स्थूल शरीर हे फक्त एकाच जागृतावस्थेत आमच्या उपयोगी पडते, म्हणून आम्ही त्या शरीराचे पोषण, मुंडण व अलंकरण करण्याकरिता झटत असतो. पण मन हे स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये फिरत असून जागृति व स्वप्न या दोन्ही अवस्थांतही हजर असते. तर अशा रीतीने सर्व अवस्थांमध्ये आपल्याला कधी सोडून न राहणाऱ्या मनाचे पोषण, मुंडण व अलंकरण याकडे आमचे लक्ष जात नाही, हा केवढा अविचार! मनाची खरी योग्यता, कर्तबगारी, महत्त्वही आम्ही नीट पहात नाही म्हणून इहपर आमची दुर्दशा होत आहे. मन हे या जन्मीचा आपला सोबती व गडी आहे. इतकेच नव्हे तर ते जन्मोजन्मी आपल्या हिताकडे लागले तर आपला सांगाती, सेवक किंवा मित्र होते. परंतु तेच अहिताकडे लागले तर आपला शत्रु होत असते. म्हणून मनास शत्रु किंवा मित्र करून ठेवणे आपले काम आहे. शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. कारण मनाला सोडून शरीर निरुपयोगी होते. मन आहे तर शरीरास भोग व क्रिया साधतात. मन नाही तर शरीर मृतप्राय असते. तर अशा उत्तम साधनभूत मनाकडे दुर्लक्ष करून फक्त शरीर तेवढे पोसून मिरविणे म्हणजे अपाय करून घेणे आहे. म्हणून मनाला रोज पुष्ट व निरोगी करणारे चांगले अन्न खायला द्यावे- म्हणजे संतबोध भरवावा. मन सुंदर सुशोभित होईल असे वरचेवर त्याचे मुंडण करावे म्हणजे बाधक भेद-कल्पनारूपी केश तोडून अगर उपटून टाकावेत आणि मनास दृढता व बल येईल अशी मनन व एकवाक्यताकरणरूपी तालीम करावी.
मन माझे ताब्यात नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मन माझे म्हणता तर ते स्वाधीन असलेच पाहिजे. जर माझे नव्हे तर ते माझे तंत्रास असणार नाही, हे उघडच आहे. मन कसेही असो. सूक्ष्म विचार राहू द्या, साधारण दृष्टीने पाहिले तरी ‘माझे मन’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मनापेक्षा ‘मी’ कोणीतरी मोठा असा मनाला धरून आहे, असे झाले. असे आहे तर या मनाचा आणि माझा संबंध कसा असेल? मन असता मी असतो, झोपेत मनाची जाणीव नसताही मी असतो, यावरून मनापेक्षा मी अधिक कायमचा झालो. मन हा एक मीपणातील तरंग असून तो उठतो, खेळतो व पुन्हा माझ्यातच लपतो. सूक्ष्म विचार करता असे दिसते की, मन हे माझ्या म्हणजे मीपणाच्या एका कोपऱ्यास राईएवढे कोठे वावरत असते त्याचा पत्तादेखील नाही. मन हे माझा सेवक, माझा चाकर आहे. मी जे इच्छितो ते मन घेते. अशा या बापडय़ा दीन चाकराच्या भिकेच्या आड तरी आपण का यावे? मन पाहिजे तेथे भटकेना! ते कोठे आणि किती भटकेल? जाईना का ते पाहिजे त्या मार्गाने! आपल्या आवडीची गोष्ट मनाने धरली तर बरेच झाले. तशी  न धरता जर ते आवडीविरुद्ध जात असेल तर जाईना का! आपण त्याची संगत सोडली म्हणजे आपोआप लत्ता खाऊन ते परत फिरते व सन्मार्गास वळते. आपल्याशिवाय मनाला गतीच नाही.
(बेळगावजवळ समाधिस्थ झालेल्या या संताचे विचार ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ या पुस्तकातून संकलित. चैतन्य चिंतन सदराचा पुढील भाग सोमवारी.)

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका