दरवर्षीचा ऑस्कर सोहळा जसा नवनव्या संदर्भानी ‘वेगळा’ बनत असतो, तसा यंदाचाही ऑस्कर ‘वेगळा’ ठरला. ढीगभर पुरस्कार घेऊन जाण्याचा मान यंदा कुणालाच मिळाला नाही, त्याची कारणे ऑस्कर सोहळ्याच्या सुरुवातीच्या काही क्षणांतच स्पष्ट झाली होती. सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी असलेला छोटय़ा पडद्यावरचा स्टार सेट मॅक्फरलेन याने आपल्या निवेदन-नांदीतच बेन अफ्लेक याला दिग्दर्शकाचे नामांकन न देऊन ऑस्करने मोठी चूक केल्याचे विनोदी शेरेबाजीतून स्पष्ट केले. अॅकॅडमीच्या गमतीशीर धोरणांची खिल्ली उडवत लोकांच्या मनातील भावनांनाच त्याने वाट करून दिली. पुढे पुरस्कारांच्या विभागणीत एकही ठोस विजेता नसल्याचे स्पष्ट झाले. संगीत व तांत्रिक विभागातील तीन आणि सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह ‘लाइफ ऑफ पाय’ हा स्पर्धेतील लंगडा मानला गेलेला घोडा धक्कादायकरीत्या सर्वाधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला, तर डझनभर मानांकने गाठीशी असलेल्या ‘लिंकन’ची दोन पुरस्कारांवर बोळवण झाली. महत्त्वाच्या चित्रपटांना तीनच्या पुढे बाहुल्या मिळवता आल्या नाहीत. अॅकॅडमीने पुरस्कारांची खिरापत जणू सर्वामध्ये वाटून टाकली. ऑस्करच्या इतिहासामध्ये यापूर्वीही सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नामांकन नसलेल्या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘ड्रायव्हिंग मिस डेसी’ (१९८९)ने ऑस्करमध्ये दिलेली धडक ही अभिनेते-अभिनेत्री यांच्या बळावर होती. यंदा अभिनयाबाबत डॅनियल डे लेविसच्या (लिंकन) जवळपासही फिरकू शकणार नाही, इतका इतरांचा वकूब छोटा होता. ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटासाठी कॅथरिन बिगेलोला दिग्दर्शकीय नामांकनापासून जसे लांब ठेवण्यात आले, तसेच आर्गोच्या बेन अफ्लेकलाही दिग्दर्शन, अभिनयाच्या नामांकनापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले. ‘झीरो डार्क थर्टी’मधील सीआयएच्या िहसक कारवायांची चित्रणे प्रदर्शनापासून राजकीय वादाचा विषय बनली आणि चित्रपटाची वादग्रस्तता नामांकनांवर परिणाम करणारी ठरली. स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘लिंकन’ने १२ नामांकनांची मजल मारून तगडे दावेदार असल्याचा जो आभास निर्माण केला होता, तो नामांकनांनंतरचा दीड महिना वाढतच गेला. गोल्डन ग्लोब, बाफ्टा, रायटर्स गिल्ड, डायरेक्टर गिल्ड या ऑस्करआधी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘लिंकन’ची नाममात्र कामगिरी आणि ‘आर्गो’ची वाढत जाणारी झळाळी यांचा परिपाक हा ऑस्करच्या निकालांवर परिणाम करणारा ठरला. मुळात ‘आर्गो’ आणि ‘झीरो डार्क थर्टी’ दिग्दर्शकीय नामांकनात असते, तर ‘चांदोबा’सदृश चित्रकहाणी मांडणाऱ्या अँग ली याला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला नसता, हे सांगायला चित्रपट समीक्षक असायचीही गरज नाही. यंदा ऑस्कर नामांकनाची घोषणा नेहमीपेक्षा काहीशी आधी (१० जानेवारी) झाली. गोल्डन ग्लोब आणि इतर काही महत्त्वाच्या अमेरिकी पुरस्कारांच्या निर्णयानंतर साधारण ती येण्याचा आजवरचा शिरस्ता यंदा पाळला गेला नाही. त्याची परिणती असंख्य घोळयुक्त नामांकनात झाली. सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी व परभाषिक चित्रपटासाठी नामांकित झालेल्या ‘आमोर’चा ऑस्ट्रियाई दिग्दर्शक मिखाइल हानेकी याचीही वर्णी अॅकॅडमीने दिग्दर्शकाच्या नामांकनावर लावली, यातून त्यांचे मुख्य प्रवाहातील खणखणीत चित्रपटांकडे दुर्लक्ष झाले. चित्रपटांच्या तगडेपणात, दर्जात झालेली वाढ ही पुरस्कार विभागणीला कारणीभूत ठरली नाही, तर अॅकॅडमीने स्वत:च करून ठेवलेल्या घोळाची फळे पुरस्कारांच्या निकालात दिसली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
यंदा तरी.. घोळाची फळे!
दरवर्षीचा ऑस्कर सोहळा जसा नवनव्या संदर्भानी ‘वेगळा’ बनत असतो, तसा यंदाचाही ऑस्कर ‘वेगळा’ ठरला. ढीगभर पुरस्कार घेऊन जाण्याचा मान यंदा कुणालाच मिळाला नाही, त्याची कारणे ऑस्कर सोहळ्याच्या सुरुवातीच्या काही क्षणांतच स्पष्ट झाली होती. सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी असलेला छोटय़ा
First published on: 26-02-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This time fruits of parcility