असतो एखाद्याला वेगळा छंद, त्यावरून नावे ठेवण्याचे कारण काय? आजकाल बहुतेकांचा छंद राजकारणाचाच. पण ठाकरेंच्या धाकल्या पातीला नसेल जायचे तर इतरांना पोटदुखी कशाला? ‘गूगलगाय’ला गोगलगायीवर संशोधन करायचे असेल तर करू द्यावे ना! उगीच खुसपटे कशाला काढायची? अनेकांना ठाऊक नसेल पण अशी संशोधनवृत्ती वारशाने येते. ‘गोगलगाय पोटात पाय’ ही म्हण अनेकांना आठवत असेलच की! म्हणजे साधा दिसणारा पण अंतरी नाना कळा असलेला. या घराण्याचेही अगदी तसेच. दादू आधी साऱ्यांनाच किती साधे वाटायचे. भाजपला धोबीपछाड दिल्यावर व सत्ता हस्तगत केल्यावर त्यांची नानाविध रूपे दिसू लागलीच ना! तसे कदाचित या चिरंजीवाच्या बाबतीतसुद्धा घडेल, माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी घरातील दोन माणसे कामी लागल्यावर तिसऱ्याने प्राण्यांचे प्रश्न हाती घेतले तर बिघडले कुठे? शेवटी निसर्गातील प्रत्येक घटकाकडे लक्ष द्यायला घराण्यातले कुणी तरी हवेच ना! तसेही प्राणी हा या घराण्याचा ‘वीक पॉइंट’च. साधा मासा मेला तरी मूड जाऊन गाठीभेटी बंद करण्याची सवय साऱ्यांना जडलेली. अशा वेळी त्या प्राण्याच्या पोटात शिरून अभ्यास केला तर नव्या गोष्टी कळतील व मूड जाण्याचे प्रमाण कमी होईल, असा उदात्त विचार यामागे नसेल कशावरून? वाघाचे स्वामित्व एकाने घेतले, झाडांचे दुसऱ्याने, मग प्राण्यांचे तिसऱ्याने घेतले तर त्यात वाईट काय? सत्तेविना हिरमुसलेले विरोधक काहीबाही आरोप करतात. घरादारात सत्ता नांदत असताना तिचा साज उतरवून जंगलातल्या काटेरी पायवाटा तुडवणे सोपे नाही हे या विरोधकांना कळणारे नाही. शेवटी काहीही झाले तरी घराणे इतिहासकाळात रमणारे आहे. तेव्हाच्या राजांनाही प्राण्यांविषयी प्रेम होतेच व तेही अशा अरण्यवाटा तुडवायचेच की! उलट तोच वसा आधुनिक काळात जोपासला म्हणून या तेजसाचे साऱ्यांनी अभिनंदन करायला हवे. आता कलानगरातल्या घरात पाली, खेकडे, सरडे यांचा मुक्तसंचार आहे. एरवी कार्यकर्त्यांसाठी हक्काचे असलेले हे घर प्राण्यांसाठीही हक्काचे झाले तर त्यात वाईट काय? मानव-वन्यजीव सहजीवनाचे उदाहरण यापेक्षा दुसरे कोणते असू शकेल? आता कुणी म्हणेल की या घराण्याच्या मांसाहारीपणाचे काय? खरे तर असा बादरायणसंबंध जोडण्याची काहीएक गरज नाही. मांसाहारी लोकांनी प्राण्यांवर प्रेम करू नये असे कुठे लिहिले आहे? आणि प्राणिमात्रांवर दया करतो तोच शाकाहारी असे तरी कुठे म्हटले आहे? तेव्हा उगीच आक्षेप घेण्यापेक्षा ज्याला जे आवडते ते करू देणे योग्य. बारामतीच्या घराण्यातल्या नव्या पिढीप्रमाणे ‘जय श्रीराम’ म्हणून अख्ख्या घराण्यालाच अडचणीत आणण्यापेक्षा गरीब गोगलगायीवरचे संशोधन करून घराण्याचे नाव वृद्धिंगत करण्यात काय वाईट? तेव्हा आता तरी विरोधकांनी नाद सोडावा व गोगलगायीकडे दुर्लक्ष करावे हेच इष्ट!