साक्षात शिवजी सांगतात की देवी, जे ब्रह्म वा परब्रह्म म्हणतात ना, ते सद्गुरूवाचून दुसरं काही नाही! आता कुणाच्या मनात संशय येईल, वेदात असं कुठं म्हटलं आहे? अमक्या पुराणात तर अमक्या देवालाच सर्वोच्च म्हटलं आहे, मग सद्गुरूच ब्रह्म कसे? शास्त्राचा काय आधार आहे? या सर्व शंका मोडीत काढत शिवजी लगेच सांगतात की, ‘‘वेदशास्त्रपुराणानि, इतिहासादिकानि च। मंत्रयंत्रादिविद्याश्च, स्मृतिरूच्चाटनादिकम्।। शैवशाक्तागमादीनि, अन्यानि विविधानि च। अपभ्रंशकराणीह, जीवानां भ्रांतचेतसाम्।।’’ वेद, शास्त्र, पुराणे, इतिहासग्रंथ, मंत्र-यंत्रादि विद्या, स्मृती, उच्चाटण आदी ग्रंथ, शैव-शाक्त, आगम-निगम आदी तत्त्वज्ञान आणि अन्यानि विविधानि च, म्हणजे असं बरंच काही हे आधीच भ्रांतीत पडलेल्या जिवाला आणखीनच भ्रमित करतात! मग पुढे शिवजी गुरूभक्तीचा महिमा गातात, त्याचं महत्त्व काय आहे ते सांगतात आणि त्याच ओघात स्पष्ट करतात, ‘‘गुरुब्र्रह्मा गुरर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर:। गुरुरेव परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम:।।’’ या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता केवळ सद्गुरूच आहे. सद्गुरूच परब्रह्म आहे. ‘‘न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं। शिवशासनत: शिवशासनत:, शिवशासनत: शिवशासनत:।।’’ सद्गुरूशिवाय कोणतंही तत्त्व श्रेष्ठ नाही, परम नाही, सर्वोच्च नाही, हीच शिवाची आज्ञा आहे, असं वारंवार सांगितलं. त्याच गुरूतत्त्वाचं ध्यान केलं, अर्थात ध्यास घेतला आणि त्यानुरूप आचरण केलं तरच जीव ब्रह्ममय बनतो, असं सांगितलं. नंतर त्याचं विस्तारानं विवरणही केलं आणि अखेर सांगितलं की हे देवी मी सांगितलेलं हे रहस्य कुणालाही सांगू नकोस आणि शक्य तितकं गुप्त ठेव. (इदं रहस्यं नो वाच्यं, तवाग्रे कथितं मया। सुगोप्यं च प्रयत्नेन, मम त्वं च प्रिया त्विति।।) कुणालाही म्हणजे कुणा-कुणाला? तर सद्गुरूच मुख्य आहे, हे मानत नसेल तर तुझा पुत्र गणपती, विष्णू आदी देव यांनाही कधी तू हे रहस्य सांगू नकोस! तर हे रहस्य मत्स्येंद्रांनी ऐकलं. शिवजींकडून प्रथम हे ज्ञान मिळालं आणि त्यातून हा नाथपंथ अवतरला म्हणून शिवजींना आदिनाथ म्हटलं जातं. आदिगुरू म्हटलं जातं. ‘‘आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।’’ मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथांकडे, गोरक्षांकडून गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे श्रीगुरूभक्तीचं हे रहस्यज्ञान परंपरेनं आलं. त्यामुळेच ‘ॐ नमोजी आद्या’या प्रथम चरणातून ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तिनाथांबरोबरच आद्यगुरू शिवजींचंही स्मरण केलं. या ओवीत नाथपंथाचं आणखी एक गूढ दडलं आहे. नाथपंथानं ‘जीवब्रह्मसेवे’चं व्रत अंगीकारलं तेव्हा लोकांच्या दु:खनिवारणासाठी अनेक मंत्र तयार केले. त्यांची सुरुवातच ‘ॐ नमो आदेश। श्रीगुरुजी..’ अशी होते! ‘आदेश’ हा शब्दही नाथपंथात महत्त्वाचा. आदेश म्हणजे आद्य+ईश, अर्थात शिवजी! तेव्हा लोककल्याणासाठी गीतेचा जो भावानुवाद झाला त्याची सुरुवात ‘ॐ नमो’नंच होणं स्वाभाविक आहे!