२००७ साली अमेरिकेची लेहमन ब्रदर्स कोसळली आणि जग आर्थिक अरिष्टाच्या खाईत लोटलं गेलं. या काळात ज्या तीन बँकर्सनी जग मंदीच्या खाईत जाऊ नये म्हणून जे काही केलं, त्या संघर्षांची अप्रतिम कहाणी म्हणजे हे पुस्तक. ते वाचून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. हे कळतं की जगातला एकही बँकर कोणताही निर्णय घेताना आपला देश सोडून अन्य देशाचा जराही विचार करत नाही. अगदी अमेरिकेचा बँकरदेखील. जगाच्या बँकांच्या इतिहासात फक्त एकदाच बँकर्सनी सामुदायिकरीत्या निर्णय घेतला आणि अमलात आणला. बाकी सगळे निर्णय हे सगळे आपापल्या पुरतेच.
सध्या हे फारच छान सुरू झालंय. म्हणजे बँकांच्या प्रमुखांच्या, त्यांच्यातल्या संघर्षांच्या, स्पर्धाच्या बातम्या भाषिक वर्तमानपत्रांच्याही पहिल्या पानांवर झळकू लागल्यात. इतके दिवस फक्त राजकारण्यांसाठी वापरली जाणारी जागा बँकांचे अध्यक्ष वगैरे व्यापून टाकू लागलेत. त्या निमित्ताने का होईना आर्थिक विषयांकडे आपलं लक्ष जाऊ लागलंय. इतके दिवस ‘आपला काय संबंध त्याच्याशी’.. म्हणणारे डॉलर घसरला का वाढला वगैरे प्रश्नांना भिडू लागलेत. छानच हे.
गेल्या काही दिवसांत अशा दोन घटनांनी, त्याच्या बातम्यांनी रिकामटेकडय़ांच्या गप्पांपासून ते उद्योगपतींच्या कॉकटेलपर्यंत सर्वत्र चर्चेचा अवकाश भरून गेला होता. एक म्हणजे रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची झालेली नियुक्ती आणि दुसरी घटना म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या -म्हणजे त्या देशाच्या रिझव्र्ह बँकेच्या- प्रमुखपदी जॅनेट येलन यांची झालेली निवड. राजन यांच्यामुळे रिझव्र्ह बँकेचा गव्हर्नर ‘पहावा’ असाही असू शकतो हे दिसलं तर येलन यांच्या निवडीमुळे जगातील सर्वशक्तिमान बँकेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एक महिला आली.
या सगळ्या बँकर्सचा एकमेकांशी काही संबंध असतो का? जागतिकीकरण वगैरे आपण म्हणतो पण आपल्या निर्णयाचा शेजारच्या देशावर वा अन्य कोणा देशावर काय परिणाम होईल याचा विचार हे बँकर्स करतात का? आणि मुळात हे बँकर्स निर्णय घेताना विचार कसला करतात? त्या त्या देशातील प्रचलित राजकारणाशी त्यांचा संबंध असतो का? असलाच तर त्या राजकारणाचा बँकर्सच्या निर्णयांवर कितपत प्रभाव किंवा परिणाम होतो?.. एक ना दोन.. बँकर्सच्या संबंधातील प्रश्नांची मालिका ही अशी कितीही लांब होईल. तो विषयच तसा रोचक आहे. त्यात ज्यांना रुची आहे अशांनी किंवा रुची असायला हवी असं वाटतं त्यांनी अगदी अलीकडचं एक पुस्तक वाचायला हवं म्हणजे हवंच.
‘द अल्केमिस्ट : इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ सेंट्रल बँकर्स’ हे त्याचं नाव. नील आयर्विन हा त्याचा लेखक. नील पत्रकार आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये तो अर्थविषयक लिखाण करतो. पोस्टच्या अर्थविषयक ब्लॉगचा संपादकही आहे तो. कोलंबिया विद्यापीठातून एमबीए केल्यानंतर अर्थविषयक पत्रकारितेसाठी त्याला पाठय़वृत्ती मिळाली होती. हे अशासाठी आवर्जून नमूद करायचं की पत्रकारिता हादेखील उच्चशिक्षितांसाठी व्यवसाय मार्ग असू शकतो, हे अनेकांना कळावं म्हणून. असो. तर गेली सहा र्वष नील आर्थिक घडामोडींवर लिहितोय. या क्षेत्रातल्या उच्चपदस्थांना भेटतोय, आतल्या गोटातल्या बातम्या देतोय आणि घडलेल्या घटनांचं विश्लेषणदेखील करतोय. हा काळ अत्यंत महत्त्वाचा.
इराक युद्धामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था खंक झालेली आणि त्यात फेडचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन यांनी अतिस्वस्त व्याजदराच्या जाळ्यात मध्यमवर्गाला भुलवून उधळपट्टीची सवय लावलेली. त्यानंतर अमेरिकेत सत्ताबदल झाला. जॉर्ज बुश जाऊन बराक ओबामा आले आणि नंतर ग्रीनस्पॅन यांच्या खुर्चीवर बेन बर्नाके विराजमान झाले. हा सगळाच काळ अर्थविषयक घडामोडींसाठी कमालीचा गतिमान आणि अस्थिर. अमेरिकेच्या बरोबरीने.. किंबहुना अमेरिकेमुळे.. जगानेही या काळात ही आर्थिक अस्थिरता अनुभवली.. अजूनही अनुभवतंय. अमेरिकेइतकेच अन्य दोन मोठे बँकर्स या नाटय़ात होते. एक म्हणजे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मर्विन किंग आणि युरोपीय मध्यवर्ती बँकचे जीन क्लॉड त्रिशे. या तिघांच्या संबंधांची, कामाची आणि संघर्षांचीदेखील रसदार आणि खरीखुरी जागतिक कहाणी म्हणजे हे पुस्तक. तिला खरीखुरी जागतिक का म्हणायचं? तर ११ देशांतल्या २७ शहरांत ती घडते आणि नील या सगळ्या ठिकाणी तिचा मागोवा घेत आपल्याला बरोबर घेऊन जातो आणि नुसतंच तो सगळीकडे आपल्याला हिंडवत नाही. तर जे काही घडलं त्याची डोळस टिप्पणी करतो आणि त्या घटनांचा अर्थ समजावून सांगतो. अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीनं. कुठेही पांडित्याचा आव नाही.
या कहाणीची सुरुवात होते ती पार साडेतीनशे वर्षांपूर्वी. १६५६ साली. म्हणजे जगातली पहिली मध्यवर्ती बँक जन्माला आली तेव्हा. म्हणजे आपल्याकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही झाला नव्हता तेव्हा तिकडे युरोपात पहिली मध्यवर्ती बँक जन्माला आली होती. पुढे ही बँक काही कारणानं बुडली. आपले पैसे गेल्याचं समजल्यानं गुंतवणूकदार संतापले. राजाही रागावला. त्या वेळी त्यानं बँकेच्या गव्हर्नरची गर्दन मारायचाच आदेश दिला, हे वाचून गंमतच वाटते. त्यानंतर १६९४ मध्ये बँक ऑफ इंग्लंड जन्मली आणि अमेरिकेची फेड तर अगदी अलीकडची. हा सगळा काळ, त्यातल्या कथादंतकथा नील जाता जाता सांगत जातो. मग पुढे देशांच्या मध्यवर्ती बँकांचं महत्त्व कसं कसं वाढत गेलं.. त्याचा आढावा नील घेतो आणि आपण अलगदपणे अशा काळात येऊन पोहोचतो ज्या काळात बँकांचा गव्हर्नर हा अर्थमंत्र्यांइतका महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आताचा काळ.
म्हणजे जागतिकीकरणाचा. या काळातलं सगळ्यात मोठं संकट आलं ते २००७ पासून. अमेरिकेत अमाप गृहकर्जे दिली गेली. ज्याला नियमित उत्पन्नाची हमी नाही, त्यालाही मोठमोठी कर्जे दिली गेली. नियमित उत्पन्न नाही आणि म्हणजे कर्जाचे हप्ते नियमित भरले जाणार नाहीत, हे उघड आहे. मधल्या काळात या बँकांनी कर्जाचे रोखे करून अन्य बँकांना विकले होते. त्यामुळे अगदी तळाशी असणाऱ्याचा कर्जाचा हप्ता चुकला तेव्हा त्याच्यावरच्या सगळ्यांचे हप्ते चुकत गेले आणि बघता बघता बँकांचा डोलारा कोसळत गेला. त्या सगळ्या काळाचं अप्रतिम वर्णन नीलच्या पुस्तकात आहे. म्हणजे २००७ सालातल्या ९ ऑगस्ट या दिवशी त्रिशे सुटी घेऊन नातवांशी खेळत आराम करायचं ठरवत होते, त्याच वेळी बँक ऑफ इंग्लंडचे किंग हे भारत आणि इंग्लंड यांच्यातला कसोटी सामना पाहात निवांत वेळ घालवायचे ठरवत होते, त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता वॉशिंग्टनला बेन बर्नाके यांची अर्थमंत्री हेन्री पॉल्सन यांच्याशी न्याहारीभेट ठरली होती.. हे तीन बँकर वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कामांत होते आणि त्याच वेळी बीएनपी पारिबा या तगडय़ा फ्रेंच बँकेकडनं पहिला आणीबाणीचा संदेश युरोपीय मध्यवर्ती बँकेला आला. या बँकेने अमेरिकेतल्या घर व्यवहारांत केलेल्या गुंतवणुकीची किंमत मोठय़ा प्रमाणावर घसरली होती आणि देणी द्यायची वेळ आल्यावर बँकेच्या खात्यात पैसे नव्हते.
प्रदीर्घ काळ चाललेल्या.. आणि आजही पूर्णपणे न संपलेल्या.. आर्थिक अरिष्टाची ती सुरुवात होती. या काळात या तीन बँकर्सनी जग मंदीच्या खाईत जाऊ नये म्हणून जे काही केलं, त्या संघर्षांची अप्रतिम कहाणी म्हणजे हे पुस्तक. ते वाचून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. हे कळतं की जगातला एकही बँकर कोणताही निर्णय घेताना आपला देश सोडून अन्य देशाचा जराही विचार करत नाही. अगदी अमेरिकेचा बँकरदेखील. जगाच्या बँकांच्या इतिहासात फक्त एकदाच बँकर्सनी सामुदायिकरीत्या निर्णय घेतला आणि अमलात आणला. बाकी सगळे निर्णय हे सगळे आपापल्या पुरतेच. तो निर्णय कोणता आणि तो कसा घेतला गेला, या तिघांनी परिस्थिती कशी हाताळली, राजकीय दबावाला ते कसकसे सामोरे गेले.. ते सगळंच वाचनीय आहे. अपेक्षेपेक्षा किती तरी जास्त.
या सगळ्या घडामोडी नील पत्रकाराच्या नजरेतनं टिपत होता आणि वर्तमानपत्रासाठी लिहीतही होता. त्यामुळे आपल्या वाचकांमधल्या अर्थतज्ज्ञाचीही आपल्या लिखाणाला दाद मिळायला हवी आणि सामान्य वाचकालाही ते कंटाळवाणं वाटता नये.. याचं पुरेपूर भान असलेला हा लेखक आहे.
अशा स्वरूपाचं पुस्तक वाचणं हे दुहेरी शिक्षण असतं. एक- आपल्याला तो विषय समजतो आणि दोन- चांगलं लिहावं कसं तेही कळतं. एरवी बँका वगैरे हा विषय काही अगदी सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा नाही. याला अपवाद कसा असू शकतो, हे या पुस्तकावरनं समजून घ्यावं.. कारण पहिले ते अर्थकारण..
द अल्केमिस्ट – इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ
सेंट्रल बँकर्स : नील आयर्विन,
प्रकाशक :  हेडलाइन पब्लिशिंग ग्रुप,
पाने : ४३०, किंमत : २५ पौंड.

Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?
article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट!