कीटकनाशके, रासायनिक खते ही जमिनीच्या उत्पादकतेला घातक ठरत आहेत. मानवी आरोग्यावरही या रसायनांचा परिणाम दिसून येतो. सेंद्रिय शेती हा यावर उपाय असला, तरी शेतकरी त्याकडे का वळत नाहीत, याची कारणेही समजून घेतली पाहिजेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषिप्रधान असलेल्या भारतात हरितक्रांतीनंतर, आज शेतीसमोरील एक आव्हान म्हणून पुढे आलेले आहे ते म्हणजे क्षारपड जमीन तसेच शेतीवर होत असलेली रासायनिक खते व कीटकनाशकांचा भरमसाट वापर. एकीकडे पिकाला भाव मिळत नाही, म्हणून भारतीय शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे शेतात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बागायती जमिनी खारवटून नापीक झालेल्या आहेत. तशातच अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी संकरित वाणांचा वापर वाढला. या वाणामध्ये रोगप्रतिकारक्षमता अतिशय कमी आहे. त्याचा परिणाम म्हणून कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर वारेमाप वाढला आणि या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मानवी आरोग्यावरदेखील गंभीर परिणाम झाला असल्याचे आपल्याला दिसून येते. कर्करोगासारखे रोगदेखील यामुळे अनेकांना जडले आहेत. त्यामुळे रायायनिक खतांवर कुठे तरी आवर घालून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सेंद्रिय खतांचीदेखील वानवाच आहे, त्यामुळे त्याचे दरदेखील जास्त आहेत. जनावरांची घटलेली संख्या हे त्यामागील एक प्रमुख कारण. जनावरे गोठय़ात कमी आणि कत्तलखान्यात जास्त असेच चित्र दिसते.

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की, त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतांसह कीटकनाशक आणि बुरशीनाशकांमधील  रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे व भाज्या खाण्यालायक राहत नाहीत. त्यामुळेच भारतातून युरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतुनाशके न मारता निव्वळ सेंद्रिय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि याउपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश डाळींमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो परत पाठवला जातो. ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंश उतरलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तापर्यंत पोहोचत असतात. रक्तघटक आणि रक्तातल्या पेशींवरदेखील याचा परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगासारखे आजारदेखील बळावतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सधन आणि भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या तालुक्यात भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. तसेच उत्पादित झालेला भाजीपाला देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात पाठविला जातो. अलीकडच्या काळात भाजीपाल्याचे दर मोठय़ा प्रमाणात कोसळले गेले आहेत. त्यामुळे भाजीपालाही खाण्यात मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. तेथे जवळपास २५ हजार रुग्ण हे कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.

लहरी हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. यासाठी कीटकनाशकांचा वापर सर्रास सुरू असतो. विशेषत फळे, भाज्या, डाळी यांवरही कीटकनाशकांचा सर्रास वापर केला जातो. त्यामधील अंश अन्नावाटे आपल्या शरीरात जातात. बदलती जीवनशैली आणि राहणीमान याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे आणि ९५ टक्के जमीन बागायती असल्यामुळे सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या बायका तिथे फारशा आढळतच नाहीत. मग ही कसर भरून काढण्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते. या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणाऱ्यांच्या रक्तातसुद्धा ते उतरतात. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये या तणनाशकाचे अंश सापडले आहेत. आपण आपले रक्त या दृष्टीने तपासत नाही म्हणून ठीक. परंतु जर  आपण तसे ते तपासायला लागलो तर त्या तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक ठरणार आहेत.

रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकांचे परिणाम एवढे गंभीर असतील तर आपण त्याच खतांचा आणि जंतुनाशकांचा वापर करतो, पण शेतकऱ्यांचाही नाइलाज आहे. त्याला तो शेतकरी काय करणार? तणनाशक, बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर केल्याशिवाय उत्पन्न वाढत नाही. आणि त्याशिवाय शेती परवडत नाही.  ज्या लोकांना या परिणामांची जाणीव झाली आहे ते लोक मात्र सावध झाले आहेत आणि शक्यतो सेंद्रिय शेतीत तयार झालेला माल वापरला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. सेंद्रिय माल थोडा महाग मिळाला तरी हरकत नाही, परंतु तोच खाल्ला पाहिजे, अशी मागणी करणारे लोक आता दिसू लागले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतील मालाला यापुढच्या काळात चांगली मागणी राहणार आहे.

शेतीचा सेंद्रिय कर्ब १ ते २ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र त्यामध्ये प्रचंड घसरण झाली असून हा कर्ब केवळ ०.३ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने उपयोगी जिवाणू नष्ट होत आहेत. (उदा. गांडूळ, नत्राचे प्रमाण) यामुळे ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे. जैविक आणि भौतिक सुपीकता कमी होत आहे. पर्यायाने मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.  युरिया, सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट यांसारखी ‘एकेरी खते’ (पिकांना फक्त एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी खते) डायअमोनियम फॉस्फेट, नायट्रो फॉस्फेटसारखी संयुक्त खते (पिकांना दोन किंवा अधिक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारी खते) आणि दोन किंवा अधिक खतांचे मिश्रण असणारी ‘मिश्र खते’ (उदा. सुफला, संपूर्णा, उज्ज्वला, सम्राट,) या सर्व प्रकारच्या खतांमधील काही अंशदेखील उत्पादित झालेल्या मालामध्ये उतरत असतो. त्याचाही परिणाम आरोग्यावर होतो.

मुळात शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. शेतकरी शेतीमधून बाहेर पडत चाललेला आहे. आधुनिक व प्रगत  शेती करावी अशी शेतकऱ्यांची परिस्थिती नाही, अथवा सगळी कामे मजुराकरवी करून घ्यावीत अशी आíथक क्षमतादेखील त्याची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल रासायनिक खते व कीटकनाशकांकडे जातो. यात शेतकऱ्यांचा काय दोष? शेतकऱ्यांना आíथकदृष्टय़ा सक्षम केल्याशिवाय शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळेल, असे चित्र सध्या तरी नाही. एकीकडे देशात फळांवर तसेच भाजीपाल्यावर किती प्रमाणात कीटकनाशके वापरावीत याला कोणत्याही मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत, अथवा त्यांची तपासणीदेखील केली जात नाही. दुसरीकडे युरोपीय देशांत कीटकनाशक तसेच रासायनिक खतांचे प्रमाण किती असावे यावर मोठी बंधने घालण्यात आलेली आहेत. आंबे, केळी, आदी फळांवर रासायनिक प्रक्रिया करून पिकवली जातात. कच्ची फळे आणून त्यावर प्रक्रिया करून त्वरित माल बाजारात पाठवला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात तर दलालांची साखळीच निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांकडून आंबे स्वस्तात विकत घेऊन त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ती फळे पिकवली जातात. आणि तीच घातक फळे ग्राहकांच्या माथी व्यापारी  मारतात. फळावरील फवारण्यात आलेली कीटकनाशके, तसेच रसायने ही ग्राहकांच्या पोटातच जातात. त्यामुळे पोटाचे विकार जडतात. तोंडाचे कॅन्सर, आतडय़ाचे कॅन्सर, तसेच अन्ननलिकांचे कॅन्सर मोठय़ा प्रमाणात मानवी शरीरात आढळून आले आहेत. सेंद्रिय फळे, तसेच भाजीपाला थोडा महाग असला तरी शक्यतो तीच खाणे आता गरजेचे आहे.

देश अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. किंबहुना शेतीचा खरा आधार असलेल्या जमिनीकडे दुर्लक्ष होत गेले आणि हळूहळू तिचे आरोग्य खालावत गेले. जास्तीतजास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष झाले हे सत्य आता नाकारता येणार नाही. कारण एकापाठोपाठ एकसारखे एकच पीक घेण्याची पद्धत, खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव इत्यादींमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत गेली. याचा गंभीर परिणाम आज दृश्यरूपात पिकांच्या कमी झालेल्या उत्पादकतेत दिसत आहे. भविष्यातील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अन्नद्रव्यांची मागणी वाढतच जाणार असून त्यासाठी पीक उत्पादकतेत वाढ करावीच लागणार आहे. या पीक उत्पादकतेत खात्रीलायकपणा राखण्यासाठी रासायनिक खतांचा भविष्यातील शेतीतील वापर अनिवार्य आहेच. रायायनिक खते वापरणे बंद करा असे कुणीही म्हणणार नाही. मात्र त्यावर र्निबध आणून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविणे हीच काळाची गरज आहे. संतुलित प्रमाणात खतांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून शेती उत्पादनात शाश्वतता आणता येऊन जमिनीचे आरोग्यदेखील सुस्थितीत ठेवता येईल, अन्यथा जमिनीच्या आरोग्याबरोबर मानवी आरोग्याचीदेखील हेळसांड होईल, ती परिस्थिती मग आपल्या हाताबाहेर जाईल.

लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com

मराठीतील सर्व शेती..गती आणि मती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti special article about agriculture
First published on: 30-08-2017 at 01:44 IST