दिवाळीत अतिफराळ झाल्याने पित्तप्रवृत्ती उफाळून येते, अतिशीत ऐसे काही प्राशन केल्याने कफप्रवृत्ती उफाळून येते, अतिआंबट ऐसे काही सेवन केल्याने वातप्रकृती उफाळून येते, ही बाब सर्वास ज्ञात आहेच. तद्वत अंगीचा डीएनएही उफाळून येत असतो. हे ज्ञान होण्यास कारण आहे दिल्लीश्वर प्रधानसेवक श्रीमान नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले महाराष्ट्राचे मुख्य सेवक श्रीमान देवेंद्र यांनी ऐन दिवाळीतील बलिप्रतिपदेस नागपूरस्थानी केलेले एक वक्तव्य. श्रीमान देवेंद्र हे असे काही वदले की ज्याने त्यांच्याच मंत्रिगणांत अस्वस्थता पसरावी. श्रीमान देवेंद्र यांचे हे वक्तव्य म्हणजे महद्आवाजाचा बॉम्ब, मध्यमआवाजाचा डांबरी फटाका, लघुआवाजाची लवंगी, की अग्नीने प्रज्वलित करताच धूर सोडत नागमोडी आकार घेणारी सर्पगोळी याचा अभ्यास ज्याने त्याने करावा. तर ते नेमके काय वदले, हे पाहू या. ‘बहुतकाळ आमच्या हाती होते विरोधाचे झेंडे आणि अंगी बाणवले होते विरोधाचे डीएनए. दोन सालांमागे हाती सत्तेचे झेंडे आले, मात्र अंगीचे विरोधाचे डीएनए काही नष्ट झाले नाही. ते अधूनमधून अचानक उफाळून येते. मग आमच्याच संघातील काही सदस्य अवास्तव ऐशा मागण्या करतात, आपल्याच सरकारवर बाण रोखतात’, ऐसे वदले देवेंद्र. ‘प्रारंभी माझीही स्थिती तैशीच होती’, ऐसी कबुलीही दिली श्रीमान देवेंद्र यांनी. श्रीमान देवेंद्र हे लाठीकाठी फिरवून समोरच्यास, मागच्यास गारद करण्यात वाकबगार. बलिप्रतिपदेला त्यांनी फिरवलेल्या या शब्दलाठीचा अचूक फटका नेमक्या काही महोदयांना बसला असणार, यात शंका ती काय. या लाठीकाठीच्या फटक्यांचे भारूड खान्देशीच्या जळगावी ऐकू जावे.. मराठवाडी मातीतील कुठल्या कुठल्या गडांना त्याने हादरे बसावेत.. मुंबापुरीतील बोरिवलीच्या जंगलात त्याचे प्रतिध्वनी उमटावेत.. ऐन मुंबईत, वांद्रे नामक परिसरात असलेल्या वाघांच्या गुहांपर्यंत लाठीकाठीचे सपकारे जाणवावेत, ऐसे हेतू श्रीमान देवेंद्र यांच्या मनात नसतीलच, ऐसे नाही. श्रीमान देवेंद्र हे समोरच्यांच्या, मागच्यांच्या मनातील दडलेले हेतू ओळखण्यात निपुण. रुमालपळवी या खेळात, रुमाल कुणी पळवला, दडवला हे अचूक ओळखण्यात त्यांच्याइतका निष्णात अन्य कुणी नाही, ऐसा अनुभव सांगणारे नागपूरस्थानी बक्कळ. त्यामुळेच, विरोधाचा डीएनए कुणाकुणाच्या मनातून अद्याप निखंदलेला नाही, तो कशामुळे उफाळून येतो, याची नेमकी माहिती श्रीमान देवेंद्र यांना असणारच. या उफाळून येणाऱ्या डीएनएवरील उताराही त्यांना पक्का ठाऊक. एका उंचशा खुर्चीत बसले की उफाळून आलेला हा विरोधाचा डीएनए अल्लद शांत होतो. पण त्या उंचशा खुर्चीत तर खुद्द देवेंद्रच स्थानापन्न. ते या खुर्चीतून उठतील, ऐसी चिन्हे नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी सत्तेचे झेंडे हाती घेतलेल्या आणि अंगी विरोधाचा डीएनए बाणवणाऱ्यांसाठी, या डीएनएवर उतारा नाही. एखाद्या सद्प्रवृत्तीच्या बाबांच्या, महाराजांच्या सल्ल्याने त्यांनी एखादे आसव, काढा, रेचक घेऊन बघावे फार तर. तूर्तास तरी एवढेच त्यांच्या हाती..