भारतात खरे तर क्रीडा संस्कृती नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही, तर क्रीडा विद्यापीठे कुठून येणार? किती पदक विजेत्या खेळाडूंना उत्तेजक द्रव्य कशामध्ये असते, याचा अंदाजही नसावा. ते याबाबतीत दूधखुळे नसले तरी अज्ञानी मात्र नक्कीच आहेत. याचा फायदाच काही वेळा टाळूवरचे लोणी खाणारे प्रशिक्षक घेतात.

हारजीत विसरून खेळ चांगला होतो आहे असे दिसले की आजही प्रेक्षकांची पसंती मिळतेच. खेळाडू जणू मानवी मर्यादांच्या, लोभ-मद-मत्सर-दंभादी षड्रिपूंच्या पलीकडे पोहोचले आहेत, हे पाहणे मनोज्ञ असते आणि रंजकही. पण हे दृश्य आज कमीच दिसते. याचे कारण खेळ मनोरंजनासाठीच खेळला जाण्याचे दिवस संपले आणि चढाओढ आणि अव्वल येण्याची चुरस वाढली. त्यासाठी काहीही करण्याची तयारी झाली आणि खेळाचा आत्मा हरवला. काहीही करून अव्वल यायचे, म्हणून खेळाशी, निष्ठेशी, चाहत्यांशी आणि स्वत:शीही प्रतारणा करण्यासाठी खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत. दुसरीकडे खेळाच्या माध्यमातून सोन्याची खाण कशी खणता येईल, यासाठी संघटकही बाह्य़ा सरसावून सज्ज झालेले दिसतात. खेळाच्या नावाने आज षड्रिपूंचाच थयथयाट सुरू असलेला दिसतो. भारतात लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमध्ये आयपीएलमधल्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचा ज्वालामुखी आजही धुमसतोच आहे. तर जगात, ‘ब्यूटिफुल गेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय संघटनेतले- फिफामधले घोटाळे गाजत आहेत. या मालिकेत अ‍ॅथलेटिक्समधील गैरप्रकारांचीही आता भर पडली आहे.. जगभरातील ५,००० अ‍ॅथलीट्सच्या १२,००० रक्तचाचण्यांमध्ये अ‍ॅथलीट्स उत्तेजकांचा सर्रास वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले, हे दर्दी क्रीडारसिकांची अस्वस्थता वाढवणारेच आहे. कोणताही खेळ आजघडीला ‘खेळ’ राहूच शकत नाही का, हा या अस्वस्थतेमागील महत्त्वाचा प्रश्न. केवळ एकामागोमाग आदळणाऱ्या बातम्यांमुळे असे अस्वस्थ होण्यापेक्षा, या बातम्यांच्या मागे काय सुरू आहे, हेही पाहणे आवश्यक आहेच.
ब्रिटन आणि जर्मनीच्या प्रसारमाध्यमांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अ‍ॅथलेटिक्समधील धक्कादायक गैरप्रकार उघड झाले. क्रीडाविश्व हादरले. पण हे फक्त खेळामधील अनैतिक प्रकार रोखण्यासाठीच केले गेले का, असा प्रश्नही पडायला हवा. कारण या डोपिंग किंवा कथित उत्तेजक द्रव्य-सेवन प्रकरणाचे जे तपशील आजवर उघड झाले, त्यांकडे नीट पाहिले असता सूडभावनेची दरुगधीही अनेकांना जाणवते आहे. रशियाचे सर्वाधिक खेळाडू असल्याचा दावा या बातम्यांनी केला आहे, त्यामुळे त्यांच्या पदकांवर कशी गदा आणून युरोपने रशियावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे काय, ही शंका येण्यासाठी तज्ज्ञ असण्याची गरज नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे, येत्या १९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची होणारी निवडणूक. प्रतिस्पध्र्याची बदनामी म्हणजे आपल्याला नीतिमत्तेचे प्रमाणपत्रच, असे मानण्याची वाईट चाल राजकारणात आहे, हे भारतीयांनाच काय- ब्रिटिशांना किंवा अमेरिकनांनाही मुद्दाम सांगायला नको. निवडणूक जवळ आल्यावर नकोशी प्रकरणे बाहेर काढायची, त्यांचे चर्वितचर्वणही करायचे, आरोप फुगवायचे आणि केवढा हा नैतिक अध:पात अशी हाकाटी पिटायची, हे प्रकार जगातील सर्वच देशांतील अंतर्गत राजकारणात होत आहेत. माध्यमे आणि राजकीय दावेदार यांच्यातील अंतर कमी झाल्याची ही कटू फळे. त्यामुळेच हा सारा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रसारमाध्यमांचा प्रकार असल्याचे खुद्द आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक संघटनेनेच म्हटले आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारे लोकही आहेत. मात्र ही संघटना सोवळी आहे असेही नव्हे. ठोस आश्वासन त्यांच्याकडूनही मिळत नाही आणि ते मिळालेच तर बऱ्याच संघटकांना आश्वासन बासनात बांधण्याची कला अवगत असतेच. निवडणुकीसाठी उत्सुक असलेल्या एका उमेदवाराच्या मते हे ‘खेळाविरुद्ध पुकारलेले युद्ध’ आहे. पण अशी युद्धे यापूर्वीही बऱ्याचदा घडली, तेव्हा संघटनेने काय केले? उत्तेजकांची कीड मुळापासून उपटण्यासाठी पावले कोणती उचलणार? यावर बोलण्यास सध्या कुणीच तयार नाही. पूर्वी खेळाडूंची फक्त मूत्रचाचणी व्हायची, आता रक्ताचे नमुने तपासले जातात. स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर ‘वाडा’सारखी संघटना खेळाडूंच्या चाचण्या करीत असते. यामधून बरेच खेळाडू दोषीही ठरवले गेले, पण नवीन तंत्रज्ञान ‘वाडा’कडेही विकसित झालेले नाही. चीन सध्याची ऑलिम्पिकमधली महासत्ता, त्यांच्याकडून पदकांची लयलूट होते. पण एकही अ‍ॅथलीट दोषी आढळत नाही, यामध्ये या विकसित तंत्रज्ञानाचा तर हात नाही ना, हा दाट संशय येतो.
ही झाली अ‍ॅथलेटिक्सबाबत येणाऱ्या बातम्यांची एक बाजू. अन्य बाजू अद्याप या संदर्भात प्रकाशात आलेल्या नसल्या, तरी त्यांचे अस्तित्व नाकारता येणार नाही. अशी अद्याप अदृश्य राहिलेली दुसरी बाजू आहे, ती उत्तेजक सेवनासाठी भरीस पाडले जाण्याची. गुणवत्तेपेक्षा तुम्ही जास्त काहीही कमावू शकत नाही. पण काहीही करून पदके कमावण्यासाठी उत्तेजकांची दीक्षा प्रशिक्षकांकडूनच काही वेळा दिली जाते. काही प्रशिक्षक असे की, ते व्यापारी म्हणून दलालीच का करीत नाहीत असा प्रश्न पडावा. खेळाडू मोठा झाला की त्याच्या मिळकतीमधून कमिशन घ्यायचे, मी अमुक खेळाडूला पदक मिळवून दिले म्हणत अकादमी सुरू करायची आणि खोऱ्याने पैसा ओढण्याचा धंदा हे वणिकवृत्तीचे प्रशिक्षक आजही करतातच. तेव्हा प्रशिक्षक म्हणजे गुरू वगैरे म्हणण्याचे दिवस संपले आहेत. याहीपुढे, तुम्ही कोणते उत्तेजक कधी, कसे घ्यायचे आणि काहीही करून न पकडले जाण्याची हमी देणाऱ्या अनेक कंपन्यांचे जाळे. तंत्रज्ञान विकासाचा फायदा जसा पोलिसांपेक्षा चोरांना अधिक होत असल्याचे दिसून येते तसेच येथेही. कधीही अशा कंपन्यांचे एजंट पकडले गेल्याचे वृत्त ऐकिवात नाही. खेळाडूंच्या खेळाची राखरांगोळी करणारा भोंदू प्रशिक्षकही हात वर करण्यात पहिला असतो. बंदीसारख्या शिक्षेचा आणि नामुष्कीचा फटका बसतो, तो खेळाडूलाच. प्रशिक्षक मात्र नवे खेळाडू बनवण्याची फॅक्टरी सुरूच ठेवू शकतात. त्यातच खेळाडूंचीही लबाडी किंवा अळीमिळी गुपचिळी, ही तिसरी बाजू. बेन जॉन्सन असो किंवा लान्स आर्मस्ट्राँग. हे दोघेही आपापल्या खेळावर राज्य करणारे, पण अव्वल राहण्याच्या लालसेपोटी उत्तेजकांचे बळी. ताज्या उत्तेजक सेवन प्रकरणात भारतातील पाच टक्के अ‍ॅथलीट असल्याचे बोलले जाते. भारतात खरे तर क्रीडा संस्कृती नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही, तर क्रीडा विद्यापीठे कुठून येणार? किती पदक विजेत्या खेळाडूंना उत्तेजक द्रव्य कशामध्ये असते, याचा अंदाजही नसावा. ते याबाबतीत दूधखुळे नसले तरी अज्ञानी मात्र नक्कीच आहेत. साधे सर्दी, पडसे झाल्यावर आपण कोणते औषध घ्यावे किंवा घेऊ नये, याबाबत ते बऱ्याचदा अनभिज्ञच असतात. त्यामुळे बऱ्याचदा ते पकडले जातात. मुळात भारतात उत्तेजक द्रव्यविरोधाबाबत जनजागृती नाही, त्याबाबतचे शिक्षण तर नाहीच नाही. याचा फायदाच काही वेळा टाळूवरचे लोणी खाणारे प्रशिक्षक घेतात. खेळाचा बाजार मांडण्यात मात्र आपण कमी नाही. आयपीएलचे प्रकरण ताजे आहेच. परंतु आयपीएल किंवा फिफा संघटनेतील घोटाळे हे मूलत: आयोजकांशी संबंधित आहेत आणि संघटित स्वरूपाचे आहेत. त्या मानाने अ‍ॅथलेटिक्समध्ये असा सांघिक खेळखंडोबा होण्याचा संभव कमी मानावा, तर तेही नाही. उलट, एकेरी खेळ असल्यामुळेच स्पर्धेपूर्वी उत्तेजक घेणे सोपे. ताज्या बातम्या खऱ्या ठरल्या, तर १४६ पदकांचा निकाल लागू शकतो, त्यामध्ये ५५ सुवर्णपदकेही आहेत, हे चित्र अ‍ॅथलेटिक्ससाठी विदारकच.
एवढय़ा मोठय़ा संख्येने जर खेळाडू उत्तेजकांचे सेवन करीत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा? आपण मूर्ख बनायचे की अज्ञानामध्ये सुख असते म्हणत, हे सारे समजूनही खेळावर निस्सीम श्रद्धा ठेवत खेळाडूंना देव्हाऱ्यात बसवायचे? उत्तेजके खेळाडूंना पदके आणि पैसा देतात. ती झिंग आपल्यालाही पुरेशी वाटू लागली, तर आपणही उत्तेजकांचेच सेवक ठरतो.

loksatta@expressindia.com