युरोप-अमेरिकेतील विद्यापीठांच्या प्रमुखपदी मूळ भारतीयांची नेमणूक झाली की, आपला ऊर अभिमानाने भरून येतो. अशा व्यक्तींची यादी मोठी लांबलचक आहे.. वाढते आहे, तरीही! बर्कले लॉ, कॅलिफोर्निया विद्यापीठ असे भारदस्त नाव असलेल्या विद्यापीठाचे प्रमुखपद सुजीत चौधरी मंगळवारपासून स्वीकारत असल्याची बातमी त्यामुळे तर लक्षणीय ठरलीच, पण ‘अमेरिकेतील सर्वोच्च दहा कायदा विद्यापीठांमधील एक’ अशी या विद्यापीठाची ख्याती असल्याने अभिमान सार्थ ठरला. ऑक्सफर्ड, टोरांटो आणि हार्वर्ड या विद्यापीठांतून कायद्याचे शिक्षण घेतलेले व मूळचे दिल्लीचे ४४ वर्षीय सुजीत घटनातज्ज्ञ म्हणून जास्त परिचित आहेत. अरब जगतातील लोकशाहीवादी क्रांतीनंतर सुजीत यांना लिबिया, इजिप्त, टय़ुनिशिया या देशांतून तेथील घटनानिर्मितीपासून ते ती राबवण्यापर्यंतच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रणे येऊ लागली. तौलनिक घटनात्मक कायदा व तौलनिक घटनात्मक विकास हे दोन विषय सुजीत यांच्या आवडीचे. न्यूयॉर्क विद्यापीठात कायदा विभागाचे प्रमुख असल्यापासून सुजीत यांनी तेथे घटनात्मक संक्रमण केंद्राची स्थापना केली. अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारे न्यूयॉर्क विद्यापीठ हे जगातील पहिले विद्यापीठ ठरले. गद्दाफीच्या पाडावानंतर लिबियात माजलेल्या अनागोंदीच्या पाश्र्वभूमीवर त्या देशात घटनात्मक कायदा कसा राबवला जावा, घटनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर कसे नियंत्रण ठेवावे, याचा सल्ला सुजीत यांनी लिबियातील राजकारण्यांना दिला. तुर्कस्तानातील विद्यमान घटनात्मक दुरुस्त्या, अरब जगतातील नवस्वातंत्र्यवादी देशांना पोषक ठरतील अशा घटनांची रचना यावरही सुजीत यांनी व्याख्याने दिली. त्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स या व्यासपीठाचा वापर केला. त्यांच्या या कार्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या वार्षकि अहवालात करण्यात आला होता. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ‘घटनात्मक संक्रमण कक्षा’चे सह-अध्यापक म्हणून चौधरी यांनी टय़ुनिशियातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. त्या घटनात्मक दुरुस्त्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. या भरीव कामगिरीमुळेच चौधरी यांची बर्कलेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. इजिप्त, जॉर्डन, लिबिया, टय़ुनिशिया, नेपाळ व श्रीलंका या देशांतील घटनात्मक संक्रमणकाळात सुजीत चौधरी यांनी जागतिक बँकेच्या सल्लागारपदाची भूमिकाही निभावली होती. यापूर्वी कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक खटलेही लढवले आहेत. अमेरिकेचे माजी सरन्यायाधीश अर्ल वॉरेन, माजी परराष्ट्रमंत्री डीन रस्क व सिलिकॉन व्हॅलीतील कायदातज्ज्ञ लॅरी सन्सिनी यांसारखे मातबर जिथून कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडले अशा विद्यापीठाचे प्रमुखपद चौधरी आता सांभाळत आहेत!
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2014 रोजी प्रकाशित
व्यक्तिवेध: सुजीत चौधरी
युरोप-अमेरिकेतील विद्यापीठांच्या प्रमुखपदी मूळ भारतीयांची नेमणूक झाली की, आपला ऊर अभिमानाने भरून येतो. अशा व्यक्तींची यादी मोठी लांबलचक आहे.. वाढते आहे, तरीही!

First published on: 02-07-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality sujit choudhary