scorecardresearch

गीत उमलले नवे…

उत्तम कवितेला स्वरांचे अस्तर असते. कवीच्याही नकळत ते अस्तर संगीतकाराला खुणावत असते.

श्रीनिवास खळे

|| मुकुंद संगोराम

मराठी भावगीतांचा बहर १९३५ पासूनचा! नागर संवेदनेतून आलेली ही ‘शब्दप्रधान गायकी’ची स्वरवेल आधी ध्वनिमुद्रिकांच्या, मग चित्रपटांच्या आधाराने वाढली खरी; पण ही नवी गीते, तेच सूर छेडत राहिली का?

कवितेचे स्वरात गायन करण्याची परंपरा महाराष्ट्रात रविकिरण मंडळाने निर्माण केली. या मंडळातील कवींनी गावोगावी जाऊन कविता वाचनाचे कार्यक्रम केले आणि मराठी कविता सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. भावगीताच्या जन्माला या मंडळाने लोकप्रिय केलेल्या काव्यगायनाची पार्श्वभूमी होती. १९२० च्या सुमारास सुरू झालेल्या या कविमंडळाने त्यानंतरच्या १५ वर्षांत कवितेचे अनेक कार्यक्रम केले. हे मंडळ अस्तंगत झाले त्याच वर्षी, म्हणजे १९३५ मध्ये पहिले भावगीत ध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. उत्तम कविता आणि त्याला सहजसुंदर स्वरांची संगत हे त्याचे रूप. त्यात शब्द आणि स्वर यांचा एक समन्यायी संगम. त्यामुळे कविता चालीसकट लक्षात राहते, हे त्याचे वेगळेपण. मराठी चित्रपट बोलू लागल्यानंतर त्यामध्ये गीतांचा समावेश होणे क्रमप्राप्त होते. त्या चित्रपट गीतांवरही मराठी भावगीतांच्या परंपरेचा इतका परिणाम झालेला दिसतो की, अनेक चित्रपट गीते स्वतंत्रपणे भावगीत म्हणूनही रसिकांच्या लक्षात राहिली. तेव्हाच्या पंतकाव्याच्या पलीकडे जात इंग्रजीतील सुनीत किंवा फारसीमधील गज़्ल यांसारख्या काव्यप्रकारांना या कवींनी जवळ केले होते. मराठीत गज़्ल आणणारे माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलिअन, यशवंत पेंढरकर (कवी यशवंत), ग. त्र्यं माडखोलकर, शंकरराव कानेटकर (कवी गिरीश), वि. द. घाटे यांसारख्या कवींनी समाजात या नव्या तरल जाणिवांना कवितेतून वाट करून दिली. भावगीतांमध्येही याच मृदू, तरल, हुरहुर लावणाऱ्या भावना व्यक्त होत राहिल्या. नंतरच्या काळात कवितेच्या आणि भावगीतांच्या प्रांतात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या कवयित्री शान्ता शेळके यांनी रविकिरण मंडळाबद्दल लिहिले आहे की, ‘या मंडळींभोवती सोनेरी गुलाबी धूसर वलय असल्यासारखे वाटे.’ ही कवितेतली नागर संवेदनाच जी. एन. जोशींच्या अनेक गीतांत दिसते. एका अर्थाने समाजातील उच्चवर्णीय समाजातील नवकल्पना आणि संवेदना यांना वाट करून देणाऱ्या या भावगीतांनी प्रेमातील अवखळपणा, धिटाई आणि अल्लडपणा, वात्सल्य, भक्ती यांनाच जवळ केले. या गीतांचा जो रसिकवर्ग तयार होत होता, त्याच्या भावनिक गरजा या गीतांनी बरोबर हेरल्या.

अगदी जी. एन. जोशींनीच गायलेले ‘चल रानात सजणा, आंबेवनात जाऊ  दूर, राया गुपित आपुलं फुटलं, जग भोतीचं बोलत सुटलं’ हे भावगीत त्या काळातील मध्यमवर्गाच्या ओठांवर होते. त्यांची अशी अनेक भावगीते रसिकांना मोहिनी घालणारी ठरली आणि त्यामुळे ही परंपरा पुढे नेण्याची ऊर्मी नव्या गायक कलावंतांना मिळाली. गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, गोविंद कुरवाळीकर यांच्यासारख्या नव्या दमाच्या गायकांनी ही परंपरा अधिक संपन्न केली. ‘प्रेमस्वरूप आई’ यासारख्या काही कविता वगळता, बहुतांश ‘रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते’ हीच भावना भावगीतांनी जपून ठेवली. तिचे नवनवे आविष्कार केले आणि मराठी माणसाच्या अंतर्मनात अढळ जागा मिळवली. तरीही हे गीत समाजाच्या सर्वच स्तरांत पोहोचले नाही, हे मात्र खरे. याचे कारण कवितेवर असीम प्रेम असण्यासाठीची सांस्कृतिक साक्षरता तोपर्यंत सर्वदूर रुजलेली नव्हती. ज्या पहिल्या भावगीताला ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने लोकांपर्यंत पोहोचवले, त्याकडे वाटवे यांच्यासारख्या प्रसिद्धीच्या वलयातील कलावंताने मात्र फारसे लक्ष दिले नाही. एका मुलाखतीत त्यांनीच सांगितले, की ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या, तर माझ्या प्रत्यक्ष कार्यक्रमांना होणारी प्रचंड गर्दी कशी होईल, याची मला मनोमन भीती वाटत असे. तरीही त्यांच्या ज्या काही ध्वनिमुद्रिका आहेत, त्यातील त्यांच्या शांत, शीतल आणि सहजसुभग गायनाने प्रत्येकालाच त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटल्या.

उत्तम कवितेला स्वरांचे अस्तर असते. कवीच्याही नकळत ते अस्तर संगीतकाराला खुणावत असते. उत्तम संगीतकार ते हेरतो आणि त्या कवितेला स्वरांच्या कोंदणात बसवतो. कवीलाही आश्चर्य वाटावे, अशी ती एक नवीच कलाकृती तयार होते. त्यासाठी अर्थातच संगीतकाराला साहित्याचे, कवितेचे भान असणे आवश्यक. भावगीतांच्या या सुरेल साखळीत सुधीर फडके यांच्यासारख्या कलावंताने जे चांदणे निर्माण केले, त्याने अवघे मराठीजन या शब्दप्रधान गायकीच्या (संगीतकार यशवंत देव यांचे शब्द) आकंठ प्रेमात बुडून गेले. यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू असे या घराण्याचे पाईक निर्माण झाले. श्रीनिवास खळे यांच्यासारख्या प्रतिभावंताने त्यात मोलाची भर घातली आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी या भावगीताला आणखी उंचीवर नेऊन ठेवले. या परंपरेत श्रीधर फडके, आनंद मोडक, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार यांच्यासारख्या नंतरच्या पिढीतील संगीतकारांनी नव्या संवेदनांच्या कविता शोधून त्यासाठी स्वररचना बांधण्याचे आव्हान स्वीकारले. ना. घ. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, वा. रा. कांत, राजा बढे, सुरेश भट, आरती प्रभू, ग्रेस, सुधीर मोघे अशा साहित्याच्या प्रांतात लौकिक मिळवलेल्या कवींमुळे भावगीताचे स्वरविश्व समृद्ध होत राहिले. या परंपरेनेच त्या काळातील मराठी चित्रपटांच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला. एका बाजूला राम कदम यांच्यासारख्या कसदार संगीतकाराचा लावणीचा बाज आणि दुसऱ्या बाजूला सुधीर फडके यांची भावगीतसदृश चित्रपट गीते. या दोन्ही कलाप्रकारांनी त्या काळातील मध्यमवर्गाचा सांस्कृतिक अवकाश भारून गेला होता. गंमत अशी की, त्याच काळात याच महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या हिंदी चित्रपटांतील संगीतात अनेक प्रज्ञावंत नवनवे प्रयोग करत होते. अनेक वाद्यांच्या समूहातून (ऑर्केस्ट्रेशन) एक ‘नवनाद’ निर्माण करत होते. त्याचा कोणताही परिणाम मराठी भावगीताच्या परंपरेवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. अनेकविध वाद्ये वापरून भावगीतातील मधल्या जागा अधिक समृद्ध करत जाण्याची गरज तेव्हा कुणालाच कशी वाटली नाही? अगदी आवश्यक तेवढ्याच वाद्यमेळात कवितेची भावना पोहोचवण्याची धडपड मराठीजनांच्या ‘गरिबी’त तर नसेल? एकाच ठिकाणी हिंदी आणि मराठी अशा दोन परंपरा आपापले मूळ पुन्हा पुन्हा तपासून पाहत होत्या आणि त्यातून एक नवाच सिद्धान्त मांडत होत्या.

स्वर अमूर्त असतात हे खरेच. त्यांची स्वतंत्र भाषा असते आणि ती समजण्यासाठी स्वतंत्रपणे काही करावे लागत नाही हेही तेवढेच खरे. परंतु तरीही त्या स्वरांना मातीचा म्हणून एक सुगंध असतो. मराठी भावगीतांमध्ये हा मराठी मातीचा सुगंध पुरेपूर भरून राहिला आहे. अनेक स्वरवाक्ये (फ्रेजेस) केवळ या मातीतूनच येतात आणि त्यामुळेच त्यांचे वेगळेपणही सिद्ध होते. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. अगदी सर्वांच्या मुखी असलेल्या सुधीर फडके यांच्या ‘नाचनाचुनि अति मी दमले, थकले रे नंदलाला’मधील ‘ला’नंतरची स्वरांची लड ही अस्सल मराठीच असते. ‘आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’, ‘तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ  दे रे’, ‘धुंद येथ मी स्वैर झोकितो’ अशी कितीतरी गीते त्यातील शब्दांच्या आणि स्वररचनेच्या सहजसोपेपणामुळे प्रत्येकाच्या ओठी आली. श्रीनिवास खळे यांच्यासारख्याने स्वररचनेत नवी खुमारी आणली. ऐकायला अतिशय गोड, परंतु गायला तेवढीच अवघड वाटावी अशा कितीतरी गीतांचे दागिने त्यांनी घडवले. ‘जाहल्या काही चुका’, ‘नीज माझ्या नंदलाला’, ‘श्रावणांत घननीळा’, ‘बगळ्यांची माळ फुले’ अशी त्यांची गीते आठवली, तरी त्यातील स्वरांची देखणी गुंतागुंत आपल्याला एका नव्या भावविश्वात नेते. स्वर-शब्द आणि वाद्यमेळ या तिन्ही अंगाने भावगीताची वाट नव्याने खोदणारे हृदयनाथ मंगेशकर हे भावगीतातील एक अतिशय प्रतिभाशाली घराणे. त्यांनी परंपरेने आलेला भावगीताचा बाज बदलला आणि त्यात नवसर्जनाचे प्राण फुंकले. केवळ स्वररचनाच नव्हे, तर तिला सोबत करणारी वाद्यमेळाची करामत त्यांच्या कलाकृतीचे वेगळेपण सहजपणे नजरेत भरणारी ठरते. ‘चांदणे शिंपीत जाशी’पासून सुरू झालेला हा भावगीतांचा वाटावळणांचा मार्ग अधिक प्रशस्त करत मंगेशकरांनी भावगीताला अधिक संपन्न केले. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊ स निनादत होता’, ‘मी डोलकर’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ असे कितीतरी स्वरसंपन्न महाल त्यांनी उभे केले.

हीच परंपरा आजही त्याच जोमाने सुरू राहिली, याचे कारण येथील मातीत ती खोलवर रुजली, फुलली आणि लोकप्रिय झाली. परंतु हिंदी चित्रपट संगीताप्रमाणे नव्याने कात टाकून, चमकून टाकणारे प्रयोग करण्याची आवश्यकता मराठी भावगीतांना का बरे वाटत नसावी?

(अनेक संगीतकार, त्यांची अनेकानेक लोकप्रिय गीते यांचे उल्लेख केवळ जागेअभावी करता येणे शक्य झाले नाही, त्यांना अनुल्लेखाने टाळणे असा मुळीच हेतू नाही!)

mukund.sangoram@expressindia.com

 

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singing in the tone of a poem ravi kiran mandal in maharashtra poetry reading program marathi poetry akp

ताज्या बातम्या