सामान्य माणसांच्या मनात असलेला धाक एवढेच पोलिसांच्या वर्दीचे भांडवल असते की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आली आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीमुळे तर त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. पोलिसांच्या नजरेत इंदुलकर हेच खरे गुन्हेगार आहेत, कारण त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस केले. धाडस म्हणून त्यांनी केले काय असेल, तर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकाबाबत कारवाई का होत नाही, असा प्रश्न विचारला. वर्दी नावाचे जे प्रस्थ, राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यानंतरच्या काळात वाढू लागले, त्याने आपण नेमके कुणाच्या बाजूचे आहोत, हेच पोलिसांना कळेनासे झाले आहे. पोलीस चौकीची पायरी चढण्यापेक्षा अन्याय सहन केलेला बरा, असे म्हणायची वेळ यावी, असे वर्तन ठाण्याच्या पोलिसांनी केले. तक्रार करणाऱ्या इंदुलकरांना त्यांनी इतकी मारहाण केली, की पुन्हा पोलिसांकडे जाण्यास कुणी धजावता कामा नये. लोकशाहीमध्ये प्रशासन हा एक खांब असेल आणि तो असा कलथून गेला असेल, तर तीन पायांची लोकशाही किती वेगाने विकास साधणार, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. साधा मोबाइल हरवला म्हणून चौकीत गेलात, तर तुम्ही कसे मूर्ख आहात, हे पोलिसांकडून पटवून घेण्याची पाळी येते. गंठन चोऱ्या, घरफोडी आणि दरोडय़ांबाबत तर बोलायलाच नको. बलात्कारासारख्या घटनांबाबत माध्यमांनी पुढाकार घेतला नसता, तर अशा अनेक घटना प्रकाशात आल्या नसत्या. तोपर्यंत तक्रार दाखल करणारी महिलाच बदफैली आहे, अशी सारवासारव केली जात असे. पण ठाण्याच्या पोलिसांना माध्यमांचीही टर उडवण्याची इच्छा होते. ‘आमचाही फोटो हवा का?’ अशी निर्लज्ज विचारणा करण्यास ते धजावतात, याचे कारण त्यांच्या असल्या कृत्यांवर आजवर पांघरूण घालण्यात आले. सरकार नावाची गोष्ट कुठे दिसते, या प्रश्नाचे उत्तर पोलीस आणि सरकारी कचेऱ्या असे असेल, तर त्या ठिकाणी सामान्यांची जी परवड होत असते, त्याकडे लक्ष कुणी द्यायचे? बदल्या करताना जर उघडपणे आर्थिक व्यवहार होत असतील, तर त्या पोलीस शिपायाच्या मनात मंत्र्याबद्दल कोणता आदर राहील? स्वयंसेवी कार्यकर्त्यांना अशी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने शिक्षा देण्याची गरज गृह खात्याला वाटत नाही, याचे कारण हे खातेच आता पोलीस दलाच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. राजकीय मंडळींच्या दहीहंडी उत्सवाला कोणतेच सरकारी नियम लागू नसतात, याचे भान इंदुलकरांना नसले, तरी पोलिसांना असल्याने त्यांनी, तुम्ही कोण, असा प्रश्न विचारण्याचे ‘सौजन्य’ दाखवले. समाजातील विकृतीचे जे दर्शन दहीहंडीच्या निमित्ताने झाले, त्याला पायबंद घालण्यात पोलीस सपशेल अयशस्वी ठरले. आपल्यावरील खापर दुसऱ्यावर फोडण्याची या खात्याची सवय जुनीच असल्याने ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांची यादी मागणाऱ्या प्रदीप इंदुलकर यांच्या श्रीमुखात भडकवताना, आपण काही गुन्हा करतो आहोत, याची पुसटशीही जाणीव पोलिसांना नसणार, हे उघड आहे. पोलीस जनतेच्या भल्यासाठी असतात की राजकारण्यांच्या, असा प्रश्नही विचारण्याचे धाडस आता कुणी करू नये. असे निलाजरे वर्तन करणाऱ्या पोलिसांना शिक्षा करू न शकणारे गृहमंत्री आर. आर. पाटील कितीही मोठय़ाने सांगत राहिले की, महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे, तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार?
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2013 रोजी प्रकाशित
सांगा पोलीस कोणाचे?
सामान्य माणसांच्या मनात असलेला धाक एवढेच पोलिसांच्या वर्दीचे भांडवल असते की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आली आहे.
First published on: 02-09-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tell to who police belongs