त्याच त्याच बाबींसाठी शक्ती खर्ची घालणाऱ्या सुरक्षा दलांकडे मुकेशभाईंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेऊन सरकारने अतुलनीय धैर्याची परमावधी साधली आहे. सरकारने येथेच न थांबता अन्यही अशा ‘लाखांच्या पोशिंद्यां’च्या जिवाची काळजी घ्यावी अशी आमची नम्र सूचना आहे. तुम्हाआम्हा सामान्यजनांच्या सुरक्षेचा विचार करण्याच्या भानगडीत सरकारने पडण्यात काही हशील नाही हेच खरे !..
सर्वप्रथम आम्ही भारत सरकारचे, आणि त्यातही गृहमंत्री सदासुहासित सुशीलकुमार शिंदे यांचे, अभिनंदन करू इच्छितो. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या एकंदरच मचमचीत सरकारात अभिनंदन करावे असे काहीही घडत नव्हते. अखेर ही अभिनंदनाची संधी तमाम भारतवासीयांस मिळाली. भारतातील अग्रक्रमाचे उद्योगपती, आमच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे तारणहार जे की मुकेशभाई धीरूभाई अंबानी यांना रात्रंदिवस खडय़ा पहाऱ्याची सरकारी सुरक्षा सेवा पुरविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल हे सरकार अभिनंदनास पात्र आहे. अशा निर्णयास धैर्य लागते. ते दाखवल्याबद्दल हे सरकार कौतुकास पात्र आहे. धैर्य अशासाठी की देशाची राजधानी नवी दिल्लीत भरदिवसा स्त्रियांची,  मुलींची अब्रू हवी तेव्हा लुटली जात असताना, पोलीसवाले महिलांवर हात टाकण्यात शौर्य मानत असताना आणि सरकार ते कौतुकाने पाहत असताना, पलीकडच्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर सोकावलेल्या दहशतवाद्यांना हा देश म्हणजे दरवाजा नसलेली धर्मशाळा वाटू लागलेला असताना, देशातील दीडशेहून अधिक जिल्ह्य़ांत नक्षलवादी थैमान घालीत असताना, ताण आलेल्या सुरक्षा दलांकडे मुकेशभाईंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय अतुलनीय धैर्य असल्याखेरीज कोणालाही घेता येणे शक्य नाही. असे धैर्यशील सत्ताधीश आपल्या देशात आहेत हे आपले भाग्यच म्हणावयास हवे. याबद्दल समस्त जनतेने सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील सिद्धेश्वरास रुद्राभिषेक आयोजित करून गृहमंत्र्यास पाद्यपूजेचा मान द्यावा. काँग्रेसी नेत्यांना जन्मत:च कोणाच्या ना कोणाच्या पाद्यपूजेची सवय असते. हा सेक्युलर अनुभव शिंदे यांच्याही कामी नक्की येईल. असो. पाद्यपूजाकौशल्य हा प्रस्तुत मजकुराचा विषय नाही. तर मुकेशभाई यांना देण्यात आलेल्या अतिउच्च सुरक्षा सेवेबद्दल सरकारचे अभिनंदन करणे हा आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच.
ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.. अशा उदात्त अर्थाचा अत्यंत व्यावहारिक वाक्प्रचार या समृद्ध मराठी भाषेने आपणास दिलेला आहे. मुकेशभाई यांना संपूर्ण सुरक्षा देण्याच्या निर्णयामुळे आम्हास त्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही. ज्याच्या दरबारात सरकारातील लहानथोरांस हात बांधून उभे राहावे लागते किंबहुना हेच काय कोणतेही सरकार ही ज्यांची इच्छा असते त्या कर्त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारने घेणे म्हणजे कर्तव्यपालन करणे होय. मुकेशभाईंना पूर्ण सुरक्षा पुरवून मनमोहन सिंग यांचे सरकार या कर्तव्यास जागले असेच आमचे मत आहे. एरवी सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे विद्यमान भावी पंतप्रधान (विद्यमान अशासाठी की भाजप या राष्ट्रीय पक्षात एक कायमस्वरूपी आगामी पंतप्रधान आहेत. ते वेगळे.) नरेंद्रभाई मोदी यांच्यात तसे काहीही साम्य नाही. परंतु मुकेशभाई यांच्याविषयी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जो अत्यंत पुरागोमी निर्णय घेतला त्याचे महत्त्व जाणण्याची कुवत सांप्रत काळी अन्य कोणांत असो वा नसो, नरेंद्रभाई यांच्यात ती जरूर आहे, याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय पातळीवर जे केले ते गुजरातच्या पातळीवर नरेंद्रभाई यांनी याआधीच करून टाकले आहे. त्यातही मोदी यांचे मोठेपण असे की त्यांनी फक्त मुकेशभाई यांच्यापुरताच असा निर्णय घेतला नसून गौतमभाई (अदानी) वगैरे अन्य भाईंनाही असेच महत्त्व दिले आहे. मोठा नेता द्रष्टा असतो तो असा. याचा अर्थ याहीबाबत भाजपचे नरेंद्रभाई हे काँग्रेसच्या भाई सुशीलकुमार यांच्यापेक्षा सरस ठरले. खरे तर नरेंद्रभाई यांनी सुशीलकुमार यांच्या निर्णयाचे जाहीर कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सर्वपक्षीय ठराव आणावा, अशी आमची सूचना आहे. या ठरावास काँग्रेसचे अहमद पटेल, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असे अनेक राष्ट्रीय नेते, मुकेशभाईंना सुरक्षा देण्याच्या निर्णयाचे महत्त्व पटलेले असल्याने, पाठिंबा देतील, याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. मुकेशभाईंचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता या ठरावास विरोध करण्याचा करंटेपणा कोणीही करण्याची शक्यता नाही. अंबानी यांच्या छत्राखाली अनेक राजकीय पक्ष आणि नेते असल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होईल.
तेव्हा अनेक अर्थानी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कवतिक करावयास हवे. भारतीय संस्कृतीत लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोिशदा वाचवण्यास अतोनात महत्त्व आहे. मनमोहन सिंग सरकारने मुकेशभाईंना राष्ट्रीय सुरक्षा पुरवून या उदात्त संस्कृतीचेच तंतोतंत पालन केले आहे. तंतोतंत अशासाठी म्हणावयाचे की वेगवेगळय़ा कारणांनी शब्दश: लाखो प्राणास मुकत असताना लाखोंचा पोशिंदा असलेल्या मुकेशभाईंना संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आता मुकेशभाई यांच्यापुढे आणि मागे सरकारी कमांडो असणार आहेत. इतके दिवस त्यांच्यामागे वेगवेगळे राजकारणी, सरकारी अधिकारी वगैरे गोंडा घोळत हिंडत अशी टीका होत असे. आता या राजकारण्यांची जागा सुरक्षा रक्षक घेतील. हेच सुरक्षा रक्षक राजकारण्यांच्या आगेमागेही असतात. तेच आता मुकेशभाई यांच्याही आगेमागे असतील. अशा तऱ्हेने या सुरक्षा रक्षकांचे मीलन होऊन परिणामी राजकारणी आणि मुकेशभाई यांच्यात नसलेली दरी यामुळे भरून येण्यास मदत होईल. त्यामुळे दोघांचाही बहुमूल्य वेळ वाचेल. अर्थात व्यवसायातून निर्माण झालेल्या दोषांमुळे आम्हास काही बाबतीत शंका निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ मुकेशभाई मुंबईतल्या मुंबईत स्वत:च्या उडन खटोल्यातून (पक्षी हेलिकॉप्टरातून, पाहा लालूप्रसाद यांचे वाग्विलास) हिंडतात. अशा वेळी सरकारी सुरक्षा रक्षक मुकेशभाई हवेत असताना खाली जमिनीवरून त्यांच्यामागे सावलीसारखे जाणार काय, ही शंका त्यापैकीच एक. मुकेशभाईंच्या मालकीचे स्वत:चे असे विमानदेखील आहे. त्यातूनही ते उडत जातात. तेव्हा हे रक्षक काय करणार? या विमानाच्या जकातीसंबंधी काही किरकोळ समस्या निर्माण झाली होती. तसे काही पुन्हा झाल्यास हे सुरक्षा रक्षक सरकारच्या बाजूने उभे राहणार की मुकेशभाईंच्या? मुकेशभाईंच्या मालकीच्या अनेक गोष्टी आहेत. जसे की क्रिकेट संघ. त्या संघासदेखील ही सुरक्षा व्यवस्था दिली जाणार काय? तसे झाल्यास हा संघ पराभवाच्या छायेत गेल्यास सरकारी सुरक्षा रक्षक त्याचे रक्षण करणार काय? या आणि अन्य प्रश्नांचा विचार, मामला मुकेशभाईंचा असल्याने, सरकारने केला असणारच. एरवी सरकारला विचार करण्यास सवड नसते, याचीही आम्हास जाणीव आहे.
वस्तुत: इतके सर्व करण्यापेक्षा सरकारने दोन-चार गोष्टी केल्यास अनेक प्रश्न आपोआप निकालात लागू शकतात. पहिले म्हणजे सरकारने मुकेशभाईंना मंत्रिपदाचा दर्जाच बहाल करावा. नाहीतरी देशासाठी इतकी संपत्ती ते निर्माण करीत असल्याने मंत्रिपदाचा दर्जा देणे अधिक उचित होईल. तसे केल्याने त्यांना थेट मंत्रिमंडळाच्या बैठकांनाच हजर राहता येईल आणि त्यामुळे काही मंत्री आदींना बैठकीचे इतिवृत मुकेशभाईंपर्यंत पोहोचविण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, ते वाचतील. याच्या जोडीला मुकेशभाईंच्या मुंबईतील वा अन्य ठिकाणच्या घरांना राष्ट्रीय दर्जा द्यावा. त्यामुळे त्या सर्वास आपोआप सुरक्षा मिळू शकेल. मुकेशभाई ज्या विमानातून उडतात त्याचे नामकरण भारताचे एअरफोर्स-वन असे केल्यास हवेतील सुरक्षेचा प्रश्नही निकालात निघेल.
याच्या जोडीला आमची सूचना ही की मुकेशभाईंच्या बरोबरीने संपत्तीनिर्मितीच्या राष्ट्रीय कार्यास ज्यांनी ज्यांनी वाहून घेतलेले आहे त्या सर्वानाच सुरक्षा द्यावी. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याही जिवास धोका आहे. उदाहरणार्थ, कर्ज देणाऱ्या बँका, पगार न मिळालेले कर्मचारी यांच्यापासून विजय मल्या यांच्या जिवास धोका असल्याने त्यांच्यासाठीही सरकारने सुरक्षा द्यावी. शिवाय, मल्या ज्या पेयाची निर्मिती करतात ते पेय राष्ट्रीय चेतनाजागृतीसाठी आवश्यक असल्याने त्या अर्थानेही मल्या यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. सेबी वगैरे क्षुद्र सरकारी यंत्रणांकडून धोका असल्याने सुब्रतो रॉय सहारा यांनाही सरकारने सुरक्षा पुरवावी. दूरसंचार घोटाळय़ात अनेक उद्योगपतींची नावे आहेत. त्यांनाही तितकीच सुरक्षेची गरज आहे. त्यामुळे सीआयआय किंवा फिक्कीसारख्या संघटनेचे सदस्य झाल्यास आपोआप सुरक्षा मिळेल अशीच व्यवस्था सरकारने करून टाकावी. नपेक्षा सरकारवर पक्षपाताचा आरोप होईल.
यातून काही सुरक्षा रक्षक शिल्लक राहिलेच तर सगळय़ात शेवटी तुमच्याआमच्या सुरक्षेचा विचार सरकारने करावा. पण नकोच. कारण आपल्याला सुरक्षा दिली तर बाँबस्फोट, दहशतवाद्यांचे, नक्षलवाद्यांचे हल्ले, बलात्कारी नराधमांचे इरादे  वाया जातील आणि ते काही योग्य म्हणता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security of v v i p
First published on: 23-04-2013 at 01:01 IST