रस्किन बॉण्ड यांच्या या नव्या पुस्तकात सारं काही ओळखीचंच असलं तरी आवडत्या रस्त्यावरून पुन:पुन्हा फेरफटका मारण्याचा कंटाळा येऊ नये तसं आल्हाददायक वातावरण आहे आणि म्हणून ते हवंहवंसं वाटणारं आहे.
पहाडांमधला लेखक अशी ओळख असलेल्या रस्किन बॉण्ड यांची लेखणी गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ सतत लिहिती राहिली आहे. त्यांचं लिखाण आपल्या चांगल्या ओळखीचं आहे. लहान मुलांची पुस्तकं, लघुकथा संग्रह, लघु कादंबऱ्या, ललित अशी तब्बल १२० पुस्तकं या लोकप्रिय लेखकाच्या नावावर आहेत. त्यांच्या लिखाणाशी गट्टी जमलेल्यांना त्यात सातत्याने येणारा डेहरादून, मसुरीचा पहाडी परिसर आपणच पायाखाली घातला असावा इतका पाठ असतो! मसुरी इथलं बॉण्ड यांचं घर, त्यातल्या त्यांच्या खोलीतल्या खिडकीशी लिहिण्यासाठी बसायची जागा, त्या खिडकीतून डोकावणारी झाडं यातलं काहीच त्यांच्यासाठी अनोळखी नसतं. त्यांच्या लेखनाकडून आपल्या असलेल्या अपेक्षांनाही कधी फारसा धक्का बसत नाही, पण आवडत्या रस्त्यावरून पुन:पुन्हा फेरफटका मारण्याचा कंटाळा येऊ नये तसं काहीसं बॉण्ड यांच्या वाचकांचं होतं. बॉण्ड यांच्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या निवडक कथा आणि ललित लेखांचा संग्रह असलेलं ‘द व्हेरी बेस्ट ऑफ रस्किन बॉण्ड’ हे नवं पुस्तकसुद्धा पर्वतांतल्या त्याच रस्त्यांची पुन्हा सर घडवत असलं तरीही या लिखाणाचा सहजधर्म असा की, ही रपेटही नेहमीइतकीच आल्हादायकच वाटणारी आहे.  
या संग्रहामध्ये समाविष्ट लेखांची कालखंडानुसार तसेच कथात्म आणि ललित अशा दोन प्रकारांत विभागणी केली आहे. कथात्म साहित्यात पहिला टप्पा १९५०च्या दशकात देहरामधील वास्तव्यादरम्यान लिहिलेल्या म्हणजे अगदीच सुरुवातीच्या काळातील कथांचा आहे. दुसरा टप्पा ६० व ७०च्या कालखंडातील, मसुरीतील मेपलवुड लॉजमधील वास्तव्यादरम्यान केलेल्या लिखाणाचा, तर तिसरा टप्पा ८० सालानंतरचा मसुरीच्या आयव्ही कॉटेजमधील दिवसांचा आहे. ललित लेखनाच्या विभागात ६० व ७०च्या दशकातील लिखाण आणि १९८० नंतरचं लिखाण असे दोन टप्पे आहेत. ‘इलस्ट्रेटेड वीकली’, ‘शॉर्ट स्टोरी इंटरनॅशनल’, ‘ब्लॅकवूड मॅगझिन’ आणि काही पुस्तके यांतील निवडक मजकूर या पुस्तकात आहे. बॉण्ड यांच्या लेखनप्रवास त्यातून उभा राहतो.
कथात्म लिखाणाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अगदी मोजक्या छोटय़ा कथांचा समावेश आहे. ‘द रूम ऑन द रूफ’ ही त्यांची पहिली कादंबरी याच काळातली. तिचा काही भाग या विभागात आहे. या कादंबरीचा अँग्लो इंडियन पोरसवदा नायक रस्टी याला पहाडांमधले स्वच्छंद जगणे खुणावते. ही ओढ इतकी अनिवार आहे की आपल्या करडय़ा शिस्तीच्या गाíडअनविरोधात बंड करायलाही तो तयार झाला आहे. चार िभतींतलं सुरक्षित जगणं सोडून आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी तयार झालेल्या रस्टीच्या मनातली घालमेल, भीती, असुरक्षितता आणि त्याच वेळी सगळी आव्हानं स्वीकारण्याचं साहस हे त्या काळातल्या बॉण्ड यांच्या जगण्याचंच प्रतििबब आहे. या विभागातल्या इतर कथांमधील निवेदकही असाच भोवतालचं जगणं उत्साहीपणे टिपण्यासाठी आसुसलेला दिसतो. ‘द थिव्ज स्टोरी’, ‘द आइज हॅव इट’, ‘द वुमन ऑन प्लॅटफॉर्म नं 8’, ‘द व्रूपेड ट्री’, ‘द फाइट’ अशा या सर्वच गोष्टींमध्ये पौगंडावस्थेतील किंवा नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलांचं मनोविश्व आहे. जगताना मनाला भिडलेले अनुभव निवडून त्याभोवती काळजीपूर्वक रचलेल्या या गोष्टींमधलं बेतीवपण दिसत असलं तरीही त्यांचा नितळपणा भावतोच.
पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी थोडय़ा आणखी पोक्त आहेत. पारंपरिक अर्थाने ‘गोष्ट’ सांगण्याचा अट्टहासही इथे फारसा नाही आणि लिहिणंही अधिक सहज आहे. ‘द काइटमेकर’, ‘मास्टरजी’, ‘मोस्ट ब्यूटीफुल’ अशा काही कथांमध्ये गोष्टीपेक्षाही व्यक्तिचित्रणांवर भर आहे.
माणसांवर विश्वास ठेवणं, त्यांना त्यांच्या गुणावगुणांसह स्वीकारणं हा या कथांचा मोठा गुण आहे. ‘मास्टरजी’ या कथेत मार्कामध्ये फेरफार केल्याबद्दल शिक्षक हातात बेडय़ा ठोकलेल्या अवस्थेत रेल्वे स्टेशनवर निवेदकाला भेटतात. ‘द व्रूकेड ट्री’मधला मित्र अधूनमधून मिरगीचे झटके येणारा मुलगा आहे, तर ‘थिफ’मधला निवेदक मुलगा चोर आहे. एका नवशिक्या लेखकाने त्याला ओळखदेख नसताना आपल्याबरोबर मदतनीस म्हणून ठेवलंय. त्याचा हा विश्वासच त्या पोरगेल्या चोरावर अजब दडपण आणतो आणि चांगलं वागायला प्रवृत्त करतो. बिनया नावाची छोटीशी मुलगी आणि तिला मिळालेली सुंदर निळी छत्री यांची गोष्ट ‘द ब्लू अम्ब्रेला’वर काही वर्षांपूर्वी सिनेमा आला होता. ही कथासुद्धा या संग्रहात आहे.
ललित लेखनाच्या विभागातील लिखाण खूपसं आत्मसंवादासारखं आहे. इथे कशालाही गोष्टीत बंद करण्याची गरज नाही. दूरस्थ राहून पहाडातल्या लोकांचं जगणं, परिसर न्याहाळणारा लेखक या लिखाणात खुलून येतो. इथल्या दऱ्याखोऱ्यांशी अंतर्बाह्य़ समरस झालेल्या लेखकाचं असं दूरस्थपण लेखनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. या संवादातलं सौंदर्य अनुभवायला ‘वन्स अपॉन अ माऊंटन’ हा प्रदीर्घ लेख वाचायला हवा. ‘मॅन अ‍ॅण्ड लेपर्ड’ हा लेख निवेदक आणि त्याला वेळोवेळी सामोरा येणारा बिबळ्या वाघ यांच्यातले श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग चितारतो. ‘ग्रेट ट्रीज इन गढवाल’, ‘बर्डसाँग्ज इन हिल’, ‘रेनी डे इन जून’, ‘ब्रेक ऑफ अ मान्सून’, ‘साऊंड्स आय लाइक टू हीअर’ हे लेख म्हणजे निसर्गाची प्रत्येक छटा शब्दांत बांधण्याचा मनस्वी प्रयत्न आहेत.  
पण अर्थातच हे लेखन केवळ आत्ममग्न निसर्गवर्णन नाही. या परिसराचा इतिहास, इथल्या माणसांच्या जगण्यातल्या अडचणी, विशेषत: पहाडांच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या, प्रतिकूल निसर्गाशी झगडा करत जिद्दीने शिकणाऱ्या लहान मुलांच्या भावविश्वाची डोळसपणे केलली निरीक्षणे ‘लाँग वॉक फॉर बिना’, ‘द ब्लू अम्ब्रेला’, ‘चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ अशा कथा-लेखांमधून सापडतात. वाढती वस्ती, धरणं, पर्यटनासारख्या गोष्टींमुळे वाढती वर्दळ यातून इथल्या निसर्गाची हानी होत आहे आणि पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या माणसांचं जगणंही बदलत आहे. ‘गंगा डिसेन्ड्स’, ‘रोड टू बद्रीनाथ’सारख्या लेखांतून हे बदलही समजून घेता येतात. रस्किन बॉण्ड स्वत:लाही या बदलांचा भाग मानतात. एकांतावर त्यांचं प्रेम आहेच, पण त्याच्या शोधात जगापासून नातं तोडून, डोंगरांच्या कुशीत चनीत जगण्याची इच्छा त्यामागे नाही. उलट या परिसरालाच आपलं जग बनविल्यानंतर त्याच्याप्रति येणाऱ्या जबाबदारीचा वाटा उचलायची इच्छा आहे. बॉण्ड यांच्या सगळ्याच लेखनाच्या केंद्रस्थानी असलेल्या जिव्हाळा इथेही आहे.  
‘द व्हेरी बेस्ट ऑफ रस्किन बॉण्ड :
द रायटर ऑन द हिल’
रुपा पब्लिकेशन, नवी दिल्ली,
पाने : ३९८, किंमत : २९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

   

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The writer on the hill the very best of ruskin bond
First published on: 13-09-2014 at 02:23 IST