scorecardresearch

व्यक्तिवेध: अ‍ॅलन रसब्रिजर

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमार्फत (एनएसए) जगभरातील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची माहिती गोळा केली जात असल्याच्या बातम्यांनी गेले वर्ष प्रचंड गाजवले. अमेरिकेची ही हेरगिरी उघड करण्याचे काम एनएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने केले, तर त्याला पहिल्यांदा प्रसिद्धी दिली ती ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या दैनिकाने.

व्यक्तिवेध: अ‍ॅलन रसब्रिजर

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमार्फत (एनएसए) जगभरातील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची माहिती गोळा केली जात असल्याच्या बातम्यांनी गेले वर्ष प्रचंड गाजवले. अमेरिकेची ही हेरगिरी उघड करण्याचे काम एनएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने केले, तर त्याला पहिल्यांदा प्रसिद्धी दिली ती ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या दैनिकाने. जर्मन, फ्रेंच सरकारप्रमुखांसह अनेकांवर पाळत ठेवण्यासाठी एनएसए देशी-विदेशी कंपन्यांची मदत घेत असल्याचा गौप्यस्फोट करणारी वृत्तमालिका ‘गार्डियन’ने चालवली होती. याच कामगिरीसाठी ‘गार्डियन’चे मुख्य संपादक अ‍ॅलन रसब्रिजर यांना दोन दिवसांपूर्वी ‘युरोपियन प्रेस’तर्फे ‘विशेष पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. ‘एनएसएच्या टेहळणीचा गौप्यस्फोट’ या रसब्रिजर यांच्या वृत्तमालिकेपेक्षा महत्त्वाची ठरली ती स्नोडेनने दिलेल्या माहितीच्या हार्डडिस्क सरकारच्या हवाली न करण्याची त्यांची भूमिका. त्यांच्यावर देशभक्त नसल्याची टीका झाली, त्यांची प्रतिमा खालावल्याची आकडेवारी सांगणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, रसब्रिजर हे आपल्या भूमिकेवर कायम राहिले. गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेल्या रसब्रिजर यांना अनेकदा अशा टीकेला तोंड द्यावे लागले. केम्ब्रिजमधील मॅगडेलेन कॉलेजमधून इंग्रजी साहित्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रसब्रिजर यांनी ‘केम्ब्रिज इव्हिनिंग न्यूज’ या वृत्तपत्रातून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९७९मध्ये ते ‘गार्डियन’मध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाले. बातमीदारी करतानाच त्यांनी स्तंभलेखनही केले. १९८६मध्ये टीव्ही समीक्षक म्हणून ‘ऑब्झव्‍‌र्हर’मध्ये रुजू झाले. मात्र, वर्षभरातच ती नोकरी सोडून अ‍ॅलन हे वॉशिंग्टन येथून सुरू झालेल्या ‘लंडन डेली न्यूज’चे संपादक बनले. त्यांची ही कारकीर्द त्या वृत्तपत्राइतकीच अल्पजीवी ठरल्याने १९८८मध्ये ते पुन्हा ‘गार्डियन’मध्ये परतले. आधी ‘पुरवणी संपादक’, तर १९९५मध्ये संपादकपदी आले. गार्डियन वृत्तपत्राचा आकार ‘ब्रॉडशिट’पासून ‘बर्लिनर’ करण्यात त्यांची भूमिका मोठी आहे. तसेच आजघडीला जगभरातील सात कोटी वाचक असलेल्या गार्डियनच्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे श्रेयही त्यांनाच जाते. ‘गार्डियन’ हे बातम्यांखेरीज जगभराचे विचार-व्यासपीठ बनवण्याचा निर्णयही त्यांचाच.

एनएसएच्या टेहळणीचे पुरावे असलेल्या हार्डडिस्क आणि कागदपत्रे स्नोडेनने सर्वात प्रथम अमेरिकेतील स्तंभलेखक व वकील ग्लेन ग्रीनवर्ल्ड यांना दिली. ग्रीनवर्ल्ड यांनी हा दस्तावेज अ‍ॅलन यांच्याकडे सोपवला. त्यातूनच अमेरिकेच्या हेरगिरीचे सत्य ‘गार्डियन’ने जगासमोर मांडले. ‘पत्रकार नसलेले लोक जे लिखाण करतात, त्याबद्दल तुम्ही जिज्ञासू नसाल तर, तुम्ही फार काही गमावता,’ हे अ‍ॅलन यांचे म्हणणे किती गंभीर आहे, हे यातून समजते!

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2014 at 01:01 IST

संबंधित बातम्या