सूर्याचे नुकतेच सुरू झालेले उत्तरायण, वातावरणातील गारठय़ाला मागे टाकत उबदारपणाची जाणीव करून देणारे निरभ्र आकाश ही माझ्या आगमनाची चाहूल. कोणे एके काळी अशा आल्हाददायी मोसमात आकाशात उंच भरारी घेताना खरेच मजा यायची, कारण मला नियंत्रित करणारा जमिनीवरचा चेहरा सच्चा असायचा. तेव्हा स्पर्धा असायची, पण त्यात निकोप वृत्ती जाणवायची. आता चेहऱ्याच्या जागी मुखवटे आले आणि माझेही रंग हळूहळू बदलत गेले. नंतर त्या रंगाला मात्र राजकीय किनार लाभली. त्याहीपलीकडे जातीय राजकारण्यांचे चेहरे माझी ओळख हरवू लागले. आकाशात उडणारा हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, अशा नजरेने सारे माझ्याकडे बघू लागले. जमिनीवरची गळाकापू स्पर्धा आकाशात अवतरली आणि माझा जीवच गुदमरायला लागला. मार, काट हे माझ्यासाठी परवलीचे शब्द. आधी ते उच्चारले जायचे तेव्हा त्यात अजिबात विखार नसायचा. आता नुसता तोच जाणवतो. एवढेच नाही तर मारचे मारो व काटचे काटो कधी झाले हेही कळायला मला खूप उशीर लागला. पूर्वी पेचात अडकायलासुद्धा मजा यायची, त्यातून सुटण्यासाठीची धडपड सारे कौतुकाने बघायचे. आता ही पेचाची नजाकत नाहीशी झालेली. माझे वेगवेगळ्या राजकीय रंगांत झालेले रूपांतर व माझ्यावर उमटवलेल्या नेत्यांच्या मुखवटय़ामुळे पेचात अडकवण्याऐवजी मला पाडण्याकडेच साऱ्यांचा कल असतो. राजकीय वैर इतके वाढले आहे की पेचातून सुटण्यासाठी नियंत्रक साधी ढील द्यायलासुद्धा तयार नसतो. स्पर्धा म्हटले की कुणाचा तरी पराभव ठरलेला. आधी मी आकाशात कापला गेलो तरी जमिनीवर सैरभरपणे पडताना साऱ्यांचे डोळे माझ्याकडे असायचे. अनेक जण मला वरच्या वर झेलण्यासाठी धावायचे. आता साऱ्यांच्या वृत्तीत फरक पडलेला. पराभूताकडे मायेने व आदराने बघण्याचे दिवस सरलेले. त्यामुळे कुठल्या तरी झाडाझुडपात निश्चेष्ट अवस्थेत पडून राहण्याची सवय मला झाली. मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवत आकाशात उंचउंच उडत राहणे, हळुवार व अलगद हेलकावे खात सतार छेडावी तशी शेपटी हलवत राहणे व नियंत्रणाची दोरी हाती असलेल्याच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव न्याहाळणे हेच माझ्यासाठी आधी परमसुख. आता स्पर्धेच्या युगात ते हरवले आहे. तशी एकाग्रता दाखवणारा नियंत्रकसुद्धा इतिहासजमा झाला आहे. आता कधी मोदी तर कधी शहा, कधी राहुल तर कधी सोनिया असे मुखवटे मला धारण करावे लागतात. फार उंच न जाता स्पर्धेत भाग घेत जयपराजय स्वीकारावा लागतो. याने माझा उडण्याचा आनंदच हिरावून घेतला गेला आहे, पण राजकीयीकरण झालेल्या मानवी मेंदूला ते कसे कळणार? खरे तर संक्रांतीचा हा काळ तिळगूळ घेऊन गोड बोलण्याचा. समाजातील सौहार्द कायम राहावे म्हणून संस्कृतीने केलेली साखरपेरणी म्हणजेच हा सण. त्यात माझे आकाशी झेप घेणे म्हणजे या गोडव्याला खिलाडूवृत्तीची झळाळी. मात्र, आताशा सारे बदलले. गोडाची जागा कडूने घेतली. सामाजिक तेढ हाच चर्चेचा विषय ठरू लागला. या अशा वातावरणात माझे उडणे, झेप घेणे सारेच मंदावले. या खेळातला आनंद व त्यातले माझे अस्तित्व हरवत चालले. होय मीच तो, पतंग!
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2020 रोजी प्रकाशित
स्पर्धेचा गोडवा सरल्यानंतर..
आता चेहऱ्याच्या जागी मुखवटे आले आणि माझेही रंग हळूहळू बदलत गेले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-01-2020 at 00:01 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article ulta chasma akp