सध्या सर्वत्र विकासाची एवढी घोडदौड सुरू आहे, की कुठे थांबावयाचे ते त्या विकासालाही कळेनासेच झाले असावे. आपण एखादी शर्यत सुरू करतो, तेव्हा ती शर्यत जेथे संपणार त्या रेषेवर स्पर्धकाला थांबावयाचे असते. पण सध्या अशी काही स्थिती आहे की, स्पर्धा संपण्याच्या रेषेपलीकडे पोहोचल्यावरही स्पर्धा संपतच नाही.  बिहार हे राज्य अनेक बाबतींत अन्य अनेक राज्यांच्या किती तरी पुढे आहे व काही बाबतीत तर कोणतेच राज्य त्या राज्याशी कधीच बरोबरीदेखील करू शकणार नाही, अशी स्थिती काही वर्षांपूर्वीपर्यंत या राज्यात होती. आपल्या या प्रगतीचा चढता आलेख खुद्द त्या राज्यास असह्य़ होऊ लागल्याने, अनेक बाबतींमध्ये या राज्याने त्या क्षेत्रांतील आपल्या ‘प्रगती’चा वेग कमी केला. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांची काही ‘नामचीन’ बाबींसंबंधात अलीकडे बिहारशी तुलना करणे शक्य होऊ  लागले. कोणे एके काळी महाराष्ट्रात खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार किंवा कोणतीही अमानवी प्रवृत्तीची गुन्हेगारी घटना घडली की, ‘बिहारलादेखील मागे टाकेल अशी लाजिरवाणी घटना’ असे तिचे वर्णन केले जात असे. बिहारने या बाबतीत स्वत:ला काहीसा लगाम लावून घेण्याचे ठरविल्याने, महाराष्ट्रातील अशा घटना बिहारला लाजविणाऱ्या म्हणून गणल्या जाण्याच्या प्रकारास लगाम बसला . गेल्या काही दिवसांपासून शिक्षणक्षेत्रातील बौद्धिक घोडदौडीची चर्चा महाराष्ट्रात सुरू असताना आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या बुद्धय़ांकाच्या सरासरीने शंभरीची टक्केवारी गाठल्याची अभिमानास्पद चर्चा सर्वत्र सुरू झालेली असताना, अशा स्पर्धेत महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचे स्वप्न पाहताना बिहारसारख्या नेहमीच सर्व बाबतींत आघाडीवर असण्याची सवय असलेल्या राज्याच्या शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रावर मात करण्याची ईष्र्या उत्पन्न न होती, तरच नवल! महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षांमध्ये एकीकडे ‘मार्क्‍सवाद’ बोकाळू लागल्याने, मुलांच्या एवढय़ा भरघोस मार्काचे काय करावयाचे या चिंतेने पालकवर्ग ग्रासलेला असताना, बिहारने महाराष्ट्रावर केलेल्या कुरघोडीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील पालकवर्ग नामक हतबल गटास काहीसा दिलासा मिळाला आहे. शंभरीस स्पर्श करणारी गुणव्यवस्था स्थिरावलेली असताना, तिकडे बिहारने तर त्यावरही कडी करून टाकली आहे. बिहारी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान कसे अगाध असते, त्याचे दाखले देणाऱ्या काही ‘पुरावेदार’ चित्रफिती गेल्या वर्षीच समाजमाध्यमांवरून प्रसृत झाल्याने अगोदरच बिहारी शिक्षणक्षेत्राची मान खाली गेली होती. ती वर काढून यंदा खरोखरीचे गुणवान विद्यार्थी शिक्षणाच्या कारखान्यातून उत्पादित करण्याचा चंग बांधूनही परत कुठे तरी माशी शिंकलीच. अनेक विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत शंभर टक्क्यांहून किती तरी अधिक गुण संपादन करून आपल्या बौद्धिक क्षमतेची असामान्य चमक दाखविली आणि काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा न देतादेखील उत्तीर्णाच्या यादीत स्थान पटकावले. शिक्षणक्षेत्रात सुरू झालेल्या या विकासाच्या घोडदौडीचा आता कदाचित उलटा परिणाम होऊ  शकेल. अनुशेष तर दूरच, पण पुढील काही वर्षांची भरपाई आगाऊ  होईल की काय अशी शंका या अद्भुत विकासगंगेमुळे उगम पावली आहे. ती आवरायला हवी!