ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे अकाली जाणे तसे अनपेक्षित नसले तरीही त्यांच्या सुहृदांना आणि चाहत्यांना चटका लावून जाणारे आहे यात शंका नाही. त्यांची जिद्दी आणि विजिगिषु वृत्ती काळाच्या कराल हातांशीही शेवटपर्यंत झुंजत राहिली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही काळ बऱ्या होऊन पुन्हा त्या नव्या जोमानं कलाक्षेत्रात सक्रीय झाल्या होत्या. अगदी कालपरवापर्यंत त्या सार्वजनिक कार्यक्रमांतूनही सहभागी होत होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाची आलेली अकस्मात वार्ता धक्कादायी वाटणे स्वाभाविकच.
दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका ते नाटक, चित्रपट आणि चित्रमालिकांतील अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका हा त्यांचा प्रवास कुणालाही थक्क करणारा असाच आहे. रंगभूमीवर त्यांनी मोजकीच नाटके केली असली तरी त्यांतल्या भूमिकांत वैविध्य होते. ऐतिहासिक ते सामाजिक नाटकांपर्यंत सगळ्या प्रकारची नाटके त्यांनी केली. ऐन पस्तिशीत पुरुषी वर्चस्व असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत त्या निर्मात्या म्हणून दाखल झाल्या आणि ‘कळत-नकळत’ या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांनी आपली नाममुद्रा उमटविली. दिग्दर्शक संजय सूरकर यांच्याशी त्यांचे कलात्मक सूर जुळले आणि त्यातून ‘चौकट राजा’, ‘तू तिथे मी’, ‘सातच्या आत घरात’ आणि ‘आनंदाचे झाड’ अशा सामाजिक विषयांवरील उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. कुटुंबसंस्था, संस्कार आणि सामाजिक दायित्व मानणाऱ्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कलाकृतींतून या विषयांवर वेळोवेळी भाष्य केले. कथाकार शं. ना. नवरे यांच्या प्रसन्न, आल्हाददायी, संस्कारक्षम कथांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातूनच ‘सातच्या आत घरात’, ‘आनंदाचे झाड’सारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. आदर्श मानवी मूल्यांची पाठराखण करणे हा त्या आपला धर्म मानत. त्यांच्या कलाकृतींतून तर हे दिसतेच; परंतु चर्चा-परिसंवादांतील त्यांच्या सहभागातूनही त्यांनी याचा हिरीरीने पाठपुरावा केला. अन्यायाविरुद्ध त्या पेटून उठत. त्यामुळेच नाटय़-चित्रपटांशी संबंधित प्रत्येक लढय़ात त्या नेहमीच अग्रस्थानी असत. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या व्यवहारांतील पारदर्शकता हरवल्याचे ध्यानी आल्यावर त्यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनवायला कमी केले नाही. दूरचित्रवाहिन्यांचे युग अवतरल्यावर त्या तिथेही सम्राज्ञीसारख्याच वावरल्या. ‘ऊन-पाऊस’, ‘अवंतिका’, ‘उंच माझा झोका’ आदी पंचवीसेक मालिकांची निर्मिती त्यांनी केली. अस्मिता चित्र अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून अनेक कलाकार घडविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. कलाक्षेत्रात चौफेर कर्तृत्व गाजवणारी ही स्त्री झाशीच्या राणीसारखी शेवटपर्यंत लढत राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita talwalkar
First published on: 07-08-2014 at 01:44 IST