काँग्रेसचे चरित्र समजून न घेतल्याने राहुल गांधी आता पक्षाला केडरबेस बनवू पाहत आहेत. त्यांना तसा सल्ला देणाऱ्यांच्या नादी लागून संघटनाबांधणीचा नेमका उलटा प्रयोग त्यांनी आरंभला आहे. सध्या काँग्रेसमध्ये नेते कमी व सल्लागार अधिक आहेत. ‘टीम राहुल’ ही त्यातीलच एक नवी जमात. नेत्याच्या नवकल्पनांना मूर्तरूप देणारी योजना अमलात आणण्यासाठी असते, याचा नेमका विसर या टीमला पडलेला आहे..
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष केडरबेस करायचा आहे. हा प्रकार म्हणजे काँग्रेसचा इतिहास, परंपरा बदलण्यासारखा आहे. काँग्रेसचा जन्मच मुळी सत्ता उलथवण्याच्या उद्देशाने झाला होता. राजकीय सत्तांतर (परिवर्तन नव्हे!) हाच काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा आत्मा आहे. ब्रिटिशांच्या जोखडाखाली असलेल्या भारताला मुक्त करणे अर्थात राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्ष वाढला. जेथे सत्ता- तेथे काँग्रेस पक्ष पोहोचला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हस्तगत करण्यावर पक्षाचा भर राहिला. काँग्रेसच्या या चारित्र्यामुळे अनेक जण प्रभावित झाले. नेत्यांभोवती केंद्रित सत्ता, सत्तेभोवती केंद्रित कार्यकर्ते हीच काँग्रेसची धारणा आहे. राहुल गांधी व त्यांच्या (स्वयंघोषित) टीमला ही धारणा बदलायची आहे. काँग्रेसचे चरित्र समजून न घेतल्याने राहुल गांधींचा प्रायमरी मतदारसंघाचा प्रयोग फसला. कोणत्याही विषयासाठी समिती नेमणे हे काँग्रेसचे सरकारीकरण आहे. अशा स्थितीत राहुल यांना सत्ता नसताना त्यांना केडर वाढवायचे आहे. काँग्रेस पक्ष अत्यंत व्यावहारिक पक्ष आहे. जोपर्यंत राहुल गांधी यांना समोर केल्याने लाभ मिळेल, असे काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांना वाटत होते; तोपर्यंत राहुलगान सुरू होते. लोकसभा निवडणुकीनंतर तशी परिस्थिती राहिलेली नाही. राहुल गांधी ‘टीम’ने म्हणे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे विश्लेषण केले. ज्येष्ठ श्रेष्ठ असतील तर कनिष्ठ एकनिष्ठ राहतात. काँग्रेसमधील ज्येष्ठ जनाधार नसल्याने श्रेष्ठ नाहीत; म्हणून लोकसभेत पराभव झाला, असा समज टीमने राहुल गांधींचा करून दिला. त्यामुळे राहुल गांधी यांना केडरची आठवण झाली. लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या दाहोद मतदारसंघात प्रचारासाठी आलेले राहुल गांधी उमेदवार व तत्कालीन खासदार डॉ. प्रभाबेन तावियाड यांच्याशी शब्दही बोलले नाही. प्रभाबेन शब्दश: राहुल यांच्यामागे बोलण्यासाठी धावत होत्या. खासदार म्हणजे केडरची पहिली फळी. त्याच्याशी राहुल गांधी यांचे वर्तन हे असे!
राजकीय सत्तापरिवर्तन हा विचार अबाधित ठेवून काँग्रेसने राजकारण केले. राजकीय सत्तेशिवाय सामाजिक परिवर्तन करण्याचा विचार काँग्रेस नेतृत्वाच्या मनाला कधीही शिवला नाही. आता सत्ता नाही; त्यामुळे राहुल गांधी यांना संघटनात्मक बांधणीची चिंता आहे. पण सत्ता नसताना काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर मजबूत होऊ शकणार नाही. कारण संघटन एका रात्रीत उभे राहत नाही. विचार- विचाराच्या प्रचारासाठी सर्वसमावेशी कार्यक्रम- त्यातून विचारांना समर्थन करणारा वर्ग (क्लास) व त्यानंतर जनाधार (मास)- ही संघटनेची चढण आहे. ही संघटनात्मक बांधणीची चढण उलट पद्धतीने राहुल गांधी यांना राबवायची आहे. काँग्रेसजनांना हेच नकोय. संघटनात्मक सबलीकरणासाठी थांबण्याची काँग्रेस नेत्यांची इच्छा नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे गांधी कुटुंबाची जपमाळ ओढून सत्तेचा मोक्ष अनुभवलेले राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करतात.
राहुल गांधी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेतून दोन अर्थ ध्वनित होतात. एक- राहुल गांधी यांची उपयुक्तता संपलेली आहे. दोन- गांधी परिवार वगळता आपल्याला कुणीही तारणहार नाही, हा समस्त काँग्रेसजनांचा पक्का समज आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीकठाक होती; तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याला भविष्याची चिंता नव्हती. २०११ मध्ये आजारपणामुळे सोनिया गांधी यांना शारीरिक हालचालींवर मर्यादा येऊ लागल्याचे २४, अकबर रस्त्यावरच्या धुरीणांना कळू लागले व ‘राहुल उदय’ झाला. राहुल यांच्याकडे नेतृत्वाची आभा नाही, हे नरेंद्र मोदी यांच्यामुळेच काँग्रेसजनांना; काँग्रेसच्या सहकारी पक्षांना कळले! राहुल गांधी सामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, त्यांची कार्यशैली काँग्रेसच्या चारित्र्याला न शोभणारी आहे, याची जाणीव वारंवार अनेकांनी करून दिली; पण गांधी कुटुंबीयांविरोधात कधीही उघडपणे आवाज काढायचा नाही, हा संस्कार त्यांनी जपला. आता मात्र या नेत्यांचा संयम सुटला आहे. प्रियंका यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी वारंवार राहुलविरोधी वक्तव्ये ऐकू येऊ लागली आहेत. ज्या राहुल गांधी यांच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद शाबूत राहिले; त्यांनीदेखील राहुल गांधींना सल्ला देऊन टाकला. लोकसभेत काँग्रेस जोपर्यंत ४४ वरून ४ वर येत नाही; तोपर्यंत राहुल गांधी थांबणार नाहीत, ही प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या सर्वात जवळच्या सहकारी पक्षाच्या दिल्लीस्थित नेत्याची. कारण आपण एका देशव्यापी राजकीय पक्षाचे सर्वोच्च नेते आहोत, असे कुठेही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत नाही. सोशल नेटवर्किंग साइट्सवर रजनीकांत, आलिया भट यांच्या बरोबरीने राहुल गांधी ‘लोकप्रिय’ आहेत. राहुल गांधी यांची उपयुक्तता संपल्याची जाणीव सर्वप्रथम माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना झाली होती. त्यामुळे ते त्यांना सतत मंत्री बनण्याचा आग्रह करीत होते. राहुल व मनमोहन सिंग यांच्यातील अंतर सत्ता मावळतीच्या काळात खूप वाढले होते. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये मनमोहन सिंग यांनी ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशावर मोठे संकट (डिझास्टर) कोसळेल’ असे विधान केले. मनमोहन सिंग यांचा स्वभाव अशी टोकाची विधाने करण्याचा नाही. ते त्यांना बोलण्यास ‘हायकमांड’ने भाग पाडले. मनमोहन सिंग यांना मोदींविरोधात बोलण्याचा आग्रह राहुल गांधी यांनीच धरला होता; पण मनमोहन सिंग बधले नाहीत. शेवटी लेकाच्या आग्रहाखातर आई सोनिया यांनी मनमोहन सिंग यांना मोदींविरोधात बोलण्याची विनंती केली. देशाच्या पंतप्रधानाला अशी वागणूक गांधी परिवाराने दिली आहे.
गांधी कुटुंबाशिवाय कुणीही तारणहार नसल्याचा भ्रम सत्ता उपभोगणाऱ्यांनी जाणीवपूर्वक पसरवला. त्यामुळे काँग्रेसमध्ये दिल्ली वगळता अन्य कुठेही नेतृत्व उभे राहू शकले नाही. गेली दहा वर्षे सत्तेत राहूनही मास पार्टी असलेल्या काँग्रेसमध्ये मास लीडर निर्माण होऊ नये, ही शोकांतिका आहे. तिकडे दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ राज्याची सत्ता हाताळल्यानंतर मोदींनी दिल्ली काबीज केली. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गोवा, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची नावे घेतली जातात. सर्वसमावेशी नेतृत्वाची संकल्पना राबवण्यास काँग्रेसमध्ये कुणीही तयार नाही. स्थानिक नेतृत्व प्रभावी झाले की त्याला दिल्लीत बोलवायचे व त्याच्या राजकीय कारकिर्दीचा समारोप करायचा, हे काँग्रेसचे तंत्र आहे. महाराष्ट्र त्याचे सर्वोत्तम उदाहरण. पक्षातील गट-तट सांभाळण्यासाठी गांधी घराण्यातील सदस्य केंद्रस्थानी राहिला. हायकमांड सांगेल तो मुख्यमंत्री-प्रधानमंत्री; त्याला जनाधार असला काय नि नसला काय! हायकमांड संस्कृती हे हुकूमशाहीचे सोज्ज्वळ भारतीय स्वरूप आहे. भारत देश म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या (प्रामुख्याने गांधी कुटुंबीयांच्या) युवराज व युवराज्ञींसाठी प्रशिक्षण शाळा आहे. भारतीयांनी हेच करीत राहायचे का? काँग्रेसजनांना ही तुलना रुचणार नाही. नेता कधीही सल्लागारांनी व्यापलेला नसतो. काँग्रेसमध्ये नेत्यांपेक्षा सल्लागारांना महत्त्व आले. कार्यकर्त्यांपेक्षा भाट व पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या विचारवंतांचा सुळसुळाट झाला. सध्या काँग्रेसमध्ये नेते कमी व सल्लागार अधिक आहेत. ‘टीम राहुल’ ही नवी जमात काँग्रेसमध्ये उदयास आली. टीम सल्ल्यासाठी नव्हे; तर नेत्याच्या नवकल्पनांना मूर्तरूप देणारी योजना अमलात आणण्यासाठी असते.
काँग्रेसच्या नेतृत्वाला सल्लागारांची गरज पडायला लागली; तेव्हापासून वाईट दिवस सुरू झाले.  सल्लागारांच्या भरवशावर देश चालत नाही. दांडी सत्याग्रहाची घोषणा केल्यानंतर महात्मा गांधी यांना मोतीलाल नेहरू (राहुल गांधी यांचे खापर पणजोबा) यांनी लांबलचक पत्र लिहिले. त्यात दांडी सत्याग्रहामुळे काहीही साध्य होणार नाही; तो कसा फसेल आदी मुद्दय़ांचा ऊहापोह केला. गांधीजींनी पत्राचे उत्तर दिले- ‘कर के देखो, तुम्हारा बापू.’ नेहरू नाराज झाले. पण नेत्याची इच्छा ही आज्ञा मानून त्यांनी दांडी सत्याग्रहाच्या स्थान व वेळेची घोषणा केली. सत्याग्रहाच्या दिवशीच रेल्वे स्थानकावर मोतीलाल नेहरू यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली. तुरुंगात जाण्यापूर्वी नेहरू यांनी गांधीजींना तार पाठवली. त्यात म्हटले होते- ‘प्रिय बापू, बिना किये ही देख लिया!’ गांधीजींना जनमानसाची नाडी माहिती होती. कारण ते लोकांमध्ये मिसळत होते. राहुल यांच्याबाबत एक तरी काँग्रेसचा नेता प्रामाणिकपणे असे म्हणू शकेल का?
जे लक्षावधी रुपयांचे मानधन घेऊन काँग्रेसची ‘वकिली’ करीत होते; तेच नेते-प्रवक्ते झाले आहेत. राहुल गांधी आमचे नेते आहेत व त्यांच्याकडून आम्ही अमुक-तमुक शिकलो; असे म्हणण्याचे धाडस कुणीही काँग्रेसचा नेता करणार नाही. राहुल गांधी यांनी स्वत:चे नेतृत्व एकदाही सिद्ध केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात नेते-कार्यकर्ते बोलू लागले आहेत. राहुल गांधी आतापर्यंत जितक्या वेळा बोलले ती केवळ प्रतिक्रिया होती. आता प्रतिक्रिया नव्हे; विरोधी पक्ष म्हणून त्यांना पक्षाला कार्यक्रम द्यावा लागेल. तो दिला तरच केडर व मास बेस काँग्रेस पक्ष उभा राहील. जनांचा प्रवाहो कोणत्या दिशेने चालला आहे, हे कळण्याइतपत प्रशिक्षण राहुल गांधींचे झाले आहे. आता प्रत्यक्ष प्रयोग करण्याची वेळ आहे. त्यासाठी जनांच्या प्रवाहात सम्मिलित व्हावे लागेल. नाही तर काँग्रेसमधील राहुलविरोधी सूर हायकमांड दडवू शकणार नाही. लोक, कार्यकर्ते आपला नेता निवडत असतात. काळ त्या नेत्याचे नेतृत्व सिद्ध करीत असतो. भक्कम करीत असतो. राहुल गांधींचे नेतृत्व घराणेशाहीने लादलेले आहे. ते भक्कम नसेल तर काँग्रेसजन आपला नेता निवडतील. निवडणुकीतील जय-पराजयापेक्षा संघटनेमध्ये ‘फिनिक्स’ उत्साह निर्माण केला तरच राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध होईल. हा जनांचा प्रवाहो राहुल गांधी यांना अखंडित ठेवावा लागेल; त्यात स्वत: सहभागी व्हावे लागेल. हेच त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. रामदासस्वामींच्या भाषेत सांगायचे तर- जनांचा प्रवाहो चालला, म्हणजे कार्यभार आटोपला.. जन ठायी ठायी तुंबला म्हणिजे खोटे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team rahul to make congress cadre base party
First published on: 08-09-2014 at 03:13 IST