अहो.. मी काय म्हंते..
काय?
हे किती दिवस बायकांची लुगडी नेसून येडय़ावानी तेच तेच करत राह्य़चं?
मग काय करनार? दुसरं काही येतं का आपल्याला?
ते म्हायत्याय मला.. आपल्याला काय बी येत नाही ते. पण आता बास हे..
का? काय झालं?
कसं सांगू आता तुला.. सारखं लुगडय़ात राहून राहून ‘तसंच’ वाटायला लागलंय..
तसं म्हणजे कसं?
आता कसं सांगू? कसं हुतं की तुमी एकदा एकच गोष्ट सारखी सारखी करत राला की दुसरी कशी येत नाही, तसं. म्हंजे आपला बालकलाकार कसा मोठा झाल्यावरही बालकलाकारच ऱ्हातो ना तसं. तसं सारखं येडय़ावानी नाचून खरंच येडय़ासारखं वाटायला लागलंय..
अगं, पन टीआरपी चांगला असतो म्हणे..
अहो, किती टीआरपीच्या नादी लागायचं म्हंते मी? लोकं बघतात म्हणून काय काय येडय़ावाणी दाखवायचं?
अगं, इतके दिवस आपन तेच करत आलोय. दुसरं काही शिकलो नाही.. वाचलं नाही.
हो, तेबी खरंय म्हना.. मला तर अंकलिपीनंतर कोन्तं पुस्तकच वाचल्याचं आठवत नाही.
ते दिसतंच आहे, पन मलासुदा आठवत नाही.
पण तू तर डॉक्टर ना रे..
कसला डोंबलाचा डॉक्टर. आईवडिलांची इच्छा होती म्हनून मागे डॉ लावतो.. बाकी तसं मुन्नाभाई एमबीबीयश.
तसा मला संशय होताच.. तोच खरा ठरला..
कसला?
तुझ्याइतका अक्कलशून्य माणूस डॉक्टर होईलच कसा? परवाच पेप्रात वाचलं हुतं आपल्याकडे कसा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय ते. तू त्यातलाच एक. पण आताशा मला तू कलाकार म्हणूनसुद्धा तसाच बोगस वाटायलायस.. सारखं तेच तेच करणारा. रेकॉर्ड अडकल्यासारखा..
तु लई वटवट करायली गं?
म्हंजी? मी काय तुझ्यासारखी अक्षरशून्य नाही. सारखी टीव्हीसमोर बसून डोक्याचा भुगा करून घेणारी. मी वाचत असते सगळं.
पन मंगा तर म्हनली काई वाचत नाही म्हनून.
ते पुस्तकाचं. ते वाचायला होत नाही. पण पेपर सोडत नाही एक दिवस.
पेपर? अगं करोना झाला म्हंजे?
अराराराऽऽ तू इतका बिनडोक असशील असं वाटलं नव्हतं गडय़ा. अरे, पेप्रातनं करोना येतो यावर विश्वास ठेवणं म्हंजे बिरबलाची खिचडी शिजते यावर विश्वास ठेवणं किंवा तुझ्या लिखाणातनं विनोद होतो यावर विश्वास ठेवणं. आता इतके दिवस तू कार्यक्रम करतोयस, एकदा तरी खोटे लाफ्टर न देता हसायला आलंय का कुणाला? किंवा आपल्या भिकार नाटकाच्या, पडेल शिनेमाच्या, नाहीतर कंटाळवाण्या मालिकेच्या फुकट प्रमोशनसाठी जबरदस्तीनं यावं लागलेले सोडले तर इथे आणखी कुणी येऊन हसलंय कधी? अरे, हसू होणं आणि हसायला येणं यातला फरकही नाही कळत आपल्याला! हे प्रेक्षक आपल्याला हसतात आणि आपल्याला वाटतं आपल्या विनोदाला हसतात..
तू एकदम शहाण्यासारखं बोलायलीयस..
तूपण बोलशील. जरा चांगला पेपर वाचायला लाग. सारखं ‘इडियट बॉक्स’साठी लिहून लिहून तू इडियट झालायस आणि तुझ्या मेंदूचा रिकामा बॉक्स झालाय. म्हणून तू आता हवा येऊ द्या असं म्हणूपण नकोस.
का?
अरे, उडून जाईल ना खोकं. तू आता म्हटलं पायजे- ‘चला, जरा अक्कल येऊ द्या’!