मराठी चित्रपटातील ध्वनी या प्रांतात हिंदी चित्रपटांच्या तोडीस तोड काम करणारा युवक म्हणून निमिष छेडाकडून सगळ्यांच्या खूपच अपेक्षा होत्या.  चित्रपट पाहताना समांतरपणे चालणारा ध्वनी त्यातील दृश्य भागाएवढाच महत्त्वाचा असतो. स्वतंत्र अस्तित्व जाणवत नसले, तरीही त्याचे नसणे जेवढे खुपणारे असते, त्याहूनही त्याचे कमअस्सल असणे अधिक त्रासदायक असते.
गेल्या दशकभराच्या काळात मराठी चित्रपटाने कात टाकली, ती विषयापासून ते मांडणीपर्यंत. त्यापूर्वीही मराठी चित्रपटातील विषय खूपच वेगळे असत. परंतु ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना त्यातील तांत्रिक अशुद्धपण अनेकदा खटकत असे. निमिष छेडा या तरुण ध्वनी अभियंत्याने (साऊंड इंजिनीअर) मराठी चित्रपट तंत्रदृष्टय़ा अधिक प्रगल्भ केला असे म्हणायला हवे. ध्वनिमुद्रणाचे तंत्र विकसित झाल्यानंतर त्याचे पुनर्मुद्रण आणि विविध आवाजांची तंत्राच्या साह्य़ाने मिसळण करणे हे एक नवे शास्त्र म्हणून आकाराला येऊ लागले. या शास्त्रात भारतातील अनेकांनी इतके प्रावीण्य मिळवले की, त्यामुळे जगातील अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाएवढेच भारतीय संगीतही तंत्रदृष्टय़ा पुढारलेले ठरले. चित्रपट बोलायला लागल्यानंतर चित्रीकरणाच्या वेळी प्रतिमा आणि आवाज या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मुद्रित होत असत. तेव्हाच्या चित्रपटातील नायक स्वत:च गात असे आणि चित्रीकरणाच्या वेळी गाण्यातील साथीची वाद्ये तिथेच हजर असत. प्रतिमा आणि ध्वनी वेगवेगळे मुद्रित करून एकमेकांशी जोडण्याच्या ‘डबिंग’च्या तंत्राने चित्रपटाचा चेहरामोहरा पार बदलून गेला. प्रत्यक्ष जागेवरील आवाजच (सिंक साऊंड) चित्रपटात वापरण्याऐवजी नंतर स्टुडिओमध्ये त्याचे पुन्हा ध्वनिमुद्रण करणे त्यामुळे शक्य झाले. निमिष छेडाने आपल्या तंत्रकौशल्याने चित्रपटातील हा ध्वनी अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
‘फँड्री’मधील काळी चिमणी तिच्या आवाजामुळे एखाद्या पात्रासारखी प्रेक्षकांना वारंवार भेटत राहते. हा तिचा आवाज तंतोतंत आणि नैसर्गिक वाटण्यासाठी तंत्राचीच आवश्यकता असते. हिंदी चित्रसृष्टीत त्याने केलेला ‘कमीने’ या चित्रपटामुळे तंत्र क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संपूर्ण चित्रपटभर समांतरपणे चालणारा वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी अचूक आणि स्वच्छपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याने चित्रपटाच्या एकूणच दर्जामध्ये फार मोलाची भर पडते, हे निमिषच्या कामाने सिद्ध झाले होते. पडद्यामागे राहून पडदाभर अस्तित्व दाखवणाऱ्या या तंत्राला सर्जनशीलतेची जोडही आवश्यक असते. निमिषकडे हाही गुण होता. नुसत्या तंत्रावरील प्रभुत्वाबरोबरच ते वापरण्यासाठी आवश्यक असणारे चातुर्यही त्याच्यापाशी होते. त्यामुळेच त्याचे अकाली अपघाती जाणे चटका लावून जाणारे ठरले आहे.