विमानविरोधी तोफांच्या तोंडी देऊन केली हा केवळ तपशिलाचा भाग झाला. अशा कत्तली हा उत्तर कोरियाच्या राजकीय जीवनाचा भाग आहेत. किंबहुना जेथे हुकूमशाही आहे, तेथे अशी हत्याकांडे होतच असतात. ती हुकूमशहांची गरज असते. हुकूमशाही म्हणजे अनुशासनपर्व आणि हुकूमशहा म्हणजे जनगणमनाचा भाग्यविधाता अशी ‘एक राष्ट्र, एक ध्वज, एक नेता’ प्रकारची उथळ विचारसरणी असणाऱ्यांच्या हे जन्मात लक्षात येत नाही. पण जगाचा इतिहास हेच सांगतो. उत्तर कोरियाचा भयगंडित हुकूमशहा किम जाँग उन याची तर ती मानसिक गरज होती. वारसाहक्काने आलेली घराण्याची हुकूमशाही टिकविणे ही किम जाँग उन याची सध्याची प्राथमिकता आहे. किमचा पिता किम जाँग इल डिसेंबर २०११मध्ये वारला. पण त्याआधीच त्याने किम जाँग उन याच्याकडे देशाची सत्ता जाईल याची तयारी करून ठेवली होती. त्यासाठी त्याने चीनचे आशीर्वादही मिळविले होते. त्यानुसार २८ वर्षांच्या किमने सर्वोच्च सत्तास्थान काबीज केले. त्यात त्याला त्याच्या आत्याचा नवरा यांग साँग थेक याची मोठी मदत झाली. पुढील दोन वर्षांत थेकचा प्रभाव चांगलाच वाढला. हुकूमशहांना या दुसऱ्या स्थानाची फार भीती असते. तेव्हा सत्ता हाती येताच किम याने सगळी जुनी फळी कापून काढण्याचा निर्णय घेतला. त्याने शुद्धीकरण मोहीम सुरू केली. थेक त्याचा बळी ठरला. मरणानंतर किम याने त्याची घृणास्पद मानवी कचरा अशा शब्दात अवहेलना केली. या हत्याकांडाने किमची दहशत वाढली. हे वगळले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा काय परिणाम झाला? काहीच नाही. चीन म्हणे त्याच्यावर नाराज होता. ताजी बातमी अशी आहे की, चीन पुढच्या वर्षी उत्तर कोरियाच्या सीमेवर अतिजलद रेल्वेमार्ग सुरू करणार आहे. अमेरिका गप्पच आहे. या घटनेने एक मात्र झाले की, राजकारणातील एक अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली. राजकारणातील तरुणांचा सहभाग म्हणजे क्रांतीच. तरुणाईच राजकारणातील घाण स्वच्छ करील. त्याला आधुनिक चेहरा देईल, असे अनेकांना वाटते. उत्तर कोरियातील तरण्याबांड, एकतीस वर्षांच्या सर्वोच्च नेत्याने तेथे चालविलेला भ्रष्टाचार, दहशत यांचा नग्न नाच पाहिला की हीसुद्धा अखेर अंधश्रद्धाच आहे, हे लक्षात येईल. उत्तर कोरियातील घडामोडींचा हा एक छोटासा पण महत्त्वपूर्ण धडा आहे.