scorecardresearch

खराखुरा अष्टपैलू

साऱ्याच क्रिकेटपटूंना प्रसिद्धी, ग्लॅमर मिळते असे नाही, पण काही क्रिकेटपटूंना तेवढे ग्लॅमर मिळत नसले तरी त्यांची कामगिरी सारे काही सांगून जाते.

खराखुरा अष्टपैलू

साऱ्याच क्रिकेटपटूंना प्रसिद्धी, ग्लॅमर मिळते असे नाही, पण काही क्रिकेटपटूंना तेवढे ग्लॅमर मिळत नसले तरी त्यांची कामगिरी सारे काही सांगून जाते. यापैकी एक खराखुरा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणजे जॅक कॅलिस. दक्षिण आफ्रिकेच्या गाडीचे चाक पंक्चर झाल्यावर आपल्या कामगिरीने ‘जॅक’ लावणाऱ्या कॅलिसची कामगिरी नेत्रदीपक अशीच. त्यामुळेच त्याने घेतलेल्या निवृत्तीच्या अनपेक्षित निर्णयाने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे विश्वविक्रम मोडणारा जर कुणी खेळाडू क्रिकेटविश्वात खेळत होता तर तो कॅलिसच. सचिनपाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४४ शतके होती, तर १६५ सामन्यांमध्ये त्याने १३,१७४ धावा केल्या होत्या. त्यामुळे जर तो सचिनएवढे सामने खेळला असता तर त्याला सचिनचे विश्वविक्रम मोडण्याची सुवर्णसंधी होती;  त्याने ती संधी नाकारली. इथेच तो खऱ्या अर्थाने ‘खेळाडू’ ठरला.. शतकापेक्षा संघ महत्त्वाचा, अशी धारणा असणारा, चांगल्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू.  सचिनच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात, ‘आता पुरे कर’, अशी टीका सुरू झाली होती. कारण त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हतीच, तर त्याच्या धावाही आटल्या होत्या. पण तरीही तो खेळला आणि दोनशेव्या सामन्याच्या आकडय़ाला स्पर्श करीत त्याने क्रिकेटला अलविदा केले. कारण भारतामध्ये क्रिकेट धर्म आहे, पण कॅलिसच्या देशात क्रिकेट हा फक्त ‘एक खेळ’ आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंएवढे अन्य खेळाडूंना वलय प्राप्त होत नाही. पण कॅलिसच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याच्या धावा, त्याने मिळवलेले बऴी आणि त्याने टिपलेले झेल पाहता असा अष्टपैलू भारतात झालाच नसल्याचे निदर्शनास येते. याबाबत जागतिक पातळीवरही सर गॅरी सोबर्स, सर इयान बोथम यांच्यानंतर तिसरा क्रमांक कॅलिसचाच लागतो. त्याचबरोबर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजाराच्या वर धावा करणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. वर्णभेदानंतर केपलर वेसल्सने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर हॅन्सी क्रोनिएने या गाडीला वेग प्राप्त करून दिला होता. क्रोनिए ‘मॅच-फिक्सिंग’मध्ये सापडला आणि त्यामध्ये त्यांचा संघही भरडला गेला. या वेळी संघाची बांधणी करणे आणि लोकांचा पुन्हा एकदा विश्वास संपादन करणे सोपे नव्हते. ते ज्या खेळाडूंमुळे सोपे झाले त्यामधले एक नाव नक्कीच कॅलिसचे होते. १९९५ साली पदार्पण करणारा कॅलिस हा गॅरी कर्स्टन, शॉन पोलॉक, अ‍ॅलन डोनाल्ड, जॉन्टी ऱ्होड्स यांच्यापासून ते ग्रॅमी स्मिथ, डेल स्टेन, ए बी डी व्हिलियर्स, इम्रान ताहीर यांच्यासारख्या विविध संघांतील खेळाडूंबरोबर खेळला, पण एकाही खेळाडूने त्याच्या कामगिरीविषयी, त्याच्या तंदुरुस्तीविषयी कधीच शंका उपस्थित केली नाही. दुखापतींमधून सावरून त्याने प्रत्येक वेळी दमदार कामगिरी करीत पुनरागमन केले. पण काळाची पावले ओळखत त्याने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेटजगतात ‘चोकर्स’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करीत एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असावे. कारण ‘चोकर्स’ हा शिक्का पुसून त्याला देशाची नवी ओळख निर्माण करायची आहे, त्यामध्ये कॅलिस यशस्वी किंवा अपयशी होईल, पण त्याच्यासारखा दर्जेदार अष्टपैलू क्रिकेटपटू होणार नाही.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2013 at 02:14 IST

संबंधित बातम्या