माणसाचे ज्ञानाचे, योगाचे, कर्माचे म्हणून जे जे मार्ग आहेत ना तेदेखील त्याची भ्रमंती वाढवणारेच आहेत! मग तो अपौरुषेय वेद असो की सत्यप्राप्तीची आणि आत्मकल्याणाची ग्वाही देणारा पंथ असो.. जे जे माणसाच्या हाती आलं त्याला त्यानं विकृत करून टाकलं. गाडी थांबविण्यासाठीचे वेगनियंत्रक गाडीतच असतात, पण नव्यानंच गाडी शिकून ती चालवत असलेला वेगावर ताबा आला नाही की गांगरतो, गोंधळतो आणि गाडी कशी थांबवायची असते हे ‘ज्ञान’ विसरतो. त्याचप्रमाणे आत्मोन्नती कशी करावी, याचं शुद्ध ज्ञान अनेक ग्रंथांत आहे, पंथांत आहे. ते कितीदा का वाचा ना! जीवनात सुरू असलेली आत्मिक घसरण नुसत्या शाब्दिक ज्ञानानं रोखता येत नाही. म्हणूनच शिवजी  स्पष्ट सांगतात की, ‘‘यज्ञो व्रतं तपो दानं जपस्तीर्थे तथैव च। गुरूतत्त्वमविज्ञाय मूढास्ते चरते जना:!’’ गुरूतत्त्वाचं ज्ञान झाल्याशिवाय यज्ञ, व्रत, तप, दान, जप, तीर्थाटण यात माणूस कितीही रमला तरी काही उपयोग नाही! आता ‘गुरुतत्त्वाचं ज्ञान’ म्हणजे काय हो? आगीने हात भाजतो, हे ज्ञान मला असेल तर मी आगीत हात घालणारच नाही. अर्थात ज्ञानानुरूप आचरण होत असेल तरच त्याला ‘ज्ञान आहे’,  हे सिद्ध होईल. गुरूच्या बोधानुरूप जगायच्या प्रयत्नांना साधक लागला तरच त्याला गुरुतत्त्वाचं ज्ञान आहे, असं म्हणता येईल. स्वामी विवेकानंद म्हणत, तुमच्या बाजूच्याच खोलीत सोन्याचा खजिना आहे आणि दोन्ही खोल्यांमधील भिंत झिरझिरीत पडद्यासारखी पातळ आहे. तर तुम्ही स्वस्थ बसाल का? तो खजिना हस्तगत करण्याच्या प्रयत्नांना लागालच ना? मग आत्मकल्याणाशिवाय परमानंद नाही, असं खरंच वाटत असेल तर त्या आत्मकल्याणाच्या प्रयत्नांना लागालंच ना? आपण आत्मकल्याणासाठी तसं झोकून देतो का? नाही! कारण आत्मकल्याण, आत्मसाक्षात्कार, परमात्म्याची प्राप्ती यावर आपला खरा पूर्ण विश्वासच नाही! तो विश्वास सद्गुरू निर्माण करतात, जोपासतात, वाढवतात, टिकवतात. त्यासाठी त्यांनी माझ्या जीवनात येणं आणि मला घडवणं अत्यावश्यक आहे. त्यांच्या प्रयत्नांमध्ये मोडता न घालण्यापुरता माझा सहभाग आहे! काही दिवसांपूर्वी उत्तर भारतात जाताना काही साधकांशी गप्पा झाल्या. मी कुतूहलानं विचारलं की, ‘‘तुम्ही दीक्षा कधी घेतलीत?’’ त्यावर ते उद्गारले, ‘‘छे! तिथे दीक्षा वगैरे प्रकारच नाही. आपण त्यांना गुरू मानायचं एवढंच.’’ मी अधिकच आश्चर्यानं विचारलं, ‘‘मग काही उपासना किंवा मंत्र सांगितला का?’’ त्यावर निर्धास्तपणे ते म्हणाले, ‘‘सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही मंत्राबिंत्राची भानगडच नाही!’’ म्हणजे शाळेत प्रवेश घेतला आहे, पण शिक्षकांना मानायची गरज नाही की अभ्यासाचीही भानगड नाही! असो. गुरुगीतेनुसार मात्र सद्गुरू आणि शिष्यातलं नातं क्षणोक्षणी उमलत जाणारं आहे आणि गुरुशिवाय आत्मोन्नती केवळ अशक्य आहे. मडकं मातीचंच असतं हे खरं, पण माती रगडून ती फिरत्या चाकावर ओतून मातीच्या गोळ्याला आतून आधार देत आणि बाहेरून थापटत आकार देणारा असल्याशिवाय माती स्वप्रयत्नांनी मडक्यात रूपांतरित होऊच शकत नाही!