राजकीय स्वार्थासाठी देशाच्या आर्थिक हितसंबंधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल युक्रेनी जनता अध्यक्ष यांकोविच यांच्या विरोधात नाराज होती आणि तिचाच उद्रेक गेली काही वर्षे होत होता. आता पार्लमेंटने यांकोविच यांना बडतर्फ करण्याचा ठराव केला असला तरी लगेच तेथील परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. इतिहासाचे ओझे आणि वर्तमानाचे आव्हान यांच्या कात्रीत युक्रेन सापडलेले आहे.
युक्रेनचा इतिहास हा संघर्ष आणि स्थैर्य याचा देदीप्यमान इतिहास आहे. पहिल्या महायुद्धात या प्रदेशाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजांना रोखण्याचे शौर्यकर्म याच प्रदेशाने केले. १९४१ मध्ये जर्मन फौजांना अडवणारी युद्धभूमी म्हणजेच युक्रेनची राजधानी क्यीव्ह हे शहर. त्या वेळच्या धुमश्चक्रीत तब्बल ६० हजारांचे प्राण गेले. पुढे सोविएत रशियाचा पहिला महासंगणक बनला तो क्यीव्ह विद्यापीठातच आणि स्टालिन यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या क्रुश्चेव्ह यांचे लक्ष होते तेही युक्रेनवर. क्रुश्चेव्ह यांना पदच्युत करून सोविएत रशियाची सत्ता हस्तगत करणारे लिओनिद ब्रेझनेव हे जसे युक्रेनचे तसेच इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यादेखील मूळच्या युक्रेनच्या. टीव्ही नावाच्या इडियट बॉक्समधील इलेक्ट्रॉनिक पिक्चर टय़ूब बनवणारा बोरिस ऱ्हाबोस्की हादेखील युक्रेनचा आणि ज्याचा उंच उडीचा विक्रम सध्याच्या सोची हिवाळी ऑलिम्पिकपर्यंत अबाधित राहिला तो सर्जी बुब्का हाही युक्रेनचा. उत्कृष्ट अभिनेता डस्टिन हॉफमन ते व्हॉट्सअ‍ॅपचा निर्माता जेन कोम हे सर्व मूळ युक्रेनीच. उत्तम कृषी उत्पादन आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा म्हणता येईल इतका अण्वस्त्रांचा साठा अशा परस्परविरोधी गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या युक्रेन या प्रांतात तरीही या प्रदेशात सोविएत रशियाविरोधी भावना सातत्याने असून जवळपास प्रत्येक दशकात काही ना काही कारणाने तिचा उद्रेक झाल्याचे आढळते. सोविएत रशियाच्या विघटनानंतर १९९१ साली युक्रेन स्वतंत्र झाला. परंतु त्यानंतरही त्या प्रांतास सलग राजकीय स्थैर्य लाभलेले नाही. २००४ साली झालेल्या क्रांतीत व्हिक्टर यांकोविच हे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून आल्याचे जाहीर झाले. याच पंतप्रधान यांकोविच यांनी पुढे देशाच्या घटनेत आणि सरकार पद्धतीत बदल केला आणि अध्यक्षीय पद्धती आणली. यांकोविच यांनी निवडणुकीनंतरही अध्यक्षपद स्वत:कडे राखले. परंतु ही निवडणूक लांडीलबाडीसाठीच गाजली आणि यांकोविच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. युक्रेनमधील उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय यांच्यात सरकारविषयी तीव्र असंतोष असून आपला देश भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांच्या हाती असल्याची त्यांची तीव्र धारणा आहे. त्याचेच रूपांतर सरकारविरोधी उठावात झाले आणि त्यास हिंसक वळण लागल्यानंतर यांकोविच यांच्यावर पलायनाची वेळ आली. युक्रेनच्या पार्लमेंटने यांकोविच यांना बडतर्फ केले असून त्या देशातील निर्नायकी अवस्था आणखी काही काळ तरी राहील अशी चिन्हे आहेत.  
या सर्वाच्या मुळाशी आहे तो शीतकालीन भासावा असा रशिया आणि अमेरिकाधार्जिणा युरोप यांच्यातील संघर्ष. युक्रेन हा भौगोलिकदृष्टय़ा युरोपला जवळचा आहे आणि राजकीयदृष्टय़ा तो रशियाच्या प्रभावाखाली आहे. किंबहुना होता. हाच रशिया प्रभाव हा विद्यमान नाराजीचे कारण असून त्यामागे पाश्चात्त्य देश नाहीत, असे म्हणता येणार नाही. यांकोविच यांनी गेल्या वर्षी युरोपीय संघटनेशी करार केला. त्या कराराचे बरेच आर्थिक फायदे युक्रेनला मिळतील आणि अर्थविकासास चालना मिळेल अशी त्या देशाची धारणा होती. युरोपीय संघटनेशी होणाऱ्या युक्रेनच्या या कराराकडे युक्रेनातील समस्त मध्यमवर्ग डोळा लावून होता. या करारामुळे युक्रेनच्या सीमा युरोपीय देशांसाठी अधिक मोकळय़ा होणार होत्या. व्यापार-उदिमाच्या अधिक संधी आणि आधुनिकीकरण या करारामुळे होईल असे सांगितले जात होते आणि त्यासाठीच सुरुवातीस यांकोविच यांनी या करारासाठी तयारी दर्शवली होती. परंतु गतवर्षी यांकोविच यांनी रशियाचा दौरा केला आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांची नियत बदलली. या करारासाठी त्यांनी टाळाटाळ सुरू केली. यांकोविच यांनी युरोपीय युनियनशी हातमिळवणी करू नये यासाठी पुतिन हे आग्रही होते आणि आपला आग्रह यांकोविच यांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी स्वस्त इंधन वायूचे गाजर त्यांच्यापुढे धरले. युक्रेनच्या भूभागात मोठय़ा प्रमाणावर तेलसाठे असले तरीही रशियातून होणारा नैसर्गिक वायूचा इंधन पुरवठा हा त्या देशातील चूल पेटवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पुतिन यांनी युक्रेनला याच दरात घसघशीत सवलत दिली आणि युरोपीय कराराच्या ऐवजी रशियाबरोबर करार केल्यास अधिक आर्थिक सवलतींचे आश्वासन दिले. युक्रेनचे यांकोविच केवळ याच करारावर भाळले असे नाही. त्यांनी पुतिन यांच्या बाजूने कौल दिला त्यास वैयक्तिक कारणदेखील आहे. ते असे की अध्यक्षीय पदाची सत्ता हस्तगत करताना पंतप्रधान युलिया त्योमोशेंको यांना अवैधपणे तुरुंगात डांबण्यात आले. रशियाशी झालेल्या वायुकरारात गैरव्यवहार झाल्याचा ठपका पंतप्रधान त्यामोशंको यांच्यावर ठेवून अध्यक्ष यांकोविच यांनी त्यांना बडतर्फ केले आणि त्यांची रवानगी तुरुंगात केली. युरोपीय संघटनेशी व्यापार करार करावयाचा असेल तर यांकोविच यांनी गेली दोन वर्षे तुरुंगात असलेल्या त्योमोशंको यांची मुक्तता करावी असा युरोपीय संघटनेचा आग्रह होता. हे अर्थातच यांकोविच यांना मंजूर नव्हते. तेही कारण त्यांना युरोपीय संघटनेबरोबरचा करार टाळण्यासाठी मिळाले. तेव्हा राजकीय स्वार्थासाठी देशाच्या आर्थिक हितसंबंधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल युक्रेनी जनता अध्यक्ष यांकोविच यांच्या विरोधात नाराज होती आणि तिचाच उद्रेक गेली काही वर्षे होत होता. गेले दोन आठवडे त्यास हिंसक वळण मिळाले आणि शे-दोनशेंचा हकनाक बळी गेला. क्यीव्ह या शहरातील मध्यवर्ती मैदान, सरकारी कार्यालये गेली काही वर्षे आंदोलकांनी व्यापलेली असून त्या मैदानातील अस्वस्थता पूर्व युरोपातील देशभर पसरली आहे. युक्रेनी पार्लमेंटने शनिवारी अध्यक्ष विक्टर यांकोविच यांना बडतर्फ करण्याचा ठराव केल्याने ही अस्वस्थता संपण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी झालेल्या उठावात त्योमोशेंको यांचीदेखील मुक्तता करण्यात आली.
युक्रेनी भाषेत मैदानाला मैदानच म्हणतात. त्या देशातील ही मैदाने ही राजकीय असंतोषाची केंद्रे बनली असून पाश्चात्त्य देश आणि पुतिन यांच्या कात्रीत तो देश सापडलेला आहे. हा देश आण्विक शस्त्रसाठय़ाचे केंद्र आहे. त्यामुळे आणि त्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती वा तेलसाठा यामुळे हा देश आपल्या कच्छपि असावा असे पाश्चात्त्य देशांना वाटते. पुतिन यांचा अर्थातच यास विरोध आहे. रशियाचा हा अध्यक्ष आपल्या धसमुसळय़ा राजकारणासाठी विख्यात आहे. सांसदीय, नागरी हक्क वा लोकशाही नियमांना पायतळी तुडवणे हे पुतिन यांच्या राजवटीचे वैशिष्टय़ बनले असून रशिया हा पुन्हा सोव्हिएतकालीन जनविरोधी राजकारणाकडे चाललेला आहे. परंतु त्याच वेळी युरोप आणि आशियात विखुरलेल्या छोटय़ा नवनिर्मित देशांच्या आडून, पूर्व युरोपीय देशांना कब्जात घेऊन रशियाच्या राजकारणावर आणि पर्यायाने पुतिन यांच्यावर मात करण्याचे सतत प्रयत्न अमेरिकाधार्जिण्या युरोपीय संघटनेकडून होत आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या जॉर्जियातील युद्धामागे हेच कारण होते आणि आताही युक्रेनमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे या कारणाचा अंश आहे.
दुर्दैव हे की त्या त्या देशातील नतद्रष्ट राजकारण्यांनी अन्यांना नाक खुपसण्याची संधी आपापल्या प्रदेशात दिली आहे. यांकोविच हे त्यातलेच. त्यांच्या बदल्यात अन्य कोणी आले तरी लगेच परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. इतिहासाचे ओझे आणि वर्तमानाचे आव्हान यांच्या कात्रीत क्यीव्ह सापडलेले आहे. त्या त्या देशांना स्वतंत्रपणे उभे राहण्यासाठी खऱ्या अलिप्तपणे जोपर्यंत प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत युक्रेनींची अवस्था जगाला कीव वाटावी अशीच राहील.