सर, तुमच्या उद्घाटन करण्याला आमची ना नाही पण त्यानिमित्ताने होस्टेलची रंगरंगोटी करून त्याचा कायापालट करण्याचा जो घाट घातला जात आहे तो आमच्या अस्तित्वाच्या खुणा पुसून टाकणारा आहे. तुमचा कार्यक्रम होईपर्यंत आम्ही बाहेर कसेही राहू पण पुन्हा तिथे परत जाऊ तेव्हा आमचे अभ्यासात मन लागणे शक्य नाही. तेव्हा विनंती हीच की तुम्ही परतल्यावर आमची जागा पूर्ववत करून घ्यावी. म्हणजे आधी कपडे वाळत घालण्यासाठी प्रत्येक खोलीत बांधलेल्या तारा, कुणी चोरू नये म्हणून साबण लपवण्यासाठी भिंतीत केलेले खोपचे, अभ्यासानुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून आम्ही भिंतीवर डकवलेली कियारा अडवाणी, जान्हवी कपूर आदींची छायाचित्रे, प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी भिंतीवर लिहून ठेवलेला वेगवेगळ्या स्वरूपाचा मजकूर, शौचालयात भिंतीवर कोरलेली शब्दशिल्पे, मोबाइल लपवण्यासाठी निर्माण केलेल्या जागा, या सर्व गोष्टी आधी होत्या तशाच आम्हाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत. एकूणच जुन्याचे जसे नवे केले तसे नव्याचे जुने करून द्यावे ही विनंती.’ नांदेडच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हे पत्र वाचून महामहिमांनी कपाळावर जमा झालेला घाम पुसला. या मुलांना नक्कीच सत्ताधाऱ्यांनी उचकावले असणार अशी शंका त्यांच्या मनात डोकावून गेली. त्यावर विचार करण्यात अर्थ नाही असे म्हणत त्यांनी फोनाफोनी सुरू केली. सर्वात आधी त्यांनी विद्यार्थ्यांना निरोप दिला. काहीतरी मार्ग काढतो पण पेपरबाजी करू नका. मग विद्यापीठाकडे चौकशी केली तेव्हा कळले की जुन्याचे नवे करण्यावर पैसे खर्च करता येतात पण नव्याचे जुने करण्यावर नाही. त्यासाठी विशेष बाब म्हणून सरकारची परवानगी लागेल. हे कळताच ते भवनात अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागले. पक्षाने दिलेला दौऱ्याचा आदेश तर पाळावाच लागणार. शेवटी पक्ष आहे म्हणून आपण इथे आहोत. या पदावर असूनही राज्याचा प्रमुख असल्याचा ‘फील’ अशा दौऱ्यांमुळेच येतो. यालाही नशीब लागते. गेल्या आठवड्यात कोकण, आता मराठवाडा, पुढे कुठे जायचा निरोप मिळतो कुणास ठाऊक पण दौऱ्यामुळे सत्तेला डिवचण्यासोबतच परिवाराला बळ मिळते हेही खरे! सततच्या या फिरस्तीमुळे साचलेल्या फाइल हातावेगळ्या करायला वेळच मिळत नाही. तसेही ते कारकुनी काम. त्यापेक्षा या प्रवासातून मिळणारा सक्रियतेचा आनंद विरळाच. विचार करता करता त्यांचे मन पुन्हा विद्यार्थ्यांच्या मागणीकडे वळले. काय करावे? नव्याचे जुने करायला तिथल्या पक्षाच्या लोकांना सांगावे काय? नकोच. आणखी ब्रभा होईल. शिवाय त्या मुलांच्या मागण्याही विचित्र. असे पत्राचे धाडस केल्याबद्दल कारवाई करा असे विद्यापीठाला सांगितले तर नवाच गोंधळ उडणार. हे सत्ताधारी हुशार आहेत. बरोबर कात्रीत पकडले. त्यापेक्षा उद्घाटन रद्द करून टाकावे. हे ठरताच ते तसा निरोप नांदेडला देतात. दौऱ्याच्या दिवशी त्यांची नजर सर्वत्र  ‘त्या’ विद्यार्थ्यांना शोधत राहाते. पण कुणीही दृष्टीस पडत नाही. स्थानिक मंत्री गैरहजर राहणार हे ठाऊकच असल्याने त्याचेही त्यांना काही वाटत नाही. तीन जिल्हे फिरून ते थकूूनभागून भवनावर परततात तर दिल्लीहून आलेला नवा निरोप..  या दौऱ्यात तिघा मंत्र्यांनी गैरहजर राहून महामहिमांचा अवमान तसेच राजशिष्टाचाराचा भंग केला अशा आशयाचे पत्र तातडीने राज्यप्रमुखाला लिहा. मग ते आणखी उत्साहाने पत्र कसे लिहायचे याचे मार्गदर्शन सहायकाला करू लागतात.