अनासक्ताचं माउलींनी केलेलं वर्णन आपण वाचत आहोत. आतापर्यंत पाहिलेल्या ओव्यांचा मथितार्थ असा की, दुसऱ्याकडे पाहुणा म्हणून गेलो तर त्यांच्या घराविषयी आपल्याला जितपत आस्था असेल तितपतच आस्था स्वत:च्या देहाविषयी या अनासक्ताला असते. म्हणजेच देहाविषयी ममत्वच न उरल्यानं देहगत ओढींचीच त्याला पर्वा नसते. वाटेनं जाताना झाडाची सावली लागली तरी त्या सावलीसाठी काही कोणी चालणं थांबवत नाही. त्याचप्रमाणे अनासक्ताचं मन भौतिकात अडकून पडत नाही. चालताना सावली बरोबरच असते, पण तिची जशी जाणीव नसते, तसं अनासक्ताचं मन जीवनातील जोडीदारामध्ये गुंतून मानसिक, भावनिक गुलामीत अडकत नाही. वस्तीला आलेल्या वाटसरूंबाबत गृहस्थ जसा कर्तव्यापुरता व्यवहार करतो तसा हा अनासक्त पुरुष मुलाबाळांबाबतची कर्तव्यं पार पाडतो, पण अपेक्षांनी त्यांच्यात गुंतत नाही. सावलीत बसलेल्या गुराढोरांबाबत झाड जसं उदासीन असतं, तसा हा अनासक्त पुरुष नात्यागोत्यातील लोकांना आधाराची सावली देतो, पण त्यांच्यात गुंतत नाही! आता पुढील ओवीत माउली सांगतात, ‘‘जो संपत्तीमाजी असतां। ऐसा गमे पांडुसुता। जैसा का वाटे जातां। साक्षी ठेविला।।’’ हे अर्जुना असा हा अनासक्त पुरुष सर्व भौतिक पसाऱ्यात असतो खरा, पण कसा दिसतो? जसं वाटेनं जाताना आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. मोठमोठय़ा इमारती दिसतात, बंगले दिसतात, उद्यानं दिसतात पण तरी त्याकडे पाहताना ‘आपलेपणा’चा भावच नसल्यानं जशी आपली नजर अलिप्त असते. किंवा कुणी एकमेकांशी बोलत आहेत, कुणी भांडत आहेत, पण त्यापैकी कुणाशीही ‘आपलेपणा’चा संबंधच नसल्यानं त्यांच्याकडे जसं आपण त्रयस्थ दृष्टीनं पाहात आपली वाटचाल सुरूच ठेवतो, तसा हा अनासक्त भौतिकाच्या पसाऱ्यात वावरतो. हा पसारा तो पाहतो, पण त्यात आपलेपणानं अडकत नाही. एका साधूनं खरं वैराग्य शिकण्यासाठी आपल्या शिष्याला राजा जनकाकडे पाठविलं. राजाचं वैभव वरवर पाहूनही तो मनातून खरं तर विटलाच होता. राजाबद्दल त्याच्या मनात घृणेचीच भावना होती. हा राजा माझ्यासारख्या तपश्चर्यारत संन्याशाला काय विरक्ती शिकवणार, हा भाव त्याच्या मनात होता. राजा म्हणाला, ‘‘शिष्योत्तमा तू प्रथम माझा राजवाडा पाहून ये. एक मात्र लक्षात ठेव. तुला बरोबर ही पणती न्यावी लागेल. ती विझू द्यायची नाही. ती विझली तर तुझा शिरच्छेद केला जाईल. जा खुशाल सारा राजवाडा हिंडून ये.’’ राजानं काही सैनिक बरोबर पाठविले. त्यांच्याबरोबर शिष्य गेला खरा पण मनातून तो घाबरला होता. राजाज्ञेनुसार बऱ्याच वेळानं  संपूर्ण राजवाडा पालथा घालून तो परतला. राजानं हसून विचारलं, ‘‘कसा वाटला राजवाडा? कसं वाटलं माझं ऐश्वर्य?’’ शिष्य म्हणाला, ‘‘मी त्यातलं काहीच पाहिलं नाही. माझं सारं लक्ष या पणतीकडेच होतं. ती विझू नये, याकडेच माझं सर्व लक्ष होतं.’’ राजा हसून म्हणाला, ‘‘या वैभवात राहाताना माझंही सारं लक्ष अंतरंगातील आत्मज्योतीकडेच असतं. ती विझू नये, इकडेच माझं सर्व ध्यान असतं!’’ अनासक्त तसाच असतो.