अण्णा आंदोलनातील ‘अ‍ॅजिटप्रॉप’

वाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता.

Anna movement, Agitprop propaganda
अण्णा आंदोलन – प्रोपगंडातील अनेक तंत्रांचा समुच्चय.

अ‍ॅजिटप्रॉप नेहमीच संघर्षांस प्रोत्साहन देत असतो. हा संघर्ष कशासाठीही असू शकतो. तो राजकीय असू शकतो वा सामाजिक. अण्णा आंदोलनात या संघर्षांचे स्वरूप थेट राजकीय होते. ते अत्यंत योजनाबद्ध होते. येथे खरा प्रश्न हा आहे, की त्यातील अ‍ॅजिटप्रॉपने कोटय़वधी लोकांना कसे गुंगवले?

सहा वर्षांपूर्वी सर्व देश गदागदा हलवून सोडला होता अण्णा आंदोलनाने. भ्रष्टाचारमुक्ती हा त्या आंदोलनाचा नारा होता आणि जनलोकपाल कायदा ही मागणी. त्यासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते आणि संपूर्ण देश त्यांना पाठिंबा देण्यासाठी गांधी टोपी घालून रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी भ्रष्टाचारविरोधी मोर्चे, निदर्शने होत होती. दिल्लीतील जंतरमंतर आणि नंतर रामलीला मैदान ही तीर्थक्षेत्रे बनली होती. वाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता. काँग्रेसचे सरकार हे सरकार नसून सैतान आहे, हीच जनभावना होती. त्या सरकारविरुद्ध जनतेने दुसरे स्वातंत्र्ययुद्ध छेडले होते. आज ते युद्ध, ते आंदोलन, तो भ्रष्टाचारविरोध आणि ती जनलोकपालची मागणी.. सारे कापरासारखे विरून गेले आहे. मग त्या २०११ने नेमके काय साधले? तर त्याचे उत्तर आहे – त्यातून २०१४ अवतरले..

अशा कोणत्याही आंदोलनांचा उभा काप घेतला तर आपल्याला स्पष्ट दिसतो तो ‘अ‍ॅजिटप्रॉप’. हे प्रोपगंडाचे तंत्र मूळचे सोव्हिएत रशियातले. शीतयुद्धाच्या काळात विकसित झालेले. भारत स्वतंत्र झाला त्याच वर्षी सोव्हिएत रशियामध्ये एका खास विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे नाव – कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे आंदोलन आणि प्रोपगंडा संचालन – अ‍ॅजिटेशन प्रोपगंडा. अ‍ॅजिटप्रॉप हे त्याचेच लघुरूप. या प्रोपगंडाचा हेतू होता लोकांना एका साम्यवादी स्वर्गाचे स्वप्न दाखविणे. असा स्वर्ग जेथे सामान्यांचे शोषण नसेल, सगळेच स्वतंत्र असतील, समान असतील. त्या प्रोपगंडासाठी पुस्तकांपासून चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारची माध्यमे वापरण्यात आली. निरक्षर रशियनांच्या मनांवर राजकीय संदेश कोरण्यासाठी मूर्ती, प्रतिमा, चिन्हे यांचा वापर करण्यात येई. पूर्वी त्याचे माध्यम रोस्टा विंडो चित्रे हे होते. त्यांच्यासाठी भित्तिवृत्तपत्रे काढण्यात येत. पुढे रेल्वे हे त्या प्रोपगंडाचे वाहन बनले. रशियात अ‍ॅजिट-ट्रेन्स सुरू करण्यात आल्या होत्या. ‘द टेन कमांडमेन्ट्स ऑफ प्रोपगंडा’मध्ये डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक सांगतात – अ‍ॅजिटप्रॉपचा वापर केला जातो तो ‘पूर्वापार चालत आलेल्या, कमीअधिक स्थिर असलेल्या सामाजिक रचनांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी, त्यांचे विघटन वा विलगीकरण करण्यासाठी.’ सामाजिक वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते. परंतु ‘ते वास्तव म्हणजे शोषित – त्यात शोषितांची वकिली करणारे आले आणि शोषितांच्या बाजूने बोलण्याचा दावा करणारे प्रोपगंडाकारही आले. हे सारे – विरुद्ध शोषक यांच्यातील भावनाटय़ात्मक संघर्ष’ असे सुलभीकरण केले जाते. क्रांतिकारी प्रोपगंडात याचा सर्रास वापर केला जातो. लोकांच्या समस्या असतात, तक्रारी असतात. त्यांना याद्वारे बहकावता येते. त्यांच्यावर होणारा अन्याय सहसा अत्यंत ‘प्रेमपूर्वक सखोलपणे’ मांडून त्यांना जाणीवपूर्वक भडकावले जाते. डॉ. पॅट्रिक यांनी अ‍ॅजिटप्रॉप आणि झुंडीचे मानसशास्त्र यांतील एक महत्त्वाचे तत्त्व सांगितले आहे. ते म्हणतात – ‘एखादा जमाव वा गट एकदा का अत्यंत उत्तेजित अवस्थेला पोहोचला की एकमेकांशी समन्वय साधून काम करीत असलेला दोन-तीन ‘संघटकां’चा छोटासा गटही त्याला नियंत्रित करू शकतो, त्याला दिशा देऊ  शकतो. केवळ उत्तेजित झालेला जमावच बॅरिकेड तोडून टाकू शकतो. त्यांना उत्तेजित करणे हेच अ‍ॅजिटप्रॉपचे उद्दिष्ट असते.’ या जमावाचे व्यवस्थापन कशामुळे करता येते? तर त्यांच्यासमोर अत्यंत ठोस आणि स्पष्टपणे एक मूलभूत दृष्टिकोन वा भूमिका मांडण्यात आलेली असते. म्हणजे आपल्या नेत्याची – समजा, तो एखाद्या कामगार संघटनेचा प्रमुख असेल तर त्याची – एखाद्या विशिष्ट विषयासंबंधीची भूमिका काय असेल हे त्यांना विचारावे लागत नाही. ते त्यांना आधीच माहीत असते. त्या नेत्याच्या सांगण्यावरून ते निदर्शने करतील, पत्रे लिहितील, दंगा करतील, हरताळ करतील, न्यायालयात जातील, देणग्या देतील आणि हे करताना आपण इतरांहून नैतिकदृष्टय़ा श्रेष्ठ आहोत, हीच त्यांची भावना असेल. अ‍ॅजिटप्रॉपने त्यांच्या जगाची विभागणी ‘आहे रे’ वा ‘नाही रे’, न्याय्य वा अन्याय्य, चांगले वा वाईट अशा दोन गटांत केलेली असते. डॉ. पॅट्रिक सांगतात- ‘अ‍ॅजिटप्रॉपचा वापर करणाऱ्यांना कधीकधी संघटक असेही म्हणतात.’ अ‍ॅजिटप्रॉप नेहमीच संघर्षांस प्रोत्साहन देत असतो. हा संघर्ष कशासाठीही असू शकतो. तो राजकीय असू शकतो वा सामाजिक.

अण्णा आंदोलनात या संघर्षांचे स्वरूप थेट राजकीय होते. भ्रष्ट आणि दुर्जन सरकार विरुद्ध सामान्य सज्जन जनता असे स्वरूप त्याला देण्यात आलेले होते. या आंदोलनामागच्या राजकारणात जाण्याचे हे स्थळ नव्हे. मात्र येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, की ते अत्यंत योजनाबद्ध होते. येथे खरा प्रश्न हा आहे, की त्यातील अ‍ॅजिटप्रॉपने कोटय़वधी लोकांना कसे गुंगवले?

या आंदोलनाने लोक उत्तेजित झाले, जनलोकपालसारखा कायदा अंतिमत: ‘लोकांच्या लोकशाही’ला मारक ठरणारा असूनही तोच देशाचा उद्धारकर्ता आणि भ्रष्टाचारहर्ता आहे असे त्यांना केवळ ‘वाटू’ लागले याचे एक कारण होते अण्णा हजारे यांचे माध्यमांतून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व. दिल्लीत अण्णांचे आंदोलन सुरू झाले तेव्हा त्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या एका नवराष्ट्रवादी वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने नंतर मात्र त्या आंदोलनाचे न थकता अविरत वार्ताकन केले. त्याचे मनपरिवर्तन कसे झाले हा वेगळा मुद्दा; परंतु त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी सतत हे आंदोलन लोकांच्या नजरेसमोर ठेवले. दूरचित्रवाणीला ओढ असते ती नाटय़मय घटनांची. गांधीवादी उपोषणात तसे काही नाटय़ नव्हे; परंतु वाहिन्यांनी – ‘इमेज’ या पुस्तकाचे लेखक डॅनिएल बूरस्टिन यांच्या शब्दांत सांगायचे, तर – त्याचा ‘स्यूडो इव्हेन्ट’ – छद्म कार्यक्रम – तयार केला. वाहिन्यांवरील चर्चा हा छद्म कार्यक्रमाचाच नमुना. भारतीय दूरचित्रवाणीवरील या कार्यक्रमाचे स्वरूप हे ‘पब्लिक लिंचिंग’सारखे असते. एखादी विरोधी बाजू ठेवायची आणि बाकीच्या सर्वानी त्याला घेरून चेचायचे. त्यातून कोणाचेही प्रबोधन होत नसते. ते कोणीही प्रबोधनासाठी पाहात नसते. दाक्षिणात्य मारधाडपट तसाच तो. विरोधकांचे राक्षसीकरण करतानाच, लोकांच्या मनातील विविध लोकप्रिय प्रतिमांचे दृढीकरण करतानाच त्यांच्या तथाकथित नैतिक श्रेष्ठत्वाच्या भावनेला खतपाणी घालण्याचे काम त्यातून चालते. ‘प्रोपगंडा हा मोजक्याच मुद्दय़ांपुरता मर्यादित असला पाहिजे. शक्यतो त्यात एकसाची प्रतिमांचा वापर करण्यात आला पाहिजे आणि तुम्हाला त्यातून जे काही सांगायचे आहे ते अगदी शेवटच्या माणसाला समजत नाही, तोवर सतत त्याचीच टिमकी वाजवत राहिली पाहिजे,’ असे हिटलरचे ‘माइन काम्फ’ सांगते. अण्णा आंदोलनाच्या काळात हेच करण्यात येत होते.

अण्णा हजारे सांगत होते की, ‘गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले आहेत. ते भारतमातेची लूटमार करीत आहेत. त्यांच्या तावडीतून भारतमातेला मुक्त करायचे आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे.’ वाहिन्यांनी अण्णांना ‘दुसरा गांधी’ बनविले होते आणि त्यांच्या व्यासपीठावर सातत्याने तिरंगा झेंडा आणि भारतमातेचे चित्र या दोन प्रतिमा दिसत होत्या.  अण्णा हे गांधी नव्हेत. गांधीवादी मार्गावर त्यांचा फारसा विश्वासही दिसत नाही; परंतु त्यांची ती बाजू झाकून ठेवण्यात आली होती. (प्रोपगंडा तंत्र – कार्ड स्टॅकिंग.) तिरंगा ध्वज, भारतमाता या चित्रांतून, गोरे-काळे इंग्रज अशा प्रतिमांतून लोकांच्या मनातील राष्ट्रभावनेला आवाहन करण्यात येत होते. ज्याच्या हाती तिरंगा तो देशप्रेमी असे साधे समीकरण उभे करण्यात आले होते. (प्रोपगंडा तंत्र – चमकदार सामान्यता.) अण्णा हे साधे आहेत. ते स्वत:च सांगत की, ‘मी फकीर आहे.’ त्यातून ते हे सांगत असत, की म्हणजे मी जे करतो ते गरिबांच्या हिताचे आहे. (प्रोपगंडा तंत्र – प्लेन फोक्स.) आता अशा माणसाच्या मागे उभे राहायलाच हवे. सगळी चांगली माणसे त्यांच्या मागे आहेत. त्यातून आपणही दूर राहिले तर बरे दिसणार नाही आणि मागे उभे राहायचे म्हणजे काय, तर गांधी टोपी घालून मेणबत्ती मोर्चात तर जायचे. अशा प्रकारे या आंदोलनाला माणसे जोडली गेली. (प्रोपगंडा तंत्र – बॅण्डवॅगन.) हे कुठेही जाणीवपूर्वक चाललेले नव्हते, किंबहुना प्रोपगंडाचे यश त्यातच असते, की आपल्याला तो कळतच नसतो. खुद्द अण्णा काय किंवा त्यांचे अनुयायी काय, हे सारेच त्या अ‍ॅजिटप्रॉपचे बळी ठरले होते. त्यांचे संघटन करणारे हात मात्र अदृश्य होते.. हे आंदोलन पुढे विरले, परंतु त्यातील प्रोपगंडाने तयार झालेली मने.. ती धुमसतच होती.  त्याचा परिणाम पुढे तीन वर्षांनी दिसला. अण्णा आंदोलनातील अ‍ॅजिटप्रॉपचे यश कोणते, तर ते तेच..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रचारभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Agitprop propaganda used in anna movement

ताज्या बातम्या