scorecardresearch

प्रायोजिततेचे प्रयोग !

मैफिलीचे इव्हेंटीकरण व्हायला ऐंशीच्या दशकानंतर सुरुवात होऊ लागली आणि संगीताचा व्यवसाय झाला.

‘विकिपीडिया’वर ‘संगीत मैफलीचे छायाचित्र’ दिसते, ते हे असे!

मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

मैफिलींना प्रायोजक लाभून त्या दिमाखदार झाल्या.. आणि दिमाखाच्या कुंपणातच राहू लागल्या! संगीत खरे तर श्रुतिसंवेदनेलाच आवाहन करणारे, पण मंचसज्जेचा भपका मैफलींसाठी महत्त्वाची ठरू लागला. ऐंशीच्या दशकाअखेरीस याचे अप्रूप स्वाभाविक होते; पण नव्या कलाकारांचे काय?’ हा प्रश्न यातून येणारच होता..

ऐंशीच्या दशकानंतर अभिजात संगीत ही व्यावसायिक कला बनली. कलेला विक्रीमूल्य असते, याचे भान सर्वच पातळ्यांवर आल्यामुळे असेल; परंतु संगीत ही केवळ मनोरंजनाची बाब राहिली नाही. कलाकार म्हणून स्वतंत्र मुद्रा निर्माण करण्यासाठी संगीतबाह्य़ गोष्टींचा प्रादुर्भावही याच काळात सुरू झाला. कलावंतांना संगीताचा अपूर्व आनंद मिळवण्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लक्ष द्यावेसे वाटू लागल्याने, कलावंतांचे ब्रँड तयार होण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत कलावंत हा केवळ रसिकांपुरताच सीमित राहिला होता. त्याचे कलादर्शन एवढीच त्यांची अपेक्षा होती. उच्च दर्जाचे संगीत निर्माण करणे आणि ते ऐकायला मिळणे यासाठीची बहुतेकांची धडपड सुरू होती. रंगमंच सजावट, जाहिरात, बिदागी (मानधन), संगतकार, ध्वनियोजना यांसारख्या गोष्टींना महत्त्व येऊ लागले. ते योग्य असले, तरी त्याचे अवडंबर माजू लागले. परिणामी संगीताचा रसास्वाद केवळ कलात्मकतेच्या मोजपट्टीवर होण्यात अडथळे निर्माण होऊ लागले.

संगीत ही मानवी संस्कृतीच्या अभिजाततेची खरी खूण. शिल्पकला, वास्तुकला, चित्रकला, नाटय़कला यामध्ये केवळ डोळ्यांनी कला जाणून घेता येते. संगीत ही अशी कला की जेथे कानांद्वारेच सौंदर्याची पहिली जाणीव होते. त्यामुळे संगीत पाहण्याची गरज नसते. त्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी श्रवणेंद्रियांचाच उपयोग होतो. तरीही संगीताचे कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून ऐकताना, संगीताच्या निर्मिती प्रक्रियेत श्रोत्यांना सहभागी होता येते. त्यामुळे कलावंताला समोर श्रोते हवे असतात. ते त्याच्या प्रतिभेला साद घालतात. त्याच्या प्रतिसादातून कला सतत नवे उन्मेष धारण करते. हे सगळे, संगीत ‘फक्त ऐकायचेच’ असल्याने घडून येऊ शकले.

मैफिलीचे इव्हेंटीकरण व्हायला ऐंशीच्या दशकानंतर सुरुवात होऊ लागली आणि संगीताचा व्यवसाय झाला. याच दशकात चित्रपट संगीताने स्वतंत्रपणे आपला तोरा मिरवायला सुरुवात केली. याचे महत्त्वाचे कारण नभोवाणी या माध्यमात केवळ संगीतासाठीच्या स्वतंत्र वाहिनीचा झालेला बोलबाला. १९५७ पासून सुरू झालेली विविधभारती ही आकाशवाणीची व्यावसायिक वाहिनी ऐंशीच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. शिवाय, टेपरेकॉर्डर, ट्रान्झिस्टर यांसारखी केवळ संगीताचाच प्रसार करण्यास उपयुक्त ठरणारी उपकरणे सुलभपणे हाताशी आलेली होती. त्यामुळे संगीत ही सहजपणे आणि मोफत मिळू शकणारी कला झाली. त्याच सुमारास चित्रपट संगीताच्या ध्वनिमुद्रित कॅसेटची निर्मिती स्वस्तात सुरू झाली. तो व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढू लागला. २५-३० रुपयांत मिळणाऱ्या या फिल्मी गीतांच्या कॅसेटस् कुणालाही सहज उपलब्ध होऊ शकत होत्या. चित्रपट संगीताचा प्रभाव या माध्यमांमुळे वाढतच गेला. तरीही अभिजात संगीताचा माहौल तसाच टवटवीत राहिला होता. कलावंत आपल्या सर्जनाच्या साऱ्या शक्यता तपासून पाहात होते. संगीतातील कलावंतांना समाजात प्रतिष्ठा मिळू लागली होती. मानधनाच्या रकमांमध्येही वाढ होऊ लागल्याने चार पैसे हाती खेळू लागले होते. परंतु तोपर्यंत संगीत करण्याचा हेतू केवळ अमाप पैसे मिळण्याचा नव्हता. ऐकणाऱ्यांसाठीही संगीत ही चूष नव्हती. त्यांना संगीतातील कैवल्याच्या आनंदाची आस होती. असे श्रोते नवप्रतिभेच्या शोधात होते.

याच ऐंशीच्या दशकापर्यंत लोकप्रियता मिळवलेले सगळे कलावंत श्रोत्यांच्या गळ्यातील ताईत झालेले होते. ते कलावंतही सतत नवतेचा शोध घेत होते. कुमार गंधर्व माळव्याच्या लोकसंगीतातून सापडलेले हिरे-मोती दाखवत होते, तर भीमसेनजी महाराष्ट्रातल्या भक्तिसंगीताला अभिजाततेची शाल पांघरत होते. किशोरीताई संगीतातील भावतत्त्वाचा शोध घेत होत्या, तर मल्लिकार्जुन त्यांच्या संगीतातील परंपरेला नावीन्याचा साज चढवत होते. रविशंकरांची सतार जग गाजवत होती, तर अली अकबर यांचे सरोद त्यांच्या वादनातील घनगंभीरतेला जागतिकतेच्या अवकाशात विरघळू पाहात होते. चित्रपट संगीतातील लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोरकुमार यांच्यासारख्या कलावंतांनी या देशातील प्रत्येकाला सुरेलपणाचा लळा लावला होता. स्वरांचा नेमकेपणा, त्यातून व्यक्त होणाऱ्या भावभावनांचा तरल आविष्कार त्या संगीतातून प्रत्येकाच्या कानामनात पाझरत होता. शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, सलील चौधरी, मदनमोहन, नौशाद, सचिनदेव बर्मन, खय्याम, ओ. पी. नय्यर या पूर्वसुरींच्या खांद्यावर बसून दूरचे संगीत पाहू शकणारे लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राहुलदेव बर्मन, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी यांच्यासारखे अनेक जण संगीताला नवे दागिने चढवत होते. अशाच काळात शिवकुमार शर्मा यांच्यासारखा संतूरवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखा बासरीवादक, तबल्यातून गाऊ शकणारे झाकीर हुसेन, शुजात खाँ यांची गाणारी सतार, कलात्मकतेच्या कलाकुसरीने सतार छेडणारे शाहीद परवेझ यांचे अभिजात संगीतातील पदार्पण कितीतरी आश्वासक होते. त्यामुळेच संगीतात सातत्याने नवे काही घडत राहिले.

संगीतात प्रायोजकांचे आगमन झाले आणि मैफिलींचे स्वरूपही पालटू लागले. कारण केवळ तिकीट विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नात कार्यक्रमाचे आयोजन करणे जवळजवळ अशक्य होऊ लागले. मोठे कार्यक्रम प्रायोजकांशिवाय करता येणे कठीण होऊ लागले. खासगी मैफली जवळपास बंद झाल्या. गायक आणि वादकांसाठी हुकमी व्यासपीठ नाहीसे झाले. काही थोडय़ा संस्था स्वयंसेवी पद्धतीने नवोदित कलावंतांसाठी काम करीतही राहिल्या; मात्र तेवढय़ाने नवे कलावंत निर्माण होत नाहीत, असे लक्षात येऊ लागले. प्रसिद्धीच्या उंचीवर असलेल्याच कलावंतांच्या प्रचंड रकमेच्या बिदाग्या आणि कार्यक्रमाचा दिमाख यावरच खर्च होत असल्याने, केवळ गायनावर जगता येईल किंवा नाही, अशी शंका नव्याने संगीत करणाऱ्यांच्या मनात येणे स्वाभाविक. खासगी मैफिली ओसरून ज्या मोठय़ा संगीत समारोहांना प्राधान्य मिळू लागले, तेथे अभिजात संगीतातील विविध घराण्यांच्या गायकांचे संगीत ऐकण्याची सोय होती. त्यातील वैविध्य आकर्षक होते. त्यामुळे कलावंतांमध्ये रसिकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धाही होती. त्यामुळे खरेतर संगीताचाच फायदा होत होता.

जागतिकीकरणानंतरचा काळ संगीत कलेसाठी फार अवघड बनू लागला. संगीत हा कलावंत आणि रसिक यांच्यासाठी खुशीचा मामला राहिला नाही. मैफिलीत येणाऱ्या प्रत्येकाला आनंदासाठीच्या वेळेचे बंधन निर्माण झाले. जगणे असुरक्षित आणि कमालीचे गुंतागुंतीचे होऊ लागल्याने आनंद ‘विकत’ घेता येतो, याचे भान येऊ लागले. जीवनशैलीतील हे बदल संगीताच्या नवनिर्माणासाठी आव्हानात्मक होते. त्या काळातील सगळ्या दिग्गजांनी ते कमालीच्या ताकदीने पेलले म्हणूनच अभिजात संगीतातील नवसर्जनाचे वारे वाहतच राहिले. अभिजाततेला काळाच्या बरोबरीने वाहून नेण्याची क्षमता असणारे  कलावंत होते, म्हणूनच भारतीय अभिजात संगीताचा प्रवाह खळाळता राहिला. नंतरच्या काळात हे चित्र झपाटय़ाने बदलत गेले. संगीतासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करण्याची तयारी असणाऱ्या युवकांपुढे त्यामुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. संगीत हेच जीवन करायचे, तर त्याची शाश्वती हवी. ती नव्या परिस्थितीत मिळणे दुरापास्त होऊ लागली. तरीही अनेक युवकांनी संगीतातच येण्यासाठीची आपली धडपड थांबवली नाही. संगीत हे अर्धवेळाचे काम नाही, त्यामुळे झोकून देऊन आपल्या नशिबाच्या फाशांवर विसंबून राहण्याची तयारी असणारे, संख्येने कमी परंतु दुर्दम्य इच्छा असणारे युवक ही संगीताच्या भविष्याची मोठी गुंतवणूक. दूरचित्रवाणी माध्यमातून किंवा चित्रपटासारख्या माध्यमातून झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासाने पछाडलेल्यांना अभिजात संगीत म्हणजे दूरचे दिवे.

गेल्या दोन दशकांत या परिस्थितीत दिसणारा बदल अतिशय गंभीर म्हणावा असा आहे. नव्या कलावंताला त्याची मैफिल सादर करण्यासाठी निमंत्रण मिळण्याची शक्यता नाही आणि अशी मैफिल झालीच, तर श्रोते येतील किंवा नाही, याची काळजी. अशा युवकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था अथक प्रयत्न करीत आहेत, हे खरे. परंतु त्याने अद्याप संगीताच्या क्षितिजावर फार मोठी हालचाल होत असल्याचे दिसत तरी नाही. नव्याने आलेल्या समाजमाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संगीताला किती उपकारक ठरतो, याबाबत अद्याप संशयाचेच वातावरण आहे. मैफिलीत संगीताच्या निर्मितीचे साक्षीदार होणाऱ्यांना समाजमाध्यमातील संगीताचे कार्यक्रम फारसे आकर्षित करीत नाहीत. मात्र अनेक नव्या उपयोजनांमधून उत्तम दर्जाचे संगीत सहजपणे ऐकण्याची सुविधाही होऊ लागली आहे. आकाशवाणीवरून अभिजात संगीत हळूहळू हद्दपार होऊ लागले आहे. दूरचित्रवाणीने तर या संगीताला कधीच वाळीत टाकले आहे. तरीही अजून संगीताने आपली उमेद कायम ठेवली आहे. अभिजात संगीत आता, प्राण फुंकून ते टिकवून ठेवणाऱ्या प्रतिभेची वाट पाहात आहे.

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sponsors for music event music concert sponsorship classical music show zws

ताज्या बातम्या