रामलिंग राजू यांच्या सत्यम घोटाळ्यात कोणत्याही टप्प्यावर यात काही काळेबेरे आहे असे कोणालाही वाटले नाही. आपण चुकलो याची कबुली खुद्द राजू यांनीच दिल्यावर मात्र या माध्यमांनी सत्यमचे थडगे उकरणे सुरू केले आणि आपल्याला जणू हे माहीतच होते असा आव आणला. अशा तऱ्हेने सत्यम हे आपल्या आर्थिक व्यवस्थेचेच पाप बनले.
चतुर कंपन्या, लबाड हिशेब तपासनीस आणि सोयीस्कर बावळट माध्यमे एकत्र आली की काय होते ते सत्यम कम्प्युटर्सचे रामिलग राजू यांच्या उदाहरणावरून समजून घेता येईल. या राजू यांना सात वर्षांची सक्तमजुरी आणि पाच कोटी रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. विवेकाचा अभाव असेल तर सगळ्यांचेच कसे सगळे चुकते याचे हे मूर्तिमंत जिवंत उदाहरण. सत्यम ही एके काळची संगणकविश्वाच्या गळ्यातील ताईत असलेली कंपनी. राजू हे तिचे प्रवर्तक. एके काळी या राजू यांची प्रतिमा अर्थ क्षेत्रातील प्रसारमाध्यमांनी अशी रंगवली होती की जणू हा कोणी बिल गेट्स याचा भारतीय अवतारच. राजू यांचे कैसे कंपनी चालवणे, राजू यांचे कैसे बोलणे इतकेच काय ते माध्यमांनी म्हणायचे ठेवले होते. एखाद्याची लाट असेल तर त्या लाटेस आव्हान देण्याऐवजी त्या लाटेमागे धावत जाणे आपल्या प्रसारमाध्यमांना आवडते. मग ती लाट माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजू यांच्यासारख्यांची असो वा भ्रष्टाचारविरोधी लढय़ातील अण्णा हजारे, अरिवद केजरीवाल यांची. लाटेच्या मागे जाणे हेच माध्यमांनी आपले भागधेय मानलेले असल्यामुळे ती लाट फुटत नाही तोपर्यंत सत्याची जाणीवच आपल्या समाजास होत नाही. सत्यम कंपनीचे जे काही झाले त्यामुळे हेच दिसून येते. माध्यमांच्या जोडीला हिशेब तपासनीस कंपन्यांनी तटस्थपणे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे. सत्यमच्या बाबत तेदेखील घडले नाही. ज्यांनी हिशेब तपासायचा तेच ज्यांचा हिशेब तपासायचा त्यांना मिळाले. त्यामुळे रामिलग राजू सत्यमच्या बाबत जे काही दावे करीत होते त्याबाबत कोणीच कोणतेही प्रश्न निर्माण केले नाहीत. परिणामी सत्यम नावाने भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तयार झालेला मोठा फुगा तितकाच मोठा आवाज करीत फुटला आणि मग सगळ्यांना भान आले. यातील खेदाची बाब ही की या फुगा फुटण्यात आपल्या नियामक यंत्रणा वा माध्यमे यांचा काहीही वाटा नाही. हे प्रकरण उघडकीस आले ते खुद्द  राजू यांना अधिक लबाडी करणे झेपेनासे झाले म्हणून. त्यांनीच गुंतवणूकदारांना आणि सेबीसारख्या नियामकांना पत्र लिहून आपण काय उद्योग करीत आहोत याची कबुली दिली आणि मग सगळ्यांचेच धाबे दणाणले. तेव्हा हे जे काही झाले ते मुदलात समजून घेणे आवश्यक आहे. त्याचे कारण सत्यमचे काय झाले हे नाही. तर आपल्या आसपास असे अनेक सत्यम घडत असतात म्हणून.
सत्यमच्या घोटाळ्याचे सार एकाच वाक्यात सांगता येईल. ते म्हणजे सत्यमचे प्रवर्तक या नात्याने राजू यांनी कंपनीस मिळणारा असलेला महसूल किती तरी पटीने अधिक दाखवला आणि त्याच वेळी कंपनीची देणी कमी करून सांगितली. त्यामुळे कंपनीस उत्पन्न अधिक मिळणार आहे आणि देणी मात्र फारशी नाहीत असे चित्र तयार झाले. सगळे त्यास फसले. परंतु हे त्यास कसे शक्य झाले हे समजून घेण्यात या प्रकरणाची कारणमीमांसा दडलेली आहे. राजू यांनी यासाठी जवळपास सात हजार इतक्या बनावट कंपन्या तयार केल्या. या कंपन्यांन्7768ाा सत्यमने सेवा दिल्याचे दाखवले. याचा अर्थ या कंपन्यांकडून सत्यमला त्यापोटीचे मूल्य येणे आहे, असे दिसले. पण हे वाटते तितके सोपे नाही. कारण यासाठी कंपनीच्या खतावण्यात इतक्या साऱ्या बनावट नोंदी कराव्या लागल्या. इतकेच नाही तर या खात्यांतील देवाणघेवाण बँकांच्या नोंदीतही दिसणे आवश्यक असल्यामुळे बँकांमध्येही इतकी सारी बनावट खाती तयार केली गेली. राजू तेथेच थांबले नाहीत. त्यांनी या साऱ्या कंपन्यांकडून येणाऱ्या कथित आलेल्या वा येऊ घातलेल्या रकमांच्या नोंदी व्यवस्थितपणे नोंदवल्या. यातील काही बनावट कंपन्यांकडून बनावट महसूल मिळाल्याचे कंपनीने दाखवले होते. मग या बनावट निधीचे काय करायचे? राजू यांचे त्यावर उत्तर म्हणजे आपण या रकमेची बँक ठेवीपत्रे तयार केली. अर्थातच तीही बनावट. एकंदर हा सारा मामला किती रकमेचा असावा? तब्बल पाच हजार कोटी रुपये. २००८ सालच्या सप्टेंबर महिन्यात कंपनीची एकूण मत्ता ८७९५ कोटी रुपये इतकी होती. यात ५३१३ कोटी रु. इतकी रक्कम बँक पावत्या आदींत दाखवण्यात आली होती. परंतु त्या वेळी प्रत्यक्षात रक्कम होती फक्त ३०० कोटी रु. इतकीच. त्या वर्षीच्या आर्थिक वर्षांत सत्यमला सर्व खर्च वजा जाता नफा झाला होता फक्त ६१ कोटी रु. पण राजू यांनी तो दाखवला ६४९ कोटी रु. इतका. आता इतकी रोकड हाती आहे म्हणजे ती गुंतवायला हवीच. त्यामुळे राजू यांनी या रकमेतून अधिक गुंतवणुकीचा घाट घातला. या गुंतवणुकीसाठी दोन पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रातल्या कंपन्याच विकत घेण्याचे त्यांनी ठरवले. आता बोलाचीच कढी असेल तर त्यासाठी भातही बोलाचाच हवा. त्यामुळे या कंपन्याही दाखवण्यापुरत्याच. त्यांची नावे मेतास प्रॉपर्टीज आणि मेतास इन्फ्रा. त्या दोन्हीही राजू यांच्या कुटुंबीयांनीच स्थापन केलेल्या. म्हणजे फक्त  कागदोपत्रीच. या दोन कंपन्यांच्या मार्फत काही खरी गुंतवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या टप्प्यावर राजू फसले आणि थकलेही. कारण मुळातच आपल्या गल्ल्यात जी रक्कम नाहीच त्या रकमेतून खरेदी काय आणि कशी करणार? तेव्हा अखेर जे झाले ते पुरे असे त्यास वाटले आणि त्यांनी संबंधितांना पत्रे लिहून आपण फसवणूक करीत होतो, त्याची कबुली दिली. वास्तविक प्राइस वॉटर हाऊससारखी आंतरराष्ट्रीय हिशेब तपासनीस यंत्रणा सत्यमसाठी काम करीत होती. आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचे जमाखर्च चोख तपासणे हे या तटस्थ निरीक्षकाचे काम. पण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली. जाणूनबुजून वा नकळत या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. त्यामुळे कोणत्याही टप्प्यावर यात काही काळेबेरे आहे असे कोणालाही वाटले नाही. या हिशेब तपासनीस कंपनीच्या बरोबरीने माध्यमांनी- विशेषत: अर्थविषयक नियतकालिकांनी- विश्लेषण कौशल्य पणाला लावून राजू यांना प्रश्न विचारणे आवश्यक होते. माध्यमेही या कर्तव्यात चुकली. त्यांना नायक हवा होता. तो राजू यांच्या रूपाने मिळाला आणि मग सगळेच सामुदायिक गुणगानात रमले. परंतु आपण चुकलो याची कबुली खुद्द राजू यांनीच दिल्यावर मात्र या माध्यमांनी सत्यमचे थडगे उकरणे सुरू केले आणि आपल्याला जणू हे माहीतच होते असा आव आणला. अशा तऱ्हेने सत्यम हे आपल्या आर्थिक व्यवस्थेचेच पाप बनले.
 हे पाप एकमेव नव्हते आणि नाही. राजू याने कंपनीच्या जमाखर्चात फसवले. अशी फसवणूक दोन पद्धतीने होते. एक म्हणजे नफा अधिक दाखवायचा किंवा खर्च कमी दाखवायचा. आपल्याकडची सरकारनामक यंत्रणादेखील हेच तर करीत असते. वर्षअखेरच्या ताळेबंदात राजू यांच्याकडून कंपनीचे उत्पन्न आणि खर्च यांत मोठी तफावत झाली. सरकारकडून वर्षांनुवष्रे हेच होत असते. सरकारी परिभाषेत यास वित्तीय तूट असे म्हणतात. या दोघांतील फरक इतकाच की सरकारला ही तूट भरून काढण्यासाठी उपलब्ध असलेला पर्याय अन्य कोणालाही नसतो. तो म्हणजे नोटा छापणे. तेव्हा ती सोय राजू यांना असती तर सत्यम संकटात सापडली नसती. राजू आणि आपले अर्थमंत्री यांच्यातील टप्प्यात अनेक जणांकडून ही लबाडी सातत्याने होत असते.
आपली सामुदायिक आर्थिक समज एकंदरच यथातथा असल्याने अनेक सत्यम खपून जातात आणि आपण सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याचा उद्घोष करणे अशा वेळी भाबडेपणाचे ठरते.