भारतीय राजकारणातील एक अत्यंत गंभीर असे पर्व आता सुरू झालेले आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ अशा निवडणुका तोंडावर आलेल्या असून, त्याकडे मतदार बंधुभगिनी या नात्याने आपण अत्यंत गांभीर्याने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. हे मुद्दामहून सांगण्याचे कारण म्हणजे भारताचे ‘स्टॅच्यू’टरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतेच केलेले विधान. राहुल गांधी हे आपले लाडके नेते आहेत. ते काँग्रेसचे तारणहारही आहेत. हे सर्वाना माहीतच आहे. परंतु मनमोहन सिंग यांनी ते नैसर्गिक नेते आहेत, अशी गोपनीय माहिती नुकतीच जाहीर केली. तर त्यांचे हे विधान अनेकांनी विनोदी म्हणून सोडून दिले. वस्तुत: ते विधान मुळीच विनोदी नव्हते. मनमोहन सिंग हे काही विनोदी बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हेत. मुळातच ते बोलण्यासाठीही प्रसिद्ध नाहीत. असे असताना ते बोलले, हा कुणाला विनोद वाटू शकतो. भायखळ्याच्या पुलाखालचा खडा पारशी खिक्कन हसला, तर कसे वाटेल, असा प्रश्न एकदा पु. ल. देशपांडे यांनी विचारला होता. तसा संशय मनमोहन सिंग यांच्याबाबतीत कोणास येऊ शकतो. तेव्हा त्यात काही चूक आहे असे नाही. परंतु मनमोहन सिंग हे मुळात अर्थशास्त्रज्ञ असल्याने ते विनोदासारख्या अशास्त्रीय गोष्टी करीत नाहीत. राहुल हे नैसर्गिक नेते आहेत हे त्यांचे विधान तर पूर्णत: शास्त्राधारित आहे. आता कोणी म्हणेल, की नेत्यांमध्ये नैसर्गिक आणि अनैसर्गिक असा काही प्रकार असतो का? तर असतो. काही नेते, उदा. राहुल गांधी, नैसर्गिक असतात. कारण त्यांच्या रक्तातच नेतृत्वाचा डीएनए असतो. काही नेते, उदा. स्वत: महामहीम सिंग, अनैसर्गिक असतात! सिंग यांनी हे शास्त्रीय सत्य अत्यंत गांभीर्याने लोकांसमोर आणले याबाबत त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. या सत्यामुळे घराणेशाही वगैरे टीका करणाऱ्या पत्रपंडितांच्या तोंडास चांगलाच लगाम बसेल. बिहारचे विकासपुरुष नितीशकुमार हे सेक्युलर असल्याचेही महामहीम पंतप्रधानांनी याच दमात सांगून टाकले, तेही एक बरे झाले. त्यामुळे भाजप नेत्यांना आता नितीशकुमार यांच्यावर मनसोक्त टीका करता येईल. कारण कालपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारे खरे सेक्युलर नितीशकुमार आज एनडीएबाहेर पडताच एकदम शत्रुवत कसे मानावेत, असा प्रश्न तमाम भाजपाईंसमोर होता. तो मनमोहन सिंग यांच्या या विधानाने सुटला आहे. कारण या देशात भाजपसोबत नसणारे सेक्युलर हे ढोंगी सेक्युलर मानावेत असा कायदाच आहे. तसेच त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, कृषिराज्यमंत्री डॉ. चरणदास महन्त यांनी जे विधान केले तेही सहजपणे विनोदी म्हणून उडवून लावता कामा नये. सोनिया गांधी यांनी आपणांस काँग्रेसचे छत्तीसगडमधील प्रदेश कार्यालय झाडून काढण्यास सांगितले, तरी आपण ते करू, अशी वीरगर्जना डॉ. चरणदास यांनी केली आहे. आता त्यांच्या नावास ते जागले, असे यावर कोणी म्हणू शकेल. परंतु राजकारणातील एक अत्यंत गंभीर पर्व सध्या सुरू असल्याने आपण तसे म्हणू नये. त्यांच्या विधानांना विनोदी समजू नये. उलट महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी संजय गांधी यांची ज्या प्रकारे सेवा केली होती, त्याचाच कित्ता गिरवणारा आदर्श पक्षकार्यकर्ता म्हणून त्यांचा मनोमन सत्कार करावा. निवडणुकांची घटिका जसजशी समीप येऊ लागेल, तसतशा अशा आणखीही सत्कारमूर्ती आपणांसमोर येतील. गोव्यातून त्याची सुरुवात झालीच आहे. आपण त्याकडे अत्यंत गांभीर्यानेच पाहिले पाहिजे. अखेर राजकारण म्हणजे ज्योक नसतो!
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2013 रोजी प्रकाशित
राजकारण म्हणजे ‘ज्योक’ नव्हे!
भारतीय राजकारणातील एक अत्यंत गंभीर असे पर्व आता सुरू झालेले आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ अशा निवडणुका तोंडावर आलेल्या असून, त्याकडे मतदार बंधुभगिनी या नात्याने आपण अत्यंत गांभीर्याने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. हे मुद्दामहून सांगण्याचे कारण म्हणजे भारताचे ‘स्टॅच्यू’टरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतेच केलेले विधान.

First published on: 19-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics is not a joke