एक चुकीचा प्रश्न.. : सेक्युलर की कम्युनल?

दोन शब्द बरीच वष्रे ‘विरुद्ध अर्थाचे शब्द’ म्हणून वापरले गेले. पण त्यांचे योग्य विरुद्ध अर्थी शब्द, एकमेक नसून, भलतेच असले तर? ‘सेक्युलर’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘थिओक्रॅटिक’, तर ‘कम्युनल’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘कॉस्मोपॉलिटन’ आहे. सेक्युलर की कम्युनल? हा प्रश्नच मुळात चुकीचा (स्क्यू) आहे. अनुनयी सर्वधर्मसमभाव की निपक्षपाती इहवाद? असा नेमका प्रश्न मांडून ‘हिंदुत्व’ हा शब्दच विसर्जित का करू नये?

दोन शब्द बरीच वष्रे ‘विरुद्ध अर्थाचे शब्द’ म्हणून वापरले गेले. पण त्यांचे योग्य विरुद्ध अर्थी शब्द, एकमेक नसून, भलतेच असले तर? ‘सेक्युलर’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘थिओक्रॅटिक’, तर ‘कम्युनल’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘कॉस्मोपॉलिटन’ आहे. सेक्युलर की कम्युनल? हा प्रश्नच मुळात चुकीचा (स्क्यू) आहे. अनुनयी सर्वधर्मसमभाव की निपक्षपाती इहवाद? असा नेमका प्रश्न मांडून ‘हिंदुत्व’ हा शब्दच विसर्जित का करू नये?
‘‘मोस्ट ऑफ अस हॅव बिकम नॉर्मल, सम हॅव रिमेन्ड सेक्युलर’’ ‘रालोआ’चे आद्य निमंत्रक जॉर्ज फर्नाडिस यांनी काढलेले हे उद्गार आहेत. त्यांचे पट्टशिष्य नितीशकुमार व शरद यादव यांची ‘‘आपला सेक्युलॅरिझम बाटतोय की काय?’’ ही जुनाट (क्रॉनिक) अँग्झायटी एका ‘तपा’नंतर परत उफाळून आल्याने, आद्यगुरू जॉर्जसाहेबांचे हे उद्गार आठवले इतकेच. सेक्युलॅरिझम हा शब्द अशा तऱ्हेने तुच्छतापूर्वक वापरला जावा, याचे मात्र मला दुख होते. ते अशासाठी, की मी तो ‘सर्वधर्मसमभाव’ या भंकस अर्थाने न घेता, इहवाद या त्याच्या मूळ अर्थाने घेतो.
राजकीय अर्थाने इहवाद, म्हणजे राज्याने कायदे करताना कोणत्याच धर्माचा सकारात्मक वा नकारात्मक आधार न घेणे आणि कोणत्याही नागरिकाला त्याच्या धर्मावरून भेदभावाची वागणूक न देणे होय. तसेच उपासनास्वातंत्र्य म्हणजे खाजगी जीवनात, पारमार्थिक उद्दिष्टाने, इहवादी कायदे न मोडता, हवी ती उपासना करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य होय. या दोन व्याख्या जर गंभीरपणे घेतल्या आणि कसोशीने पाळल्या तर राष्ट्रीय एकात्मता (खरे तर मानवीय एकात्मता) धार्मिक कारणाने संकटात येण्याचा काहीही धोका उरत नाही.
इहवाद विरुद्ध सर्वधर्मसमभाव
आपल्या राज्यघटनेत इहवाद असूनही, ‘सर्वधर्मसमभाव’ हे ‘सेक्युलॅरिझम’चे अत्यंत चुकीचे भाषांतर, प्रचलित होऊन बसले आहे. कुठल्याच धर्माला लुडबूड करू देणार नाही याचा अर्थ, सर्वच धर्माना समान प्रमाणात लुडबूड करू देऊ, असा होणे हा केवढा मोठा विपर्यास आहे. कुणाच्याच यात्रेला सबसिडी देणार नाही ऐवजी सगळ्यांच्याच यात्रांना सबसिडी देऊ. कुणाच्याच कुप्रथा (इहवादी दृष्टीने ‘कु’) चालू देणार नाही ऐवजी सर्वाच्याच चालू देऊ. कुणाच्याच धर्मगुरूंना आदेश काढू देणार नाही याऐवजी सर्वाच्याच धर्म.. इत्यादी. सर्वच धार्मिक-जमातवादी सत्ताकेंद्रांचा अनुनय, यात हिंदू-जमातवादी सत्ताकेंद्रेही आली (जसे की श्रीकृष्ण अहवाल दडपणे), ही तर ‘अपप्रवृत्तींचे समान वाटप’ करण्याची धडपड आहे! दुसरे असे, की सर्व धर्म हे एकमेकांचा आदर करणारे असतील, हे आपल्या हातात नाही. इतर धर्माना तुच्छ किंवा पाखंडी किंवा पापी मानणे याची प्रखरता, ही सर्व धर्मात सारखीच असेल, हेही आपल्या हातात नाही. अशा परिस्थितीत, एका अन्य-अनादर-वादी धर्माला, दुसऱ्या अन्य-आदर-वादी धर्माशी, समान मानायचे; यातच त्यांच्यात अंगभूतपणे असणारी ही असमानता सुप्तपणे पोसत राहणे, असे घडत नाही काय? म्हणजेच सर्वधर्मसमभाव ही कल्पनाच आत्मविसंगत आहे आणि ती इहवादाशीही विसंगत आहे. म्हणूनच जर इहवादी राज्य राखायचे असेल तर सर्व-धर्म-सम-भाव ही कल्पना टाकून द्यावी लागेल. या एका आत्मविसंगत कल्पनेपायी इतकी दांभिकता पसरली आहे, की तिला ‘सर्व-दंभ-सम-वाव’ म्हणावेसे वाटते.
राज्य हे खऱ्या अर्थाने इहवादी बनविणे आणि इहवाद टिकवणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. थिओक्रसी म्हणजे ‘धर्माज्ञेने राज्य वा धर्मदत्त-कायदे’ हे इहवादात वज्र्य आहेत. उपासनास्वातंत्र्य हे खासगी आहे व ते खासगीच राहिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा परमार्थसुद्धा अनन्य असतो. हे लक्षात घेता, इहवादी राज्य आणि व्यक्तीचे उपासनास्वातंत्र्य या गोष्टी आदर्श स्वरूपात, अंगीकारल्या तर, व्यक्तीला जाणत्या वयात, धर्म/पंथ/मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल! धर्म हा जन्मदत्त राहिलाच नाही तर त्याची जमात बनण्याचा प्रश्नही निकालात निघेल. पण इतका मूलगामी इहवाद सध्या तरी झेपणार नाही. तेव्हा सध्या, जन्मदत्त धर्मातही राहा, पण जर कोणी धर्माच्या नावाने ऐहिक बाबतीत सक्ती करायला लागले, तर राज्य तुमच्या मागे उभे राहील, एवढाच इहवाद खूप आहे. कारण तो तरी कुठे अमलात आलाय?
जमातवाद ‘धम्रेतर’सुद्धा असतात
ज्यात जन्मानेच प्रवेश होतो, (मुख्यत) अंतर्गतच विवाह होतात, ज्याला ‘आपण विरुद्ध  ते’ अशी भावना असते, असा कोणताही गट म्हणजे जमातच होय. अगदी सोपे उदाहरण म्हणजे ‘जात’ हीसुद्धा जमातच असते. वर्णानेसुद्धा जमात बनते. (येथे कातडीचा रंग, चातुर्वण्र्य हे जातींतच मिसळले आहे.) वांशिक जमाती असतात. भाषक जमाती असतात, उदा. कॅनडात, फ्रेंच भाषक कॅनेडियन्सनी ‘‘आमच्यापकी जर कोणी, मुलाला इंग्लिश शाळेत घालायचा प्रयत्न केला तर, शाळेने प्रवेश देण्यावर, सरकारने बंदी घालावी’’ अशी तद्दन जमातवादी मागणी केली होती! प्रांतीय जमाती असतात. धार्मिक उप-पंथीयसुद्धा जमाती असतात. ‘‘आमच्या समाजात’’ हे शब्द ‘‘आमच्या जमातीत (कम्युनिटी)’’चे ‘सुशब्दी’करण (युफेमिझम) असते.
जमातवाद म्हणजेच कम्युनॅलिझम कधी उद्भवतो? जेव्हा ‘आपल्यातल्यांना’ एक न्याय आणि ‘बाहेरच्यांना’ दुसरा न्याय असे आपण मानू लागतो, तेव्हा आपण जमातवादी बनतो. जेव्हा स्वतच्या अपयशाला ‘आपले’ अपयश गणून त्याचे खापर ‘बाहेरच्यांवर’ फोडू लागतो, तेव्हा आपण जमातवादी बनतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आपण’ ‘बाहेरच्या’शी कितीही क्रूर हिंसकतेने वागतो, पण ‘आपल्याला’ ती हिंसाच वाटेनाशी होते, तेव्हा आपण पुरते जमातवादी बनलेलो असतो. जमात धम्रेतरही असू शकते, पण धार्मिक-जमातवादांनाच कम्युनॅलिझम म्हणण्याने त्याचा थिओक्रसीशी (धर्म-राज्याशी) उगाचच घोळ होतो आहे. महत्त्वाचे म्हणजे कम्युनॅलिझमच्या विरुद्ध अर्थाचा वाद कॉस्मोपॉलिटनिझम, हा आहे. त्याचा अर्थ, कोणत्याच मानवाला ‘बाहेरचा’ न गणणे, विश्व-नागरिकत्व-वाद, असा होतो. या संदर्भात पाहता, कोणताही आक्रमक राष्ट्रवाददेखील इहवादी असला तरी, जमातवादच ठरतो. जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म-मानव-वाद’ अशी मांडणी करत, हे या संदर्भात लक्षणीय आहे.
हिंदूंवर जास्त जबाबदारी का?
विविध जमातवादाच्या स्पध्रेत हिंदू-जमातवाद उभा करणे, म्हणजे आशेचा शेवटचा किरणही झाकोळण्यासारखे आहे. कारण इहवाद अमलात आणायचा तर त्यासाठी, सर्वाधिक सशक्त कोण आहे? तर हिंदू! कारण कायदे पुरवणारे हिंदू-धर्मपीठ असे अस्तित्वात नाही. परंपरासुद्धा परमार्थ आणि व्यवहार यांना वेगळे मानणारी, सर्वाधिक बहुपंथ समावेशक, बदल सामावण्याबाबत अक्रियपणे खुली (लिबरल बाय ओमिशन) आहे. हिंदूंनी काहीही पाळले किंवा पाळले नाही, तरी ते हिंदूही राहतात व हातीपायी धडही राहतात. हिंदू हे सरसकट ‘हिंदुत्ववादी’ का बनत नाहीत? याचेही मुख्य कारण, ते हिंदू आहेत हेच आहे. ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेणारेही ‘‘आम्ही हिंदू हा शब्द भारतीय या अर्थाने वापरतो’’ अशी सबबी सांगणारी (अपोलोजेटिक) कसरत करतात. ‘‘सर्वधर्मीयांनी सच्चे धार्मिक बनणे म्हणजे चांगले नागरिक बनणे!’’ ही गांधीजी आणि गोळवलकरगुरुजी यांनी घेतलेली भूमिका आंतर-जमातीय असली, तरी इहराज्य-अग्रणी (व्हॅनगार्ड ऑफ सेक्युलॅरिझम) बनण्याचे जे पोटेन्शियल हिंदूंमध्ये आहे, त्यापासून हिंदूंना भरकटविणारी आहे.
मग ‘हिंदुत्ववाद’ म्हणजे काय उरते? जाहीर नव्हे, पण मनातून, तो स्वतला नकारात्मकपणे व्याख्यायित करणारा, एक प्रतिक्रियावाद आहे. जगातील सर्वच बिगर-मुस्लिमांत व उदार-मुस्लिमांत इस्लामोफोबिया (फोबिया= भय वास्तविक+काल्पनिक) कमी-अधिक प्रमाणात आहे, ही एक वस्तुस्थिती आहे. जे इस्लामोफोबियाला मुख्य मुद्दा बनवतात, ते हिंदुत्ववादी! हीच खरी ‘अंदरकी’ व्याख्या आहे. खुद्द मुस्लीम हे तर इस्लाम आणि आधुनिकता यातील जबरदस्त ताण सर्वाधिक सोसताहेत. तसेच इहवादाला, जरी सर्वच धर्मापासून धोका तरी, तो इस्लामपासून काहीसा जास्त आहे हेही खरेच. आता हा भयगंड कसा निवळवायचा? मुस्लिमांत प्रति-भयगंड निर्माण करून? त्यांची अशी दुहेरी कोंडी करणे, हे सरळसरळ जमातवादीही ठरते आणि इस्लामी कडवेपणाला, असुरक्षिततेची जोड देण्याद्वारे, पोषकच ठरते. म्हणूनच मी ‘हिंदुत्ववाद’ नाकारणेच योग्य मानतो.
ज्यांना िहदुहिताची काळजी आहे त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ‘राईट टू कुफ्र’ अर्थात ‘निष्ठावान नसण्याचे स्वातंत्र्य’ हे इहवादातच बसू शकते ‘भिन्न-निष्ठे’त नव्हे. म्हणूनच हिंदूहितासाठीदेखील ‘धार्मिकता’ चिकटवून घेणे (विकासाकडून ‘मंदिरा’कडे वळणे) कटाक्षाने टाळले पाहिजे. खरे तर हिंदू हितचिंतकांनी हिंदुत्ववाद हा शब्दच टाकला पाहिजे आणि स्वतला ‘खरे इहवादी, जे सर्वधर्मसमभावी नव्हेत’ असे व्याख्यायित केले पाहिजे.
हेच आम्हा सेक्युलर म्हणवून घेणाऱ्यांनाही लागू आहे. ‘हिंदुत्ववाद्यांच्या’ उलटे ते म्हणजे सेक्युलर, अशी परोपजीवी व्याख्या कशाला? हिंदुत्वाला स्वतचा असा अर्थ नाही, आपल्या इहवादाला तो आहे! तर मग हिंदुत्ववाद्यांना ‘प्रतिक्रिया’ म्हणून ‘सर्व-धर्म-सम(?)-अनुनय’ कशाला पत्करायचा?
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One wrong question secular or communal