संस्कृतींचा इतिहास ज्यांच्या काठाकाठाने साकारला, त्या नद्यांचे आपल्या महाराष्ट्रातील आजचे रूप दीनवाणे, केविलवाणेच आहे.. नाशिकची ‘गंगा’ असो की पंढरपूरची चंद्रभागा, किंवा अन्य शहरांतील करंगळीएवढी धार असलेल्या नद्या.. या नद्यांचे एकेकाळचे रूप आज इतिहासजमा होते आहे. नद्यांमुळे महाराष्ट्राची संस्कृती आजही टिकून आहे.. ती टिकवायची तर नद्याही जपायला हव्यात..
समाजमाध्यमांमुळे समाजात सजगता आली आहे, याबद्दल आता दुमत राहिलेले नाही. भवतालाच्या परिस्थितीची नेमकी जाणीव करून देण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. कोणत्या वेळी कोठे काय घडते आहे, त्याच्या प्रतिक्रिया कोठे कशा उमटत आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार आपण कोणता निर्णय घ्यावा हे ठरविण्यासाठी आज हे माध्यम महत्त्वाची भूमिका बजावते आहे. म्हणूनच, ‘काढा गाडी आणि निघा नाशिकला’ असा अन्यथा केला जाणारा विचार करण्याचे धाडस सद्य:स्थितीत मात्र कुणीही करणार नाही. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे महत्त्वाचे शहर असल्याने उत्तरेकडे येजा करताना या शहरात एखादी तरी चक्कर मारून मंदिरांना भेट देण्याचा, त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याचा, गोदाघाटावर विसावण्याचा, जमलेच तर जवळच्या वायनरीलाही फेरफटका मारण्याचा आणि गावाबाहेर पडताना नाशिकची खासियत असलेली चटकदार मिसळ अनुभवण्याचा मोह झाला नाही, असा माणूस भेटणार नाही. पण आजकाल नाशिकचा एवढा ऐषारामी दौरा करण्याची परिस्थिती नाही, हे भान समाजमाध्यमामुळे महाराष्ट्रात तरी रुजले आहे. या दिवसांत नाशिकला कुणा नातेवाईकाकडे जायचे असेल, तर मनाजोगता पाहुणचार झाला नाही म्हणून नाराज न होण्याची मानसिक तयारी असली पाहिजे. गावाबाहेर कुठे तरी वाहन उभे करून शहरात पोहोचण्यासाठी चार-पाच मलांची पायपीट करण्याची तयारी दाखविली पाहिजे आणि गोदाघाटाकडे किंवा त्र्यंबकेश्वराकडे फिरकायचेदेखील नाही, असे अगोदरच स्वतला बजावलेले असले पाहिजे. कारण नाशिक क्षेत्री कुंभमेळा सुरू झाला आहे. नाशिकचे तुमच्याआमच्या मनातले रूपडे काही दिवसांकरिता तरी, बदलून गेले आहे. गोदाघाटावरच्या निवांत क्षणांना आता तेवढी फुरसतदेखील राहिलेली नाही. तिथला एक एक क्षण घाईघाईने पुढे सरकून जणू आला दिवस केव्हा एकदा मावळतो, याची वाट पाहत आहे आणि कधीकाळीची ती गोदामाई, भाविकांच्या पापाच्या आभासी कल्पना आणि भौतिकाचा सारा वास्तव मळ अंगावर वागवत संथपणे वाहतेच आहे..
भक्तीच्या भल्याबुऱ्या भावनांमध्ये बुडून जाऊन वर्षांनुवष्रे अंगाखांद्यावर वागविलेल्या जटाभस्मांची साफसफाई सध्या याच प्रवाहात सुरू आहे. कळत नकळत घडलेली पापे धुऊन टाकण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या शरीरांवर साचलेला मळ आणि त्यासोबत त्वचेवर साचलेली संसर्गाची संपुटेदेखील याच पात्रात धुऊन काढली जात आहेत आणि अगोदरच प्रदूषणाच्या विळख्याने मरणासन्न झालेल्या आणि शुद्धीकरणाच्या तहानेने आसुसलेल्या गोदामातेच्या प्रदूषणाचा विळखा अधिकच आवळला जाणार आहे. पुण्य पदरात पडावे यासाठी पात्रात पापे धुण्याची मुभा देणाऱ्या पवित्र गोदेच्या नशिबी मात्र, तिच्याच कुठल्या तरी जन्माचे पाप फेडण्याची वेळ येऊ घातली आहे. कुंभमेळ्याची सांगता झाल्यानंतर गोदेचे पाणी पिण्यायोग्य तर नसेलच, पण स्नानायोग्यदेखील नसेल, हे १०० टक्के वास्तव आहे. जलपुरुष म्हणून ख्याती असलेल्या राजेंद्र सिंह यांनी गोदामाईच्या प्रदूषणाबाबत अनेकदा तीव्र चिंता व्यक्त केली होती. ज्या पात्रातले पाणी कधीकाळी तीर्थ मानले जायचे, त्याच पात्राला आता गटाराचे रूप आले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हान राजेंद्र सिंह यांनी दिले, तेव्हा नाशिककरच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राच्या अंगावर सरसरून शहारा आल्याशिवाय राहिला नसेल. ती परिस्थिती बदलली तर नाहीच, उलट अधिकच भीषणपणे अधोरेखित होऊ लागली आहे. त्यात आता कुंभाची भर पडणार आहे. महाराष्ट्राची गंगा असलेली गोदामाई आता नदी राहिलेली नाही, अगोदरच ती नाला झाली आहे. आता तर ती आणखीनच केविलवाणी होणार आहे.
केवळ गोदावरीच नव्हे, महाराष्ट्रातील ९० टक्के नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे, अशी कबुली मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे दिली होती. कधी एके काळी, या राज्यातदेखील प्रत्येक नदी ही जीवनवाहिनी होती. तिच्या आधाराने संस्कृती फुलायची, जीवनशैली विकसित व्हायची. कारण नदी हा त्यासाठीच निसर्गाने निर्माण केलेला जीवनस्रोत होता. कालांतराने विकासाच्या व्याख्याच बदलत गेल्या आणि नदी हे विकासाच्या प्रक्रियेतून शिल्लक राहिलेले, नको असलेले घटक वाहून नेण्याचे नसíगक साधन ठरले. सांडपाणी, मलापाणी, रासायनिक पाणी वाहून नेणारी नसíगक रचना अशा नजरेने नद्यांकडे पाहिले जाऊ लागले. नदी आणि माणूस यांच्यातले ते एके काळचे हळवे नाते अलीकडच्या या बदलत्या प्रवाहात वाहून गेले आहे. अनेक मनांशी नदीचे एक अतूट नाते जडलेले असायचे. आता इतिहासच बदलला. नद्याच इतिहासात जमा होऊ लागल्या. काही वर्षांनंतर जेव्हा पुढची पिढी ‘नदी म्हणजे काय’ असा प्रश्न विचारेल, तेव्हा आठवणीतल्या वर्णनावरूनच नदीचे शब्दचित्र रेखाटण्याची वेळ येईल. पण असे फार तर आणखी दोन-तीन पिढय़ा चालेल. पुढे नदी हा शब्ददेखील नामशेष झालेला असेल. विकासाच्या वाढत्या वेगात झंझावातासारखे झेपावताना, आपण सहजपणे इतिहास बदलून नवा इतिहास घडवू शकतो असा दर्प माणसाच्या मनात रुजू लागला असेल, तर ते साहजिकच आहे. पण अशा नव्या इतिहासाचे भविष्य मात्र अल्पजीवी असणार नाही, याची काळजी वेळीच घेतली पाहिजे, आणि त्या मस्तीत भूगोलही बदलणार नाही, याचेही भान राखले गेले पाहिजे.
नाशिकच्या कुंभमेळ्याला धार्मिक भावनांची किनार आहे. त्याला आता राजकीय महत्त्वदेखील प्राप्त झाले आहे. तिकडे पंढरपुरातील वारीलादेखील अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. कारण ही वारी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा वारसा पुढे नेत असते. वर्षांनुवष्रे पंढरीच्या पायाशी वाहणाऱ्या आणि संतसज्जनांच्या मेळ्याची शतकानुशतकांची साक्षीदार ठरलेल्या चंद्रभागेलाही आता गोदामाईसारखाच प्रदूषणाचा विळखा बसलाय. या नदीच्या काठाशी दर वर्षी अध्यात्ममार्गाचे मळे फुलतात. अध्यात्म म्हणजे निसर्गाशी जवळीक असे महाराष्ट्राची संतपरंपरा सांगते. पण आजचा परंपरावादही निसर्गाशी फारकत घेत आहे. भक्तांसाठी काया शिणविणारा विठ्ठल याच नदीकाठीच्या विटेवर युगे अठ्ठावीस उभा आहे. त्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत. माणसाचे एक बरे आहे. त्याला दरुगधी असह्य़ झाली, तर नाक तरी दाबून घेता येईल. विकासाच्या गंगेत वाहवत जाताना जीवनवाहिनी नद्यांना गटारगंगा बनविणाऱ्या माणसाच्या बेमुर्वतपणामुळे उद्या ही चंद्रभागा आणखीनच प्रदूषित होईल, तेव्हा तिच्याकाठी ‘कटेवरी ठेवूनि कर’ उभा असलेल्या त्या विठुमाऊलीला कमरेवरचे हात काढून नाक दाबून घ्यायची वेळ येणार नाही, याची काळजी तरी भाविकांनी घेतलीच पाहिजे. ती घेतली नाही, म्हणून न्यायालयाला आदेश देण्याची वेळ यंदा आलीच.
नदी हे जिवंतपणाचे मूर्तिमंत रूप असते. नदीच्या खळाळत्या प्रवाहात चतन्याची प्रेरणा असते. पण केवळ भौतिक विकासाच्या आक्रमणात भरडणाऱ्या नद्यांचा जिवंतपणा तर हरवत चालला आहे. शिवाय समजुतींच्या प्रभावामुळेही नद्यांचे प्रवाह मरणाशी नाते जोडताना दिसू लागले आहेत. काठावरचे मृतांचे क्रियाविधी नद्यांच्या जिवंतपणावर झाकोळ आणताना दिसतात. अशा वेळी, अगोदरच मरणभयाच्या सावटाखाली जिवंत राहण्याची कशी तरी धडपड करणारी ती पात्रातील करंगळीएवढी धार कधी कधी अधिकच केविलवाणी दिसू लागते. अशा अवस्थेत पुढे वाहणाऱ्या नद्या जगण्याची, चतन्याची प्रेरणा देऊ शकत नाहीत, हे ओळखून तरी या नद्या जपल्या पाहिजेत. एक एक नदी आजच जपली नाही, तर मुंबई-कल्याणच्या मिठी-वालधुनी नद्यांनी २६ जुलै २००५ रोजी जे तांडव केले होते, त्याची आठवणही व्यर्थ ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2015 रोजी प्रकाशित
एक एक नदी जपा..
संस्कृतींचा इतिहास ज्यांच्या काठाकाठाने साकारला, त्या नद्यांचे आपल्या महाराष्ट्रातील आजचे रूप दीनवाणे, केविलवाणेच आहे..

First published on: 25-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save maharashtra rivers