येनकेनप्रकारेण सनसनाटी निर्माण करावयाची आणि चर्चेत राहावयाचे ही आजकाल फॅशनच झाली आहे, असे शिवसेना या महाराष्ट्रवादी पक्ष-संघटनेचे ‘मुखपत्र’कार म्हणतात. शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखनातून अशीच सनसनाटी सध्या तमाम माध्यम क्षेत्रात माजली आहे. बलात्काराचा आरोप असलेले सनदी पोलीस अधिकारी सुनील पारसकर यांच्या बचावार्थ सरसावून उतरलेल्या संपादकीय लेखात सामनाकारांनी हा सनसनाटीचा विचार मांडला आहे. बलात्कार, विनयभंगासारखे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे ही आजकाल हायफाय सोसायटीतील फॅशनच झाली असावी, अशी शंका या संपादकीय लेखातून व्यक्त झाल्याने माध्यमांमध्ये या शंकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याला भेडसावणारे असंख्य प्रश्न आसपास आ वासून उभे असताना, त्या प्रश्नांना प्राधान्याने वाचा फुटावी आणि जगणे सोपे व्हावे अशी माध्यमांकडून जनतेची अपेक्षा असते. जेव्हा एखाद्या वृत्तपत्राला एखाद्या राजकीय पक्षाची सावली असते, तेव्हा त्या वृत्तपत्राकडून ही अपेक्षा अधिकच प्रखर असते. असे असताना, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरील बलात्काराच्या आरोपांची तातडीने दखल घेऊन त्याची पाठराखण करण्यामागील हेतू अनाकलनीय आहे. सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र आहे, ही गोष्ट अमान्य करता येणार नाही. एखाद्या प्रसार माध्यमातून मांडल्या गेलेल्या एखाद्या वादग्रस्त विचाराचे समाजात काहूर उमटते आणि त्यावर सार्वत्रिक चर्चा, खल होऊन त्या विचाराच्या बऱ्यावाईट मुद्दय़ांचा वैचारिक समाचारही घेतला जातो. सामनामधील विचाराकडे तेवढय़ा मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. कारण ते केवळ वृत्तपत्र नाही. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे या मुखपत्राचे संपादक आहेत. त्यामुळे या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखांमधील मताकडे पक्षाची वैचारिक, राजकीय भूमिका म्हणून पाहिले जाते. म्हणून त्याला महत्त्व मिळते. सनदी पोलीस अधिकारी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेल तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने, पोलीस वर्तुळात कमालीची खळबळ माजली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने, खरे काय ते स्पष्ट होणारच आहे. जेव्हा अशी चौकशी सुरू असते, तेव्हा ती पूर्ण होण्याआधीच कुणाला तरी निर्दोष ठरवून कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणजे, न्यायाधीशाची भूमिका बजावण्यासारखे असते. सनसनाटी निर्माण करण्याच्या हव्यासापोटी हायफाय सोसायटीकडून असे चारित्र्यहनन करणारे आरोप केले जातात, असे मत मांडत या लेखाने हायफाय वर्गाच्या संस्कृतीवरच संशयाचे बोट ठेवले आहे. कायदा सर्वस्वी महिलांच्या बाजूने असल्याचा दावा करून, पारसकरांना न्याय मिळण्याबद्दलची पुसटशी शंकाही या लेखातून डोकावते. या प्रकरणात पारसकर ही नाण्याची दुसरी बाजू आहे, आणि ती तपासली गेली पाहिजे असेही शिवसेनेला वाटते. या प्रकरणाला धर्म, जात, पंथाचा रंग लावण्याची शिवसेनेची इच्छा नाही, हे एक बरे आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहताना समाजातील एखाद्या वर्गाच्या संस्कृतीवर टीकेची बोटे ठेवून सनसनाटी निर्माण करणेही बरे नाही. राजकारणात आणि सरकारात काटे काढण्यासाठी चारित्र्यहननाची हत्यारे वापरली जातात व त्या हत्यारांना वर्तुळातील स्वजन आणि विरोधकांकडूनच धार लावली जाते, ही सारी मते पक्षाच्या मुखपत्रातील संपादकीय लेखातून व्यक्त झाल्याने, ती शिवसेनेची वैचारिक भूमिका असल्याचा सामान्यांचा समज होऊ शकतो. असे झाले, तर कायदा, उच्चभ्रू समाजवर्ग आणि राजकारणाविषयीही सामान्य माणसाच्या मनात धसका निर्माण होईल असेच हे चित्र आहे.