मुंबईतील गोरेगावच्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आणि त्याचे मृणाल गोरे उड्डाणपूल असे नामकरण करण्याचा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येसच पार पाडल्याबद्दल मुंबई महापालिकेचे अभिनंदन करावयास हवे. हा सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पार पाडावयाचे महापालिकेने ठरविले असते, तर कदाचित तो औचित्यभंगच झाला असता. कारण, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम राज्यात सर्वत्र कसा पार पाडावा याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वीच जारी केले आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेस १ मे रोजी ५६ वष्रे पूर्ण होत असल्याने, या दिवशी कोणत्याही शासकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावयाचे असले, तरी त्याला करमणुकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप नसावे असे तेव्हाच राज्य सरकारने स्पष्ट केले होते. मृणाल गोरे उड्डाणपुलाच्या नामकरणाचा सोहळा महाराष्ट्रदिनी आयोजित करण्यात आला असता, तर या निर्देशाचे स्पष्ट उल्लंघन झाले असते. कदाचित सोहळ्याच्या आयोजकांना त्याची अगोदरच कल्पना असावी. एकमेकांना पुरून उरण्याची सुप्त ईर्षां असलेले दोन राजकीय नेते समोरासमोर आले, तर तो सोहळा म्हणजे करमणुकीचाच कार्यक्रम होतो, हे अलीकडेच राम नाईक यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिसून आल्याने पालिकेला हा शहाणपणा सुचला असावा. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊ लागल्याने कलगीतुऱ्याच्या हंगामाचा मुहूर्त ऐन महाराष्ट्रदिनी करणे आयोजकांना प्रशस्त वाटले नसावे, असेही म्हणता येईल. म्हणूनच, करमणुकीचा एक कार्यक्रम आदल्या दिवशी पार पाडून महाराष्ट्र दिनाच्या औचित्याला बाधा न आणण्याचे पुण्यकर्म करणारे आयोजक अभिनंदनास पात्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अखंडतेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने उद्याच्या राजकारणाची ती भक्कम शिदोरी असणार आहे. म्हणजे, अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या संस्कृतीला महाराष्ट्राची शकले स्वप्नात दिसू लागल्याने हा कलगीतुरा रंगणार आणि महापालिकेच्या मदानावर त्याचे पंचनामे होणार हे ज्यांनी अगोदरच ओळखले, त्यांनी गोरेगावच्या कार्यक्रमात त्याची रंगीत तालीम सुरू केली आहे. उद्धव ठाकरे तर सरकारच्या विरोधातील आपली सारी हत्यारे परजून तयारच आहेत. त्यांना कसे सांभाळायचे, याचा कानमंत्र अगदी कालपरवाच मनोहरपंत जोशी यांनी फडणवीसांना दिल्याने, उद्धवजींनी कितीही अमोघ अस्त्र सोडले, तरी त्याला शरण गेल्याचे दाखवत त्याला प्रभावहीन करण्याची साधना सध्या फडणवीस करीत आहेत. युतीत कुरबुरी होतातच, पण युतीचं सांभाळलं की पाच र्वष मुख्यमंत्रिपद टिकवता येतं, हा गुरुमंत्र देणाऱ्या मनोहरपंतांचे हे शहाणपण पश्चातबुद्धीतून प्राप्त झालेले असल्याने फडणवीसांना ते अधिक मोलाचे वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच, उद्धवरावांचे फटके हसतमुखाने झेलत त्यांच्यावर लटक्या कौतुकाची फुले उधळण्याचा जोशी मार्ग बरा, हे फडणवीसांनी दाखवून दिले. आता करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असणार!
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2016 रोजी प्रकाशित
कलगीतुऱ्याची नांदी..
मुंबईतील गोरेगावच्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आणि त्याचे मृणाल गोरे उड्डाणपूल असे नामकरण करण्याचा
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 02-05-2016 at 02:53 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis uddhav thackeray