अवघ्या आठवडय़ापूर्वी अहमदाबादमधील कार्यक्रमात आपण गुजरातमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगणारे भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी आता मध्य प्रदेशातून निवडणूक लढवण्याची भाषा का करू लागले? त्यांना नरेंद्र मोदींची भीती वाटते, की मोदींबद्दल आपल्याच पक्षातील इतर अनेकांना या निमित्ताने काही संदेश द्यायचा आहे? मोदी, राजनाथसिंह किंवा अरुण जेटली यांना हवा तो सुरक्षित मतदारसंघ निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, मग ते आपल्याला का नाही, असा बालहट्ट अडवाणी करू लागले आहेत, याचे खरे कारण पक्षातील त्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. गोव्याच्या ज्या बैठकीत मोदींचे नाव पंतप्रधानपदी जाहीर करण्यात आले, त्या वेळी याच अडवाणी यांनी केलेल्या तर्कटामुळे भाजप अडचणीत आला होता. घरात रोजच्या कामांत उपयोग होईनासा झाला की मग उगाच काही ना काही खुसपटे उकरून काढण्याची ही मनोवृत्ती अडवाणींचीच प्रतिमा मलिन करणारी आहे. आपण आता उपकारापुरतेही उरलेलो नाही, हेच लक्षात येत नसल्यामुळे अजूनही सारी सूत्रे आपल्याच हाती आहेत, असा बडेजाव मारण्यासाठी हे नाटक पुन्हा सुरू झाले आहे. पाच वेळा ज्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अडवाणी यांनी निवडणूक लढवली आहे, तेथून सहाव्यांदा निवडून येण्यात त्यांना मोदींचा अडथळा होईल असे सुचवावेसे तरी का वाटते, हे कळण्यापलीकडचे आहे. ज्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे आणि जेथे त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार सर्वेसर्वा आहेत, तेथे अडवाणींना ही शंका यावी इतके जर हे संबंध ताणलेले असतील तर निवडणुकीनंतर काय काय होऊ शकेल, याचा अंदाज बांधलेला बरा. भाजप ‘२७२+’ अशी घोषणा देणाऱ्या मोदींवरच खरेतर अडवाणी यांचीही जबाबदारी असणार आहे. अडवाणी पडले, तर त्यांच्यापेक्षा जास्त नाचक्की मोदींची होणार आहे, याचे भान एवढय़ा ज्येष्ठ नेत्याला असायलाच हवे. इतकी वर्षे राजकारणात राहिल्यानंतर कधी थांबायचे, हे कळणे फार महत्त्वाचे असते. अडवाणी यांना दुर्दैवाने ते समजलेले दिसत नाही. मोदींनी मनधरणी करावी, इतरांनी आर्जवे करावी याची त्यांना गरज वाटते, कारण पक्षातील आपले महत्त्व कमी झाले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. जेव्हा हे लक्षात येते, तेव्हा आपणहून ‘एक्झिट’ घेण्यात अधिक शहाणपण असते. अडवाणी यांच्याप्रमाणेच जसवंत सिंग यांचा हा अडेलपणा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काही संदेश देऊ पाहत असेल, तर त्याचा पक्षानेही गांभीर्याने विचार करायला हवा. भारतीय जनता पक्षात इतकी वर्षे अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवाणींचे स्थान होते. उमेदवारीचे वाटप करताना वाजपेयी यांनी फारच क्वचित चबढब केल्याचे सांगितले जाते. उमेदवारी कशी दिली जाते आणि त्यासाठी कोणते निकष लावले जातात, हे अडवाणींना चांगलेच माहीत आहे. या बाबतीत त्यांच्याएवढा अनुभवी पक्षात दुसरा कोणी नसेल. आता उमेदवारी देण्याची सूत्रे दुसऱ्यांच्या हातात आहेत, तेव्हा त्यांनी आधी गांधीनगरचा आग्रह धरताना कोणता विचार केला असेल, हेही मध्येच भोपाळचा आग्रह धरणाऱ्या अडवाणींना नक्कीच उमगलेले असणार. मग तरीही आपण मध्य प्रदेशातूनच निवडणूक लढणार, असा आग्रह धरून त्यांनी नेमके काय साधले? असे करून त्यांना पक्षातील स्वत:चे महत्त्व वाढवायचे आहे की मोदींची बदनामी करायची आहे? मोदींना नकार आणि सुषमा स्वराज यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर, केवळ ‘नागपूरहून आदेश आला’ म्हणून होकार, असे करून पक्षातील दुफळी अधिक स्पष्टपणे दाखवण्याची हीच संधी आहे, असेही त्यांना कदाचित वाटत असेल.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2014 रोजी प्रकाशित
अडेल अडवाणी
अवघ्या आठवडय़ापूर्वी अहमदाबादमधील कार्यक्रमात आपण गुजरातमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगणारे भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी आता मध्य प्रदेशातून निवडणूक लढवण्याची भाषा का करू लागले?

First published on: 21-03-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstinate lal krishna advani