‘रोगमुक्त भारत करणे हा जर गुन्हा असेल तर तो मी वारंवार करणारच,’ ही बाबांची राष्ट्रप्रेमी घोषणा ऐकून आमचा ऊर भरून आला. एखाद्याने भगवे कपडे घातले म्हणजे तो संशोधक होऊ शकत नाही हा नतद्रष्ट विचार या घोषणेने आता नक्की मागे पडेल. जगातल्या कोणत्याही आजारावर औषध फक्त आयुर्वेदातच आहे हे या वारंवार विज्ञानाच्या दुगाण्या झाडणाऱ्यांना कधी कळणार ? आधी याच बाबांच्या योग पद्धतीचीही खिल्लीच उडवली गेली. योग शांतपणे करायचा असतो, बडबड करत नाही असे टोमणे मारले गेले. आता असते एकेकाची पद्धत. त्यावर आक्षेप कशाला? बाबा पूर्वजन्मीचे विक्री प्रतिनिधी असतील. त्यांची ही सवय या जन्मात कायम राहिली तर त्यांचा दोष कसा? शेवटी त्यांनी कोटय़वधी लोकांना योग शिकवलाच ना! मग थोडीफार बडबड करून कमाई केली तर बिघडते कुठे? कुणालाही नावे ठेवणे हा आपला जणू राष्ट्रीय गुण झालाय. २०१४ पासूनच या गुणाची भरभराट झाली. त्यामुळे बाबांनी असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नये हेच उत्तम. करोनावर औषध सापडत नसताना बाबांनी आपली किमया साधली. शेवटी तेही एक उद्योजक आहेत, हे विसरून कसे चालेल? काही जण म्हणतात केंद्राने व राज्यांनी डोळे वटारल्याबरोबर बाबांनी ‘कोलांटउडी’ नावाचे नवे आसन विकसित केले. अहो, अनेक आसनांत अशी उडी असतेच. बाबांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेणे म्हणजे अधर्मच! केंद्र सरकार तर दुसऱ्याच दिवशी उपरती व्यक्त करते झाले. काही राज्यांनी आवई उठवली, पण ती उठवणारे अनेक राज्यकर्ते बाबांच्या चित्रफिती बघून रोज घरात योग करत नसतीलच, याची खात्री काय? यापैकीच काही, ‘मिया मूठभर दाढी हातभर’ अशी खोचक उपमा बाबांना देतात. अरे, बाबांनी या देशातले सरकार उलथवले. राष्ट्रभक्तीला देशी उत्पादनाशी जोडून देशभर चैतन्य निर्माण केले. यासाठी भले त्यांना नेहमीपेक्षा निराळ्या कपडय़ात पळून जावे लागले असेल पण तो अपमान विसरत का होईना, त्यांनी राष्ट्रवादाला चालना दिली. अशा महान माणसाची अवहेलना करणाऱ्यांना विवेकी कसे म्हणणार? शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढली की करोना बरा होतो हे विज्ञानवादी म्हणतातच ना! आता बाबा तेच तर म्हणत आहेत. तरीही त्यांच्यावर टीका? आपल्याकडे स्वदेशीची खिल्ली उठवणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. परदेशींचे अप्रूप व देशींवर आक्षेप हाच त्यांचा धंदा होऊन बसला आहे. त्याला धंद्याने उत्तर देणारे बाबा म्हणूनच एकमेवाद्वितीय आहेत. तो बाबांचा क्रिष्णा नावाचा कुणी सहोदर नेपाळी कसा? तो आजारी पडला तेव्हा कृत्रिम श्वसनयंत्राचा आधार का घेतला? अशा खोचक प्रश्नांची उत्तरे बाबांनी देऊच नये. तो सहकारी समजा नेपाळचा असला तरी इकडे त्याचा समावेश राष्ट्रभक्तांच्या यादीत आहे आणि त्याला जेव्हा ते यंत्र लावले तेव्हा आताचे श्वासावरचे औषध घ्यायचे होते हे या प्रश्नकर्त्यांना कळलेलेच नाही. त्यामुळे बाबांनी आता प्रश्नांची चिंता न करता खुशाल करोनायोद्धा म्हणून वावरावे. सारा देश व त्याचे कर्तेधर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. आणि १३० कोटी भारतीयांचा विश्वास अजून कायम आहे. तेव्हा बाबा.. काळजी नको, हरिद्वारपासून कन्याकुमारीपर्यंत तुमच्या दुकानासमोर रांगा लावून औषध घेण्यासाठी सारे तयार आहेत. आता तुम्ही नव्या उत्पादनाचा तेवढा विचार करा! बाबांच्या नूडल्स बाजारात येताच लोक इतर बडय़ाबडय़ा नूडलना जसे विसरले, तसेच या नव्या औषधाबद्दलही होणार, हे नक्की!