निवडणुकांचा प्रचार व्यक्तिगत टीकेवर, चित्रविचित्र शब्दांमुळे मनोरंजनाच्या पातळीवर गेला, यास आपले सारे नेते जबाबदार असतीलच कसे? हे असे झाले ते उन्हे तापल्यामुळे.. किंवा काहीच नाही तर, थेट निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांमुळे.. असाच निष्कर्ष काढलेला बरा!
अंगाची काहिली करणाऱ्या ऐन उन्हाळ्यात जवळपास दीड महिनाभर चालणाऱ्या या निवडणुकीने नेत्यांच्या अंगातील केवळ ऊर्जाच नव्हे तर डोक्यातील मुद्देही पार कोळपून गेलेले दिसतात आणि एकदा का मुद्दे संपले की कितीही चतुर वक्ता असला तरी तो गडबडतो. रंगमचावर, व्यासपीठावर वेळ तर आणखी काढायचा आहे आणि हाती मुद्देच नाहीत. अशी वेळ आली की त्याची गाडी घसरते आणि त्याला मिळेल त्या मुद्दय़ांना लोंबकळत वेळ ढकलावा लागतो. विद्यमान राजकीय वातावरणावरून याचे प्रत्यंतर यावे. सुरुवातीला काँग्रेसचे निकम्मे सरकार, मनमोहन सिंग सरकारचा धोरण लकवा आणि सिंग सरकारच्या काळात झालेले एकूणच भ्रष्टाचार यावर विरोधी पक्षांचा भर होता. त्याला तोंड देताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे किती धर्माध आहेत, त्यांच्याच काळात अल्पसंख्याकांवर कसे अत्याचार झाले वगैरे बचाव काँग्रेसने करून पाहिला. मतदानाच्या दोन फेऱ्या यावर निघून गेल्या. परंतु पुढे केवळ एवढय़ावरच तग धरणे राजकीय नेत्यांना अवघड होत चालले असावे. धार्मिक-निधार्मिक, भ्रष्ट-अभ्रष्ट वगैरे चावून चोथा झालेले मुद्दे ते किती काळ चघळणार? त्याच त्याच मुद्दय़ांवरचे आख्यान काही रंगेना. वारकरी संप्रदायात चक्री कीर्तन नावाचा एक प्रकार आहे. हा झाला की तो, असे करत कीर्तन अखंड चालू ठेवले जाते. काही काळासाठी बुवा बदलतात, पण कीर्तनात खंड पडत नाही. त्याप्रमाणे येथेही होताना दिसते. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या बिनीच्या कीर्तनकारांचे आख्यान पडू लागले आहे हे दिसल्यावर बाबा रामदेव, प्रवीण तोगडिया, प्रियंका, ममता आदी कथेकरी या चक्री कीर्तनात नवनव्या मुद्दय़ांच्या चिपळ्या आणि एकताऱ्या घेऊन आख्यानाला उभे राहिलेले दिसतात. यातील बाबा रामदेव भगवी वस्त्रे परिधान करीत असले तरी विवेकाचा पूर्ण अभाव असल्याने त्यांना गांभीर्याने घेण्याचे काहीच कारण नाही. या आधी कीर्तनाचा पूर्वरंग सुरू होता तेव्हा प्रियंका आणि ममता आपापल्या व्यापात व्यग्र होत्या. त्यामुळे पूर्वरंगात काय सुरू होते याचा अंदाज त्यांना आला नाही. कीर्तनास उभ्या राहिल्याबरोबर त्यांचा सूर वेगळाच लागला तो त्यामुळे.
यातील सौ. प्रियंकाताईंनी काँग्रेसच्या विरोधात आव्हान देणारे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची छातीच काढली. देश चालवण्यासाठी ५६ इंची छाती लागत नाही, असे त्यांचे मत आहे. मोदी यांना सौ. प्रियंकाताईंचे यजमान चि. रॉबर्ट वढेरा यांच्याप्रमाणे तालमीत अंगमेहनत करण्याची सवय नसावी. हरयाणवी ढंगाचे चि. रॉबर्ट व्यायामशाळेत हय्याहुप्या करीत दिवसाचा बराच काळ घालवत असल्यामुळे त्यांच्या दंडबेटकुळय़ा आणि छाती कशी टर्र फुगलेली. त्याचमुळे मोदी यांच्याकडे ती नसल्याची जाणीव सौ. प्रियंकाताईंना झाली असावी. त्यात मोदी आणि त्यांच्या भाजप साथीदारांनी आपल्या पतीराजाचा वारंवार चालवलेला पाणउताराही (खरे तर जमीनउतारा) सौ. प्रियंकाताईंना व्यथित करीत असावा. त्यामुळेही त्यांनी न बोलता थेट मोदी यांच्या छातीलाच हात घातला. पतीचा जाहीर अपमान कोणती आर्य स्त्री सहन करेल? तेव्हा सौ. प्रियंकाताईंना सात्त्विक संताप येणे तसे नैसर्गिक म्हणावयास हवे. भारतीय संस्कृतीत त्या किती मुरल्या आहेत हेच त्यावरून लक्षात यावे. फक्त प्रश्न पडतो तो इतकाच की सौ. प्रियंकाताईंचे घरधनी असलेल्या चि. रॉबर्टभाऊंवर जमीनजुमला हडपण्याचे आरोप होऊन बराच काळ लोटला. किमान अर्धे वर्ष तरी त्यात गुजरले असावे. परंतु इतके दिवस या सगळ्या आरोपांना प्रियंकाताईंनी कधी उत्तर दिल्याचे कानावर नाही. याची जाणीव त्यांनाही झाली असावी. त्याचमुळे त्या मोदी यांना अद्वातद्वा बोलल्या. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उद्योग हे बिळातून बाहेर पडणाऱ्या उंदरांप्रमाणे आहेत, असेही त्यांनी ठणकावले. आपण आणि आपले पती कोणालाही घाबरत नाही, अशी ग्वाही देत त्यांनी मोदी यांना आव्हानही दिले. एवढा तगडा, तडफदार पैलवान गडी घरी असताना सौ. प्रियंकाताईंनी कोणाला कशाला घाबरावे? असो.
सौ. प्रियंकाताईंच्या पाठोपाठ एकेकाळी सत्तेतील त्यांच्या सवंगडी सुश्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या आख्यानात एकदम टिपेचा सूर लावला. आतापर्यंतच्या निवडणुकांत भाजप वा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी प. बंगाल या राज्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. ही प्रथा यंदा मोडली गेली ती भाजपकडून. एकेकाळी डाव्यांच्या तांबडय़ा लाल रंगात नखशिखांत न्हाऊन निघालेल्या या राज्यात यंदाच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर भगवाही रंग उजळला. दरम्यान, डाव्यांची लाली पुसून तृणमूलाची दोन हिरवी पाती सुश्री ममताबाईंनी मोठय़ा प्रमाणावर लावली होती. ती चांगलीच पसरली आणि डाव्यांचा लालिमा त्यांनी पुसून टाकला. तेव्हा इतके सारे कष्ट करून गवताची दोन पाती जरा कुठे उसंत घेतात न घेतात तोच मोदींची भगवी लाट त्या राज्यात आल्यामुळे सुश्री ममताबाईंना राग येणे साहजिकच. त्याचमुळे त्या उद्वेगातून मोदी म्हणजे खाटिक, अशी टीका त्यांनी केली. ही उपमाही त्यांच्या लाल रंगावरील प्रेमाची साक्ष देणारी. सुश्री ममताबाईंना खरे तर या आधी मोदींबरोबरील राजकीय पक्षसहवासाचा तसा चांगलाच अनुभव. परंतु तेव्हा मोदी हे गुजरातपुरतेच मर्यादित होते. पश्चिमेच्या एका टोकाकडून पूर्वेच्या दुसऱ्या टोकाकडे ते येताना दिसल्यावर आपल्या दोन कोवळ्या पात्यांचे काय होणार अशी रास्त चिंता त्यांना वाटली. सुश्री ममताबाई तशा कलाकार. चित्रे काढण्याची त्यांना भारीच हौस. राजकारणी आणि त्यातही सत्ताधारी राजकारणी, कलाकार असेल तर इतरांची फारच पंचाईत होते. त्याने काहीही रेघोटय़ा मारल्या तरी क्या बात है म्हणावे लागते. स्वत: पिंजऱ्यात बसून बाहेरच्या वाघाचे छायाचित्र काढले तर त्याच्या शौर्याची तारीफ करावी लागते आणि व्यंगचित्र काढले तर खो खो हसावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्री सुश्री ममताबाईंच्या चित्रांना तशी फारच मागणी. तेव्हा अशा त्यांच्या या चित्रकलेविषयी मोदी यांनी अनुदार उद्गार काढले. आपली चित्रे दोन-पाच लाख रुपयांत विकली जात होती, परंतु एकाच चित्रास जवळपास दोन कोटभर रुपयांची किंमत कशी आली, असा सवाल मोदी यांनी थेट वंगबंधूंच्या मेळाव्यातच केला. समस्त भद्रलोकात त्यामुळे त्या विषयावर गोलगप्पा सुरू झाल्या असून मोदी यांना ही खोबोर दिली कोणी, याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. आता इतका व्यक्तिगत मामला काढल्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांची ममता आटणार हे ओघाने आलेच. त्यामुळेच त्याला लगेच सुश्री ममताबाईंच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले आणि मोदी यांची तुलना थेट खाटकाशीच झाली.
अशा तऱ्हेने निवडणुकांचा प्रचार तूर्त मनोरंजनाच्या पातळीवर गेला असून, त्यास सर्वश्री निवडणूक आयोगच जबाबदार आहे, असे आमचे मत आहे. प्रचाराचे गुऱ्हाळ लांबवून लांबवणार तरी किती? तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त वीरवल्ली सुंदरम संपथ यांनी याची दखल घेऊन पुन्हा असे होणार नाही याची काळजी द्यावी. तूर्त तरी या निवडणुकीतील सुंदरम संपथ आले, असेच म्हणावे लागेल.