scorecardresearch

नवनादापल्याडचा शोध…

पाश्चात्त्य संगीत परंपरेतील समूह संगीतात बँड या संकल्पनेला खूप प्राधान्य मिळते.

संगीताचे मोठे मंच नामवंतांनाच संधी देतात!

|| मुकुंद संगोराम

नादनिर्मिती हे संगीताचे कार्यच खरे; पण शांतता- अमूर्तता हे भारतीय संगीताचे अस्तित्वमूल्य. हे ज्यांना कळते आहे, त्यांची बूज समाज कशी राखणार?

गेल्या दोन दशकांत जगण्याच्या सगळ्याच क्षेत्रांत तंत्रज्ञानाची जी त्सुनामी आली, तिला तोंड देता देता अनेकांची दमछाक झाली आणि होते आहे. परंतु याच वीस वर्षांत जन्मलेल्यांना त्याचे काहीच गौडबंगाल वाटत नाही. कल्पनेच्याही पलीकडील नवनव्या तंत्रकल्पनांच्या अस्तित्वाने जगणे ढवळून जात असताना, त्याचा परिणाम कलांवर होणे अगदीच स्वाभाविक. विचारांमधील नवआधुनिकता केवळ तंत्राच्या आविष्काराने येत नाही. ती मूल्यांकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे, विचारांमुळे येते. परंपरांकडे पाहणाऱ्या नव्या विचारांमध्ये त्यातील काय उपयोगी आहे आणि काय फेकून देण्याच्या लायकीचे आहे, याचाच ऊहापोह होतो. त्यामुळे संपूर्णपणे नवेच काही निर्माण करून जुने ते सगळे फेकून देण्यासारखे काही घडत नाही. भारतीय अभिजात संगीतासमोर या नवआधुनिकतेने जे अनेक महाप्रश्न निर्माण केले, त्याची उत्तरे शोधण्यासाठी सगळे कलावंत अजूनही चाचपडत असल्याचेच दिसते. एका बाजूला संगीताच्या व्यापारीकरणाचा रेटा आणि दुसऱ्या बाजूला संगीतातील कैवल्याच्या आनंदाचा शोध अशा कात्रीत संगीत अडकायला लागले आहे. जागतिकीकरणानंतर संगीत ही नेमकेपणाने विक्रीयोग्य वस्तू झाली, त्याने त्याची एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होऊ लागली आणि त्याला नवतंत्रज्ञानाने भक्कम आधार दिला. शेकडो चित्रवाणी वाहिन्या, संगीत विकत मिळण्याची नवी स्थळे आणि समाजमाध्यमातील हजारो व्यासपीठे यामुळे संगीतात इतक्या वेगाने बदल होत गेले की, संगीताचा इतिहास वस्तुसंग्रहालयात जमा होण्याचेच बाकी राहिले. तरीही जिद्द संपली नाही. अशाही परिस्थितीत या नवक्रांतीशी लढाई करत आपल्या अंगच्या कलागुणांना परजत राहण्याची ऊर्मी टिकून राहते आहे, हाच काय तो आशेचा किरण. नवआधुनिकता केवळ तंत्राच्या बळावर उभी राहात नाही. तंत्र हे माध्यम असते. परंतु अनेकवेळा कला तंत्राच्या अधीन होते आणि तंत्रच मूळ कलेपेक्षा प्रभावी होते. आत्ता नेमके तेच होत असल्याचे दिसते.

जगण्याच्या तऱ्हा बदलत जातात, तशी जीवनमूल्येही बदलू लागतात. जिवंत राहण्याचे उपाय मनाला शांतता लाभू देत नाहीत. चैतन्याचा शोध मागे पडू लागतो आणि त्याचा परिणाम मूल्यव्यवस्थेवरही होतो. संगीत ही अशी कला की, तिने मन:पटलावर उमटणारे तरंग जिवंत राहण्यापेक्षा जगण्याची प्रेरणा देतात. पण या प्रेरणांकडे डोळसपणे पाहण्याची विचारशक्तीच जेव्हा हरवायला लागते, तेव्हा समूह म्हणून मानवासमोर प्रश्नांची रास उभी राहते. प्राधान्यक्रम बदलतात आणि कलांचा त्यातील क्रमांक खाली खाली जाऊ लागतो. परिणामी सर्वोत्तमाची आसही कमी होत जाते. जे सगळ्यांना आवडते, तेच उत्तम असले पाहिजे, या कल्पनेला बळ मिळते आणि कमअस्सलच ‘अस्सल’ म्हणून मिरवू लागते. हाच तो खरा आनंद असला पाहिजे, असे वाटू लागते. जो कलावंत उच्च दर्जाच्या कलेसाठी धडपडत असतो, त्याला त्यामुळे न्यूनगंड प्राप्त होतो. ‘हेचि काय फळ मम तपाला’ असे होऊन जाते आणि एकूणच कलेकडे कला म्हणून पाहण्याऐवजी व्यवहार म्हणून पाहण्याची दृष्टी बळावते. हे चित्र उत्तम संगीतासाठी अतिशय मारक तरीही अपरिहार्य. अशा अतिशय गुंतागुंतीच्या वातावरणात मार्ग शोधत राहण्याएवढा अवसर मिळणे मुश्किल, तरीही आवश्यक. संगीताची व्यासपीठे बदलली. प्रसिद्धीची माध्यमे बदलली, कलांचा अर्थव्यवहार बदलला आणि रसिकांची आवडनिवडही बदलू लागली. कमअस्सलतेच्या सततच्या माऱ्यामुळे होणारा कोंडमारा आता वेगाने वाढतो आहे. याची समज ज्या रसिकांना यायला हवी, ती अजून आलेली दिसत नाही, याचे कारण संगीतातील नवआधुनिकतेकडे ते केवळ रंजन म्हणूनच पाहात राहिले. संगीताची उपयोगिता मेंदूच्या अगदी वरवरच्या थरात स्थिरावल्यामुळे ते आतपर्यंत पोहोचण्यास नाना अडथळ्यांच्या भिंती उभ्या राहू लागल्या.

अशा अवस्थेत अतिशय नाजूक, तरल अशा संगीताबरोबर अभिजाततेच्या खाणाखुणा ल्यायलेल्या कलेला प्राधान्य मिळण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे. रागसंगीताच्या परंपरेत आलेली भावरम्यता टिकवून ठेवणे आणि त्यात सौंदर्याच्या नव्या कल्पनांना थारा मिळवून देणे आणि त्यासाठी संगीतासाठी उपलब्ध असलेल्या सगळ्या व्यासपीठांचा उपयोग करणे ही आताची गरज आहे. उत्तम काय, हे समजून घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागणे त्यासाठी आवश्यक असते. आत्ता अभिजात संगीतासमोर असलेला मोठा प्रश्न हाच. त्यासाठी प्रतिभावानांच्या नवशोधांना खतपाणी मिळायला हवे. केवळ नवीन नादाच्या शोधात ते सापडेलच, असे वाटत नाही. निसर्गत: निर्माण होणाऱ्या नादाला-स्वराला पर्याय म्हणून तंत्राच्या मदतीने तयार केलेल्या आधुनिक उपकरणांद्वारे निर्माण करता येणारा नाद आणि अशा अनेक नादांच्या सान्निध्यातून तयार होणारा स्वरमेळ संगीताच्या नव्या जडणघडणीत अधिक मोठी कामगिरी बजावताना दिसतो आहे. हे अपरिहार्य. त्यामुळे अभिजात संगीतासाठी यापुढील काळ अधिक चिंतेचा.

शांततेची गरज

 केवळ दीर्घ काळ सुरू असलेली परंपरा टिकवून ठेवण्याच्या अट्टहासापेक्षा मानवी मनाच्या शांततेची गरज म्हणून हे संगीत टिकणे अधिक महत्त्वाचे. अतिवेगवान नागरीकरणामुळे आणि आधुनिक जीवनशैलीमुळे निसर्गापासून अतिदूर पोहोचलेल्या समूहांसाठी हे संगीत हितकारक. अमूर्ततेतील आनंद हेही जीवनमूल्य असायला हवे, याचा विसर पडू लागल्याने असे घडते आहे. अशाही परिस्थितीत नवयुवकांमध्ये या संगीताबद्दल असलेले आकर्षण आहेच. अनेक युवक या संगीताकडे वळत आहेत. ‘पॉप्युलर’ संगीतापेक्षा अभिजात संगीतात लागणाऱ्या रियाजाची त्यांची तयारी आहे. संधी मिळेल किंवा नाही, याबद्दल जराही विचार न करता जगण्याचे सारे सामर्थ्य एकवटून हे युवक फक्त संगीत करत आहेत. हा आशेचा किरण जपून ठेवण्याची जबाबदारी आता आपली आहे. समाजमाध्यमात किती लोकांना ते आवडले, या आकड्याला आलेले अतिरेकी महत्त्व पुसून टाकून, उत्तमाचा ध्यास घेणाऱ्या रसिकांचा गट जसजसा प्रभावी होत जाईल, तसतसे हे आकडे म्हणजे प्रसिद्धीचे बुडबुडे ठरतील. त्यासाठी अगदी पहिल्या इयत्तेपासून कला हा अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक असायला हवा. अशा कलांमध्ये गोडी असलेल्या मुलांना निवडून त्यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची व्यवस्था निर्माण व्हायला हवी. त्यांना रुची असणाऱ्या कलांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन हवे.

पाश्चात्त्य संगीत परंपरेतील समूह संगीतात बँड या संकल्पनेला खूप प्राधान्य मिळते. त्यामध्ये अनेक कलावंतांचा सहभाग असल्याने, मोठ्या प्रमाणात संगीत शिकणाऱ्या मुलांना त्यात भाग घेता येतो. विविध वाद्यांवर प्रभुत्व मिळवणाऱ्या कलावंतांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकते. भारतात चित्रपट संगीताच्या क्षेत्रातच अशा संधी मिळतात. अभिजात संगीत एकट्या कलावंताची मिरासदारी असल्याने, त्यातील संधींचे प्रमाणही कमी. परंतु तेच आव्हानही. ते पेलण्याची क्षमता निर्माण करणे आणि त्यासाठी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे अभिजात संगीताच्या विकासासाठी आवश्यक. या शतकात चित्रवाणी माध्यमांनी अभिजात संगीताला अक्षरश: वाळीत टाकले आहे. त्याचे कारण व्यापारीकरणात आहे. तीस- चाळीस मिनिटे एकाच कलावंताचा चेहरा पाहात बसणे, ही आजच्या श्रोत्यांसाठी जीवघेणी गोष्ट. त्या काळात तेवढ्याच वेळा तो रसिक अन्य वाहिन्यांची सफर करून येतो. अशा कार्यक्रमांसाठी प्रायोजक मिळणेही दुरापास्त. दूरसंवाद माध्यमांबाबतही हाच अनुभव. त्यामुळे कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. संगीताच्या व्यासपीठांपुढील समस्याही हीच. केवळ ‘मोठ्या’ कलावंतांचेच कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांनी, नव्याने रसिकांसमोर येऊ पाहणाऱ्या उमद्या कलाकाराकडे जिव्हाळ्याने, प्रेमाने पाहण्याची समज विझू देता कामा नये. घराघरांत छोट्या मैफिलींचे आयोजन करून अशा कलावंतांना प्रोत्साहन देणे सहजशक्य असते. अशा वेळी या कलावंतांची तुलना मोठ्या कलावंतांशी न करण्याचे सौहार्द अंगी बाळगणेही आवश्यक. संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी अशा नव्या कलाकारांसाठी मुद्दाम प्राधान्य देणे आणि संगीत ऐकणाऱ्या नव्या पिढीतील श्रोत्यांनाही विश्वासात घेणे अत्यंत उपयोगी ठरणारे आहे. केवळ संगीत आणि संगीतच करू इच्छिणाऱ्या तरुणांना आजच्या वातावरणात येणारे वैफल्य ही एक शोकांतिका आहे. अज्ञाताच्या प्रदेशाची सफर घडवणारे गुरू हे शिष्यांसाठी श्रद्धास्थान असतात. त्यांच्याकडून जी कला मिळते, त्यावर स्वत:चे संस्कार करून ती पुढे नेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये नसते. तसे अपेक्षितही नसते. मात्र संगीत टिकवून ठेवण्यासाठीही अशा कलावंतांचे योगदान मौल्यवान असते, याची जाण समाजाने ठेवायलाच हवी.

mukund.sangoram@expressindia.com  

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Technology field vision values thousands social media platforms akp

ताज्या बातम्या